Next
उत्सव सुफलनाचे
ललिता बर्वे
Friday, September 27 | 02:00 PM
15 0 0
Share this story


केळीचे उभे खांब, आंब्याच्या पानांचं तोरण, पाण्यानं भरलेला कलश, त्यावर ठेवलेला नारळ, कलशावर रेखलेलं गंध... असं म्हटलं, की आपोआपच तुम्ही उरलेलं पूर्ण कराल, सनईचे मंजुळ सूर, फुलांचा दरवळ, अत्तराचा सुगंध, नक्कीच काही शुभकार्य असणार. या सर्व गोष्टीच अशा आहेत, की मंगल, शुभ, आनंदी भावनांची, विचारांची तार आपल्या मनात ‘कुठेतरी’ छेडली जाते.
‘कुठेतरी’ म्हणजे नेमकी कुठे आणि का?
हे सर्व तपशील फर्टिलिटी रिच्युअल किंवा निर्मिती-सुफलनाच्या समारंभाचे भाग आहेत. त्यांची मीमांसा बघणं मनोरंजक आहे. नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते, आणि त्याचं पूजन होतं. घट किंवा कुंभ हे गर्भाशयाचं प्रतीक आहे आणि पूजा होते, ती देवीची, म्हणजे मातृतत्त्वाची. घटाभोवती माती असते, ही तर धरतीमाता आणि तिच्यामध्ये धान्य पेरलं जातं, जे नऊ दिवसांत उगवून येतं. हेही गर्भधारणा आणि नऊ महिन्यांची गर्भावस्था याचं प्रतीक आहे. दक्षिण भारतात अशी वराहलक्ष्मीची पूजा केली जाते. एखाद्या घड्याला चंदेरी रंग लावून किंवा देवीच्या मुखवट्यानं सुशोभित करतात. त्यामध्ये धान्य भरतात आणि तिची समारंभपूर्वक स्थापना करून पूजा केली जाते. हेही वैश्विक गर्भाशय, फलन यांचंच पूजन आहे.
कन्यापूजन किंवा कुमारिकापूजनाचा विधी, हा मुख्यतः भारताच्या पूर्व आणि उत्तर भागात आणि नेपाळमध्ये असतो. महाराष्ट्रातही काही ठिकाणी तो साजरा होतो. शक्तिपीठांच्या ठिकाणी तर तो आवर्जून असतो. या विधीमध्ये वयात न आलेल्या मुलींची पूजा केली जाते. देवीच्या कुमारी रूपात खूपच शक्ती असल्याचं मानलं जातं. जशी ब्रह्मचर्यामध्ये खूप शक्ती असते, तशीच शक्ती कौमार्यातही असते, कारण ही शक्ती अजून वापरलेलीच गेली नसते, ही यामागची समजूत.
आपल्या लग्नविधींना आणि मंगल प्रसंगांच्या वेळी, अगदी आवर्जून केळीचे खांब प्रवेशदारापाशी उभे करतात. अगदी कापडी मांडव घातला, तरी त्यावर केळीचं चित्र रंगवलेलं असतं. ते का, कारण केळीचं झाड केळी प्रसवतं आणि मग त्याचं जीवितकार्यच समाप्त होतं. तेव्हा सुफलनाचं याहून योग्य प्रतीक काय असणार? लग्नविधीत नवरा बायकोच्या भांगात सिंदूर भरतो. सिंदूर- लाल रंग, रक्त- वीर्य, अशी ही कल्पनेची साखळी आहे आणि तिचा अर्थ सुफलन असाच होतो. रक्ताच्या शंभर थेंबांपासून वीर्याचा एक थेंब बनतो, अशी समजूत आहेच. डोहाळेजेवण, गोदभराईसारखे समारंभ केले जातात. त्याला सामाजिक अर्थही असतो. दोन घटका मनोरंजन, डोहाळतुलीचं कौतुक, असा त्याचा अर्थ अवश्य असतो. पण त्याचा खरा अर्थ असतो, गर्भधारणा झाल्याबद्दल स्त्रीचा केलेला सन्मान.
सुफलन, सुफलनपूजा, आणि सुफलनसमारंभ याबद्दल लिहायचं, तर लज्जागौरीबद्दल लिहायलाच हवं. लज्जागौरी ही मूळ ग्रामदेवता. भक्ताला मुलं-बाळं, भरभराट इत्यादी देणारी आणि अधिक करून कुटुंबाच्या कल्याणावर लक्ष ठेवणारी, अपत्यप्राप्तीसाठी उत्सुक स्त्रिया लज्जागौरीची पूजा करतात. भारतीय देवतांच्या मूर्ती कधी गरोदर दाखवल्या जात नाहीत. एक तर मुलं होणार नाहीत असा त्यांना शापच होता आणि महत्त्वाचं म्हणजे गरोदर स्त्रीचं शिल्प कमनीय आकाराचं कसं असणार? पण लज्जागौरी याला अपवाद आहे, कारण तिचा हेतूच मुळी वेगळा आहे. विशेष म्हणजे तिला मस्तक नाही. इतक्या खासगी अवस्थेतील शिल्प असणं, हे कुणाही स्त्रीला, देवतेला संकोच, लज्जा वाटणारं आहे. म्हणून ती लज्जागौरी. तिचं खासगीपण जपण्यासाठी तिला चेहरा नाही. त्याजागी आहे कमळ. उजवीकडे झुकलेलं कमळ म्हणजे स्त्रीत्वाचं प्रतीक. वनस्पती, वेली पुनरुत्पादनाशी जोडलेले असतात. आदिवासी संस्कृतीतही असे संदर्भ सापडतात. लज्जागौरीच्या मूर्ती आठव्या शतकानंतर क्वचित बनवल्या गेल्या आहेत आणि बाराव्या शतकानंतर तर मुळीच नाही.
आसाममधलं कामाख्यामंदिर आणि तिथली कामाख्यादेवी प्रसिद्धच आहेत. शिवाचा अपमान झाला, त्यामुळे दक्षाकडच्या यज्ञात सतीनं आत्मसमर्पण केलं. दुःखानं वेडापिसा झालेला शिव, तिचं जळलेलं शरीर घेऊन सर्वत्र फिरला. तेव्हा सतीची महामुद्रा गळून पडली ती कामाख्यामंदिराची जागा. या महामुद्रेचं पूजन इथे केलं जातं, ते प्रजननक्षमतेचं प्रतीक म्हणून. इथे देवीची मूर्ती नाही. शक्तिपीठ असल्यामुळे इथे सर्व जाती-जमातीचे भक्त आणि तांत्रिकही लोटतात. प्रजननक्षमता महत्त्वाची, पूजनीय आहे ही कल्पना समाजमानसात किती खोलवर रुजलेली आहे, हेच यावरून अगदी ठळकपणे लक्षात येतं. दर वर्षी इथे अंबुबाची उत्सव असतो. अंबु म्हणजे पाणी आणि बाची म्हणजे वाची म्हणजे बोलणं. या दिवसांत देवी ऋतुमती असते, अशी समजूत आहे. मग देवळाचे दरवाजे बंद होतात. शेतीची कामं- जसं की खणणे, नांगरणं, इत्यादी केली जात नाहीत. विधवा, ब्रह्मचारी आणि ब्राह्मणमंडळी शिजवलेलं अन्न घेत नाहीत. चौथ्या दिवशी देवळाचे दरवाजे उघडले जातात. स्वच्छता करून दर्शन द्यायला देवी सिद्ध होते. या तीन दिवसांत देवळाच्या आतल्या पाण्याचा रंग लाल होतो अशी समजूत आहे. प्रसाद म्हणून अंगोदक- म्हणजे हे पाणी आणि अंगवस्त्र म्हणजे या पाण्यात बुडवलेला कापडाचा तुकडा दिला जातो. यामुळे भरभराट होते अशी समजूत आहे.
अंबुबाची मेळा भरतो तो मान्सूनच्या काळात म्हणजे पावसाळी महिन्यात. या दिवसांमध्ये पृथ्वीची प्रजननशक्ती वाढते. देवीची प्रजननशक्तीही तेव्हाच वाढते, हा काही निव्वळ योगायोग नव्हे. शिवाय मुलूखगिरीवर गेलेले पुरुषही या काळात शेतीसाठी घरी परतत असतात. म्हणजे नैसर्गिक, धार्मिक, सामाजिक आर्थिक अशा सर्वच घटकांचा या वेळी मेळ जमून येतो, आणि सुफलनासाठी सर्वच तऱ्हेनं पोषक वातावरण निर्माण होते. पावसाळ्यानंतर, सुगीच्या हंगामाच्या वेळी होणाऱ्या आपल्या कितीतरी सण-उत्सवांमध्येही हेच तत्त्व असतं, मग तो बैसाखी, पोंगल, ओणम, काहीही असो. अशा तऱ्हेच्या उत्सवांतून केवळ धरतीमातेला धन्यवादच दिलेले असतात असं नाही, तर तिला उत्तेजनही दिलेलं असतं, -छान छान, असंच चालू दे!
प्रजननक्षमतेशी संबंधित उत्सव सर्व संस्कृतींमध्ये चालतात. अमेरिका खंडामध्ये मका-माता किंवा मका-देवी ही फार महत्त्वाची. मेक्सिकोमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी मका उगवला आणि अमेरिकाभर पसरला. उत्तर आणि मध्य अमेरिकेतील ते महत्त्वाचं पीक आणि लोकांचं प्रमुख अन्न, इतकं की त्याच्याशी संबंधित मायासंस्कृतीची एक कथा आहे. माया देव कुकुल्कान आणि तेपो यांना अशी इच्छा झाली, की आपल्यासारख्या काही प्रतिकृती बनवाव्या. म्हणून त्यांनी माणसं बनवायचं ठरवलं. सुरुवातीला त्यांनी मातीचे पुतळे बनवले, परंतु ते ढासळून गेले. मग त्यांनी लाकडाची माणसं बनवली. मात्र त्यांच्यात काही जानच नव्हती. आत्मा नाही तर ते देवाशी एकनिष्ठ कसे राहणार? मग त्यांनी मक्यापासून माणूस केला. हा मात्र अगदी झकास झाला!
या सर्व प्रदेशांत मक्याचा उगम, लावणी, कापणी इत्यादीबद्दलच्या खूप गोष्टी आहेत. स्थानिक अमेरिकन, रेड इंडियन, माया, अॅझटेक, सर्वांच्या आपापल्या कथा आहेत. उदाहरण म्हणून चेरोके इंडियन लोकांची ही गोष्ट बघूया. कनाती आणि सेलू हे एक आदिम जोडपं. त्यांना एक मुलगा होता. मुलाला एक जंगली मित्रही होता. तो खरं तर शिकार केलेल्या प्राण्यांच्या रक्तापासून बनलेला होता. तर सेलू रोज सगळ्यांसाठी स्वंयपाक करायची. त्यासाठी ती कोठारातून रोज धान्य आणायची. एकदा ही मुलं तिच्या पाठोपाठ गेली. त्यांनी पाहिलं, की सेलूनं आपलं पोट घासून टोपलीभर मका मिळवला. मग शरीराची बाजू घासून टोपलीभर बीन्स मिळवले. विशेष म्हणजे ही कथा सर्वच जमातींत आहे आणि धान्य मिळवण्याची पद्धत कुठेच फारशी सुखद नाही! तर आपलं गुपित मुलांना कळलं असं सेलूच्या लक्षात आलं, तेव्हा ती मुलांना म्हणाली, आता मला मरावंच लागेल. परंतु त्याबरोबरच तुम्ही जे कष्ट न करता इतके दिवस जगलात, ते आता शक्य होणार नाही. एक करा, माझं शरीर सात वेळा मातीवरून फिरवा, आणि मग रात्रभर जागं राहून लक्ष ठेवा. सकाळी मका उगवून आलेला असेल. पण मुलांनी काही या सूचना धड पाळल्या नाहीत. त्यामुळे मका तसा आताही उगवतो, मात्र सेलूनं म्हटल्याप्रमाणे एका रात्रीत नाही!
सेलूनं मात्र मुलांच्या नशिबातले कष्ट पाहून नक्कीच सुस्कारा सोडला असेल. आपल्याकडच्या कथेमध्ये मुलगा आईला मारून तिचं काळीज घेऊन चाललेला असतो. तो वाटेत धडपडतो, तेव्हा आईचं काळीज कळवळून विचारतं, बाळा लागलं का रे? तिचाच हा नेटिव्ह अमेरिकन अवतार.
मकादेवता कसली, ही तर मकाआईच!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link