Next
‘शुभ’वर्तमान
नितीन मुजुमदार
Friday, January 18 | 03:00 PM
15 0 0
Share this story

एके काळी भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ राहिलेल्या राहुल द्रविडच्या हातात भारताच्या ज्युनिअर संघाची सूत्रं दिली जाणे हा अलिकडच्या काळात बीसीसीआयनं घेतलेला सर्वोत्तम निर्णय ठरावा. वरिष्ठ क्रिकेटसंघाचा प्रशिक्षक होण्याची संधी नाकारून त्यानं स्वतःहून तुलनेनं कमी ग्लॅमरस असा हा ज्युनिअर संघाचा प्रशिक्षक म्हणून रोल स्वीकारला यातच राहुलचं मोठेपण दिसून येतं. पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, शुभमन गिल आणि असे कितीतरी क्रिकेटपटू आज भारताच्या ज्युनिअर क्रिकेटसंघातून सीनिअर क्रिकेटसंघात आले आहेत किंवा येऊ घातले आहेत. भारतीय क्रिकेटला कोणत्याही क्रिकेटपटूनं निवृत्तीनंतर दिलेलं हे सर्वात मोठं योगदान असेल. वर उल्लेखलेले बहुतांश क्रिकेटपटू राहुलसरांच्या योगदानाचा उल्लेख अभिमानानं आणि जाहीररीत्या करत आहेत. शुभमन गिल हा १९ वर्षीय पंजाबचा क्रिकेटपटू भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडला गेला आहे. पृथ्वी शॉनंतर भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर चमकणारा हा अगदी अलिकडचा तारा!
शुभमन गिलचे वडील लखविंदर सिंग यांच्याशी भारतीय संघाच्या न्यूझीलंडमधील १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या विश्वचषकस्पर्धा विजयानंतर दीर्घकाळ बातचीत केली होती. भारतीय संघात शुभमनची निवड झाल्यावर त्यांच्याशी बोलताना त्यांना झालेला आनंद सहज जाणवला. “आज घरी कोणता खास पदार्थ बनवला?” असं विचारलं असता लखविंदरजी उत्स्फूर्तपणे म्हणाले, “आज शुभमन म्हणेल तसं!” आपल्या निवडीबद्दल शुभमन म्हणतो, “काल रात्री खूप उशिरा अचानक सारे मेसेजेस माझ्या फोनवर एकाच वेळी आले आणि मला माझ्या निवडीची बातमी कळली. मी लगेचच ही आनंदाची बातमी वडिलांना सांगायला धावलो!”
करसन घावरी शुभमनची एक छान आठवण सांगतात. “२०११मधील मे महिना असावा तो. मी पंजाब क्रिकेट असोसिएशननं चंडिगड इथे आयोजित केलेल्या एका प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करायला गेलो होतो. जलदगती गोलंदाजांसाठी ते शिबिर होतं. त्यांची चाचणी घेण्यासाठी काही उदयोन्मुख फलंदाजांची गरज होती, समोर आला तो हा ११-१२ वर्षांचा कोवळा शुभमन! त्याच्याबरोबर मला वाटतं मनन वोरा हादेखील होता आणि काय सांगू, त्या छोट्या मुलानं त्याच्या वयाच्या दुप्पट असलेल्या जलदगती गोलंदाजांना ज्या आत्मविश्वासानं तोंड दिलं ते बघता मी अवाक् झालो. पहिल्या दिवशी सरावासाठी बोलावलेल्या शुभमनला तू सरावासाठी रोज ये, असं मी सांगितलं नव्हे बजावलं! शिवाय पीसीएच्या पदाधिकाऱ्यांनाही या मुलाकडे नीट लक्ष द्या, असं आवर्जून सांगितलं. लवकरच शुभमन पंजाबच्या १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेटसंघात निवडला गेला.”
घावरी सांगतात, “छोट्या शुभमनबरोबर त्याचे वडील लखविंदर कायम असायचे आणि संपूर्ण वेळ ते शिबिरस्थानी थांबून राहायचे.” लखविंदरसिंग म्हणतात, “घावरीसरांचं मार्गदर्शन उपयुक्तच ठरलं. फिटनेस, वातावरणाशी, खेळपट्ट्यांशी जुळवून घेताना करावे लागणारे बदल या व अशा अनेक बाबींबद्दल त्यांनी शुभमनला खूप चांगल्या सूचना केल्या. घावरीसर भेटल्यावर शुभमन क्रिकेटकडे अधिक गंभीरपणे बघू लागला!”
शुभमनचं बालपण गेलं ते भारत-पाकिस्तान सीमेवरील चक जैमालसिंग या जलालाबाद जिल्ह्यातील खेड्यात. हे खेडं चक खेरेवाला या नावानंदेखील ओळखलं जातं. गिल कुटुंबीय या गावातील जमीनदार. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. अनेक पिढ्यांपासून ते इथे राहत आहेत. फक्त भारत-पाकिस्तान युद्धांच्या वेळी गिल कुटुंबीय आपलं गाव सोडून जवळच्या मुक्तसर गावात तात्पुरते स्थलांतरित झाले होते. शुभमनचे आजोबा ८२ वर्षीय दीदारसिंग गिल आजही सपत्नीक इथे राहतात. मुलगा त्याच्या मुलाच्या करिअरसाठी लांब गेल्यानं ते त्यांची प्रचंड शेतीही सांभाळतात. नियमितपणे ट्रॅक्टरही चालवतात. शुभमन चार वर्षांचा असल्यापासून क्रिकेटची बॅट हातात धरतोय. शुभमनच्या आजोबांनी, दीदारसिंग यांनी शुभमननं लहानपणी वापरलेल्या पाच बॅट्स अजून जपून ठेवल्या आहेत. तेथील घराच्या व्हरांड्यात शुभमनचं टेनिस बॉल क्रिकेट सुरू झालं. शुभमनला बाद करणाऱ्या गोलंदाजाला रोख बक्षीस मिळे, मात्र शुभमननं वडिलांना फारसं खर्चात पाडलं नसावं! गावाकडे क्रिकेट खेळताना त्याची बॅट होती पिंपळाच्या झाडाच्या लाकडाची आणि गावाकडील घराचा व्हरांडा होता सुमारे तीन क्रिकेट पीच एवढा लांब!
तीन वर्षांच्या कालावधीनंतर लखविंदर सिंग यांनी मुलाच्या क्रिकेटसाठी जिल्ह्याच्या गावी, जलालाबादला स्थलांतर केलं, पण तिथेही क्रिकेटच्या मूलभूत सुविधा नाहीत, असं लक्षात आल्यावर शुभमन सात वर्षांचा असताना मोहालीच्या क्रिकेट स्टेडियमसमोर एक घर भाड्यानं घेतलं. एका अकादमीत नावही नोंदवलं आणि शुभमनच्या क्रिकेटकारकीर्दीनं खऱ्या अर्थानं ‘स्टान्स’ घेतला! शुभमनच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी लखविंदरसिंग यांनी बंगळुरूचाही विचार केला होता, पण अंतिम निर्णय झाला तेव्हा मोहाली हेच ठिकाण त्यांना योग्य वाटलं.
मोहलीला आल्यावर शुभमनचं शिक्षणही चांगलं सुरू होतं आणि तो उत्तम गुण मिळवत होता. आठवीपर्यंत तो ९० टक्क्यांपर्यंत गुण मिळवत असे. नंतर मात्र गाडी दहावीपर्यंत येऊन थांबली आहे. त्याचं शिक्षण दहावीपर्यंत झालं असलं तरी त्याच्या क्रिकेटचं ग्रॅज्युएशन मात्र आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचलं आहे. मोहालीत आल्यावर १४ वर्षीय शुभमननं एका राज्यस्तरीय क्रिकेटस्पर्धेत १६ वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय क्रिकेटस्पर्धेत त्रिशतक ठोकलं. शुभमननं निर्मल सिंगबरोबर ५८७ धावांची विक्रमी सलामी देताना ३५१धावा केल्या. त्याच दरम्यान त्यानं विजय मर्चंट क्रिकेटस्पर्धेत पदार्पणातच द्विशतक ठोकलं. बीसीसीआयतर्फे सलग दोन वर्षं (२०१३-१४ व २०१४-१५) त्यानं सर्वोत्तम ज्युनिअर क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवला. रणजीस्पर्धेच्या पदार्पणाच्या हंगामात १०० हून अधिक सरासरीनं त्यानं धावा केल्या. त्यानंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही.
ज्या न्यूझीलंडमध्ये त्यानं दोन वेगवेगळ्या दौऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे तिथेच त्याचं वरिष्ठ भारतीय संघातर्फे पदार्पण होणार आहे, ही गोष्ट चांगलीच आहे. गतवर्षी १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या वर्ल्डकप स्पर्धेत तो स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला, तर भारतीय ‘अ’ संघाकडून तो तिथे कसोटी सामनाही खेळला आहे. त्यामुळे तिथे पदार्पण होत असल्याचा आनंद त्यालाही आहे. कव्हर ड्राइव्ह आणि पूल हे त्याचे आवडते शॉट्स. त्याचा नैसर्गिक खेळ हा आक्रमकच आहे. मात्र आक्रमक खेळ असला तरी प्रथम श्रेणी, मर्यादित षटकं व टी-२० अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये तो रुळलेला दिसतो, हे खूप महत्त्वाचं आहे.
पृथ्वी शॉ, शुभमन, रिषभ पंत हे सारे विशीतले क्रिकेटपटू आहेत. हे सारे तरुण क्रिकेटपटू योग्य वेळेला भारतीय संघात येत आहेत. अल्पावधीत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेली आश्वासक कामगिरी बघता भारतीय क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल असेल, एवढं मात्र नक्की!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link