Next
सुळ्यांशिवाय हत्ती?
आनंद शिंदे
Friday, April 12 | 04:00 PM
15 0 0
Share this story


अचानक एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेल्या क्रुगर (Kruger) नॅशनल पार्कमधली ती बातमी होती. एक शिकारी एका गेंड्याची शिकार करायला आला जो हत्तीकडून मारला गेला आणि हत्तीकडून मारल्यानंतर सिंहानं त्याला खाऊन टाकलं. आपण वेगवेगळ्या जातींचे प्राणी असूनही आपल्या आणि जंगलाच्या संरक्षणासाठी आपण एकत्र यायला हवं असं ते प्राणी अनुभवातून म्हणू शकलेत का? हे खरं असेल तर माणसालाही आपली जात बाजूला ठेवून स्वत:साठी आणि या प्राण्यासाठी लढता येईल का? सगळेच प्राणी त्यांच्या सगळ्या अवयवांसकट सुंदर दिसतात. त्यांना आपण तसंच सुंदर बघुया.
हत्तीच्या सुळ्यांमध्ये हस्तिदंताचा भाग हा आपल्याला दिसणाऱ्या सुळ्याचा भाग असतो. त्याच्या मुळाकडील भाग हा आपल्या दातांसारखाच लगदा, रक्त व नसांचा बनलेला असतो. परंतु ज्या पद्धतीनं हत्ती सुळ्यांचा वापर करतात, त्यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज केलेला बरा. हत्तींचे सुळे त्यांच्या करता वरदानही असतात आणि शापही. वरदान कारण त्या सुळ्यांमुळे हत्तीच्या दिसण्याला एक राजबिंड स्वरूप येतं, तर शाप यासाठी की याच सुळ्यांसाठी हत्तींची फार मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. एक उदाहरण म्हणजे वीरप्पननं हस्तिदंतासाठी नऊशे हत्ती मारले असा आकडा सांगतात. वेगवेगळ्या आकारांच्या सुळ्यांकरता अगदी पिलांनादेखील सोडलं नाही.
या अती कत्तलींच्या परिणामांचा विचार शिकारी करत नाहीत. आफ्रिकेमध्ये नर आणि मादी या दोन्हींची शिकार होते. ज्यामुळे हत्तींची संख्या झपाट्यानं कमी होत असल्याचं लक्षात आलं. तर आपल्या आशियाई हत्तींच्या बाबतीत फक्त नराला सुळे असल्यानं त्यांची कत्तल झाली. पर्यायानं नर-मादीमधील संख्यासमतोलाला धक्का बसला. तरीही हत्तींनी बराच तग धरला हे आपण बघू शकतो. याचाच पुढचा भाग म्हणून आता अभ्यासकांना चिंतेत टाकणारी नवीन गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हत्तींच्या सुळ्यांमध्ये होणारे बदल. २०१५ मध्ये ड्युक विद्यापीठ आणि केनिया वाइल्डलाइफ सर्व्हिस यांनी संयुक्तपणे एक अभ्यास केला. साधारण २००५ ते २०१३ या काळामध्ये असलेल्या किंवा पकडलेल्या हत्तींच्या सुळ्यांचा अभ्यास केल्यावर त्याचा आकार लहान झाला आहे, असं लक्षात आलं. या (२००५ ते २०१३) काळातील हत्तींची तुलना ही १९६६ आणि १९६८ मधील हत्तींच्या सुळ्यांशी करण्यात आली आहे. अभ्यासात त्यांनी असं म्हटलं आहे, की १९७० चा शेवटचा काळ तर १९८०चा सुरुवातीचा काळ हा फार मोठ्या प्रमाणात हत्तींच्या सुळ्यांसाठी त्यांची कत्तल करण्याचा महत्त्वाचा काळ होता. त्या काळात या कत्तलींमधून वाचलेल्या हत्तींचे सुळे हे आकारानं लहान असल्याचं आढळून आलं.
हत्तींना सुळ्यांचा वापर कोणत्या गोष्टीकरता होतो तर अगदी आपल्या लक्षातही येणार नाही अशा वजनदार सोंडेला आराम मिळावा म्हणून ती सुळ्यांवर विशिष्ट पद्धतीनं ठेवतात. पाण्यासाठी खड्डा खणण्यासाठी सुळ्याचा वापर होतो. जमिनीमधील मिनरल्स काढण्यासाठी, तसंच जेव्हा मादीला आकर्षित करून छाप पाडण्यासाठी प्रयत्न चालू असतात तेव्हा त्यात भरदार सुळ्यांचं महत्त्व खूप असतं.
संपूर्ण हत्तीचं निसर्गचक्रातलं महत्त्व आपण पुढे बघूच, पण नुसत्या सुळ्यांवर अवलंबून असलेल्या काही गोष्टी या ठिकाणी नमूद कराव्याशा वाटतात. जंगलातील पाली त्यांना राहण्यासाठी झाडांच्या अशा भागाचा वापर करतात जिथे हत्तींनी सुळे घासलेले असतात. जेव्हा हत्ती सुळ्यांनी मिनरल्स अथवा इतर गोष्टींसाठी खणतो त्यामुळे जमिनीचा तो भाग हा अतिशय लहान अशा कीटकांना राहण्यासाठी, तसंच उदरनिर्वाहासाठी उपयोगात येतो. एकप्रकारे लहान जीव हत्तीवर अवलंबून आहेत. जर हत्ती बदलले, त्यांना सुळे नसले तर त्या गोष्टीचा थेट परिणाम अशा जीवांवर अथवा राहणीमानावर म्हणजेच पर्यायानं निसर्गावर होतो. बघायला गेलं तर ही गोष्ट छोटी पण दूरचा विचार केला तर डोंगराएवढी मोठी आहे.
केनियाप्रमाणेच गोराँगोसा (Gorongosa) नॅशनल पार्कमध्ये काम करणारे रेयॉन लॉंग यांनीही जॉइसपुली याच्याप्रमाणेच निरीक्षणं नोंदवली आहेत. या निरीक्षणांत ते म्हणतात की या परिसरात प्रचंड प्रमाणात शिकारी आढळून येतात ज्याचा पर्यायानं परिणाम असा झाला की हत्तीचे सुळे हळूहळू नाहीसे झालेलं लक्षात आलं. हुशार असलेल्या हत्तीला एक गोष्ट नक्की कळली आहे की आपल्या जगण्यामधला मुख्य अडथळा हे आपले सुळे आहेत. जर सुळे नसतील तर आपल्या मानव नावाच्या मित्राला आपल्याला मारण्याचं काहीच कारण नसेल.
मात्र हत्तींनी केलेला हा विचार फार भयंकर आहे असं मला वाटतं. एक तर सुळ्यांशिवाय हत्ती ही कल्पना सहन होत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुळ्यांशिवाय हत्ती जगतात, पण इतर जीवांवर त्याचा परिणाम होतोय. हे सुळे जर नैसर्गिकरीत्या नष्ट झाले असते तर जास्त त्रास झाला नसता, पण मानवाच्या हल्ल्यांतून वाचण्यासाठी हत्तींनी आपल्यात हा बदल केला हे जास्त त्रासदायक आहे.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link