Next
समईच्या शुभ्र कळ्या...
अनिल गोविलकर
Friday, September 20 | 04:00 PM
15 0 0
Share this story


ललित संगीतात भावकविता आणली तर कलाकृतीचा दर्जा किती उंचावला जातो, याचे हे गाणे एक समृद्ध उदाहरण आहे. ललित संगीतात ‘काव्य’ आले म्हणून काही टीकाकार नेहमी तिरकस टीका करतात, कारण गाण्यात कविता आली म्हणजे सुरांवरील लक्ष उडण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसऱ्या बाजूने गाण्यातील शब्दकळा सपक असली की लगेच फडतूस कविता म्हणून हेच टीकाकार आपली लेखणी चालवतात. या कवितेत मनाच्या संत्रस्त अवस्थेचे चित्रण आहे. आरती प्रभू यांची कविता वाचताना मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा.

संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांनी ही कविता निवडली, इथेच त्यांची उच्च अभिरुची ध्यानात येते. ‘समईच्या शुभ्र कळ्या’ हे शब्दच इतके काव्यमय आहेत, की कुणाही सुजाण कलाकाराला मोह व्हावा. फार मागे, याच संगीतकाराने या गाण्याच्या संदर्भात सांगताना, हेच शब्द मनाला भिडले आणि त्यांना चाल बांधावीशी वाटली, असे सांगितले होते. चाल म्हणून स्वतंत्र विचार करताना, कवितेतील आशय अधिक खोल व्यक्त व्हावा, अशीच दृष्टी ठेवल्याचे लक्षात येते. ‘रागेश्री’ रागावर आधारित तर्ज आहे. मंगेशकर यांच्या बहुतांश रचनांत वाद्यमेळ अत्यंत त्रोटक असतो. जी थोडीफार वाद्ये असतात, ती मात्र आपले अस्तित्व स्पष्टपणे दाखवून देतात, जसे या रचनेत बासरी. मुळात अवघड लय, त्यातून बासरीदेखील तशीच अवघड लय पेलते. या गाण्यात वाद्यमेळ हा फक्त बासरी आणि तालवाद्य म्हणून तबला इतकेच आहे. याचाच वेगळा अर्थ गायनाला अपरिमित महत्त्व. हृदयनाथ मंगेशकर यांच्या चाली या ‘गायकी’ अंगाच्या का असतात, याचे नेमके उत्तर या रचनेत आढळते. दुसऱ्या शब्दांत मांडायचे झाल्यास मंगेशकर यांच्या चाली या अतिशय ‘आवेगी’ असतात. स्थिर चित्ताने ऐकणे घडत नाही, प्रसंगी अस्वस्थ करतात. कलाकृतीने अस्वस्थ करणे हा कलाकृतीच्या दर्जाबाबत आवश्यक मुद्दा असू शकतो. खरे तर मूळ कविता सात कडव्यांची आहे, परंतु ललित संगीताच्या आकृतिबंधात सगळी कविता सामावणे निव्वळ अशक्य. तेव्हा कवितेतील कुठली कडवी घ्यावी याचा अंतिम निर्णय संगीतकाराचा. अर्थात हृदयनाथ मंगेशकर यांनी जी कडवी संगीतबद्ध करायला घेतली आहेत, त्यातून त्यांची विचक्षण दृष्टी स्पष्टपणे दिसून येते.

आशाबाईंचे गायन हे नेहमीच ‘अर्थपूर्ण’ असते. गाताना कुठलीही हरकत, छोटी तानही स्वच्छपणे ऐकायला येते. ऐकताना तिथे कसलाही अटकाव नसतो. या रचनेतील पहिलीच ओळ - समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून नव्हते; मुद्दामहून ऐकण्यासारखी आहे. स्वर हळूहळू वरच्या सुरांत जातात, परंतु तो स्वरांचा प्रवास किती नजाकतीने आणि स्वच्छपणे केलेला आहे. समईची ज्योत ही नेहमीच शांत, अल्पप्रकाशी असते. तोच भाव गायनात ठेवलेला आहे. मात्र ही शांतता व्याकूळ करणारी आहे. व्याकुळतादेखील आनंददायी असू शकते, याचे नेमके भान ठेवले आहे. ‘हासशील हास मला, मला हासूही सोसवेना; अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा’ या ओळी मुद्दाम ऐकाव्यात. मुळात शब्दच इतके अर्थवाही आहेत की ऐकताना तिथेच आपण अडकतो. शब्दांतून व्यक्त होणारी हताशता, स्वरांच्या साहाय्याने कशी मांडायची, याचे हे सुंदर उदाहरण आहे. 

 
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून नव्हते;
केसांतच फुललेली, जाई पायांशी पडते.

 
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे;
मागे मागे राहिलेले, माझे माहेर बापुडे.

 

साचणाऱ्या आसवांना, पेंग येते चांदणीची;
आजकाल झाले आहे, विसराळू मुलखाची.
 

थोडी फुले माळू नये, डोळां पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला, शिवू शिवू ऊन ग ये.

 
हासशील हास मला, मला हासूही सोसवेना; 
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link