Next
मिळोनी वानरसेना...
अतुल साठे
Friday, February 08 | 04:00 PM
15 0 0
Share this storyकाळे तोंड, राखाडी केसाळ शरीर व वेलांटीसारखी वरच्या बाजूला वळवलेली लांब शेपटी हे वानराचे रूप आपल्यापैकी काहींनी रानात किंवा गावात, तर अनेकांनी चित्रात अथवा माहितीपटात नक्की पाहिले असेल. भगवान मारुती व त्यांची वानरसेना सर्वपरिचित आहे. वनात राहणारा नर (माणूस) म्हणून वानर, अशी संस्कृतमधील या नावाची व्युत्पत्ती आहे. रामायणातील वानर ही वनात राहणारी माणसे (वनवासी) होती किंवा खरीच वानर होती, अशा दोन्ही शक्यता वर्तवल्या जातात. आज मात्र वानर हा शब्द हनुमान लंगूर किंवा करडा लंगूर या प्राण्यासाठी वापरला जातो. भारताप्रमाणेच प्राचीन ग्रीसमध्येही वानराला पवित्र मानत असावेत कारण आजचे वानरकुळाचे ‘सेम्नोपीथेकस’ हे नाव प्राचीन ग्रीकमधील सेमनॉस (पवित्र) या शब्दावरून आलेय. जाणून घेउया या वानरसेनेबद्दल.

हनुमान लंगूरच्या नेपाळ, काश्मीर, तराई, उत्तरी मैदानी, काळ्या पायाचे, दक्षिणी मैदानी, मद्रास व श्रीलंका या उपजाती आहेत. बर्फाच्छादित प्रदेश (नेपाळ व काश्मीर उपजातींचा अपवाद) व वाळवंट सोडले तर लंगूरचा आढळ भारतीय उपखंडात सर्वत्र आहे. या उपजातींमध्ये करड्या रंगात पांढरट-पिवळ्या रंगाचे प्रमाण, पायांचा काळपटपणा आणि डोक्यावरील केसांच्या पुंजक्याचे अस्तित्व/अभाव या बाबतचे फरक दिसून येतात. गूनी (कुमाऊनी), वांद्रा (गुजराती), मुसू (कन्नड), कुमडामुचू (तेलुगू), कोरुंगू (तमिळ) व मीआउक (बर्मीज) अशा विविध नावांनी लंगूर ओळखला जातो. त्याशिवाय भारतीय उपखंडात टोपीवाले (२ उपप्रकार), जांभळट चेहऱ्याचे, निलगिरी व सोनेरी लंगूर हे प्रकारही आढळतात. भारतीय उपखंडाबाहेर लाओस लंगूर व हातीन लंगूर या जाती आहेत.

एस. एच. प्रॅटरच्या नोंदींनुसार बसलेला नर हनुमान लंगूर २ ते २.५ फूट उंच असतो, तर शेपूट साधारण ३ फूट लांब असते. हिमालयाच्या पश्चिमेकडील रांगांतील लंगूर सगळ्यात वजनदार असतात (१६-२१ किलो). दख्खन व दक्षिणेकडील हनुमान लंगूर आणि उपखंडातील अन्य प्रकारचे लंगूर जरा लहान असतात.

लंगूर टोळ्या व धोक्याची सूचना
लंगूर टोळ्यांमध्ये असलेले नातेसंबंध प्रकर्षाने त्यांच्या वर्तनातून जाणवतात. माद्या अनेकदा इतरांची त्वचा व केस स्वच्छ करताना दिसतात. लंगूरच्या टोळ्या आवश्यकतेप्रमाणे झाडावर किंवा जमिनीवर वावरतात. ताडोबासारख्या शुष्क पानझडी जंगलांत पर्यटकांना लंगूरच्या मोठमोठ्या टोळ्या आरामात जमिनीवर बसलेल्या दिसतात. झाडावर एका फांदीवरून दुसऱ्यावर लंगूर १२-१५ फूट लांब उडी सहज मारतात. रानात प्रत्येक टोळीत एक अनुभवी लंगूर उंच झाडाच्या शेंड्यावर बसून डोळ्यांत तेल घालून टेहळणी करतो. एखाद्या भक्षक प्राण्याची चाहूल लागली की तो लगेच ‘खेकॉ.. खेक...’ ही धोक्याची सूचना देतो व जमिनीवरील सर्वजण ताबडतोब झाडावर चढतात. भारतीय जंगलांत फिरलेल्या लोकांना ही सूचना सुपरिचित आहे. या सूचनेचा उपयोग अन्य प्राण्यांना व रानात भटकणाऱ्या माणसांना होतो. एकदा दाजीपूर अभयारण्याजवळ फिरत असताना एक लंगूर आलटूनपालटून आमच्या दिशेला व विरुद्ध दिशेला बघत सूचना देत होता. त्यावेळी आम्ही अंदाज केला, की त्याला आम्ही एका बाजूला व एखादा भक्षक प्राणी दुसऱ्या बाजूला दिसत असावा. या व्यतिरिक्त लंगूर इतर अनेक प्रकारचे आवाजही काढतात. ‘हूप हूप..’ ही खूपदा ऐकायला येणारी हाक आपण लहानपणी गोष्टीत ऐकलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळते.

रात्री वस्तीला लंगूर झाडावर असतात. अभ्यासकांच्या नोंदींनुसार बिबट्या अनेकदा लंगूरची टोळी असलेल्या झाडावर चढतो व जमेल तेवढे जवळ जाऊन गुरगुरतो. अशावेळी घाबरलेला एखादा लंगूर खाली उडी मारतो आणि बिबट्याची आयतीच शिकार बनतो. कमी उंचीच्या झाडांवर असाच प्रयोग कधीकधी वाघही करतो. रानकुत्रा, लांडगा व अजगर हेसुद्धा लंगूरचे भक्षक आहेत. लंगूर माकडाइतका आक्रमक नसतो, परंतु धोका संभवत असल्यास त्याचा स्वभाव वेगळा असू शकतो. मुंबईच्या तुळशी तलावालगत जंगलात फिरताना असा स्वसंरक्षणार्थ दात विचकून ओरडणारा लंगूर मी पाहिलाय.

सर्वत्र संचार
हा धीट प्राणी खाद्य शोधण्यासाठी सर्वदूर भटकताना आढळतो, ज्यामध्ये पाने, हिरवी देठे, फळे, सुचीपर्णी वृक्षांचे कोन, मुळे, बिया, गवत, बांबूचे कोंब, नेचे, शेवाळ, कोळ्यांची जाळी व किड्यांची पिल्ले यांचा समावेश आहे. खाताना त्यांच्याकडून फळे, फुले व पाने खाली पडतात, जी वेचायला हरण, गवा, कोल्हा व अस्वलासारखे प्राणी येतात. जंगल व शेतीप्रधान प्रदेशाप्रमाणेच भारतातील अनेक शहरांतही (विशेषतः उत्तरेत) मोठ्या प्रमाणावर लंगूर आढळतात. मारुतीशी असलेल्या साधर्म्यामुळे बहुतांश भारतात माणसांकडून लंगूरना काही इजा केली जात नाही. मानवाने दिलेले अन्नही ते खातात, परंतु रानातील प्राणी आपले खाद्य शोधायला समर्थ असतात. त्यांना अशी सवय लावणे योग्य नाही. काही माहितीपटांमध्ये, अगदी घरातसुद्धा बिनधास्त घुसणारे लंगूर आपण पाहिले आहेत. साधारण चार वर्षांपूर्वी पुण्यातील कोथरूडमध्ये भरवस्तीत एक लंगूर काही दिवस लोकांना दिसत होता. वांद्रे या मुंबईतील उपनगराचे नाव तिथे पूर्वी सापडणाऱ्या वानरांवरून पडले असावे, असा अंदाज आहे. कोकणात गेल्या दशकात असा अनुभव येऊ लागलाय की जंगले कमी झाल्याने नैसर्गिक खाद्य कमी होऊन लंगूर अधिक प्रमाणात आंबा व अन्य बागायती पिकांत घुसू लागलेत. परंतु नैसर्गिक अधिवासांचे आपण रक्षण केले, तर अशा घटना होणार नाहीत आणि पुन्हा एकदा वानरसेनेशी मैत्री करण्यात मानव यशस्वी होईल.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link