Next
आता लक्ष्य हिंदकेसरी
रवीराज गायकवाड
Friday, December 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story“आज वस्ताद असते, तर महाराष्ट्र केसरीची गदा त्यांच्या चरणी ठेवली असती”. महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखची ही डोळ्यात पाणी आणणारी प्रतिक्रिया. ज्या गुरुनं आपल्याला कुस्तीचे धडे दिले तो गुरू आज आपलं यश बघायला या जगात नाही, ही खंत बाला रफीक शेखच्या मनात आहे. तरीही, त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना गुरुदक्षिणा मानून बालानं जी मेहनत घेतली आज त्याचं चीज झालं. आज पाठीवर कौतुकाची थाप द्यायला वस्ताद नसले, तरी त्याचं स्वप्न पूर्ण केल्याचं समाधान आहे, असं बाला सांगतो.

कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीमध्ये ज्या ठिकाणी वस्ताद हिंदकेसरी गणपतराव आंदळकर बसायचे, त्या जागी बालानं महाराष्ट्र केसरीची गदा त्यांना अर्पण केली. अर्थातच न्यू मोतीबाग तालीम आणि तमाम कुस्तीप्रेमींसाठी हा क्षण अश्रू अनावर करणारा होता. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर याचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या जाण्यानं पोरक्या झालेल्या न्यू मोतीबाग तालमीत बालाच्या यशानं नवा उत्साह संचारलाय.

बालाचा तालीमतला वावर जवळपास दहा वर्षांचा. सहा फूट तीन इंच उंचीचा उत्साही तरुण गावाकडं वडिलांकडून कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर न्यू मोतीबाग तालमीत दाखल झाला होता. तिथच त्याच्या कुस्तीच्या कौशल्याला पैलू पडत गेले. बालाची चौथी पिढी कुस्तीत आहे. पणजोबांचा वारसा आजोबा बदरुद्दीन शेख यांनी पुढं नेला. त्यानंतर वडील आदम शेख यांनीही कुस्ती केली. त्यांनीच सुरुवातीपासून बालावर कुस्तीचे संस्कार केले. पुढं पैलवान नारायण पाटील, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, गणेश दांगट यांच्यासारखे गुरू भेटले आणि बाला महाराष्ट्र केसरी झाला. बालाचे भाऊदेखील कुस्तीत आहेत. राजू शेख, लखन शेख, समीर शेख हेदेखील बालासारखेच कुस्तीची मैदानं गाजवत आहेत.'

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातलं खडकी हे बालाचं मूळ गाव. गावात वडिलांची थोडी फार शेती. कमी पावसाचं क्षेत्र असल्यानं शेतीतलं उत्पन्न जेमतेमच. त्यामुळे वडिलांनी लाकडाचा व्यवसाय सुरू केला. मुलाला मोठा पैलवान बनवण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी बालाची तयारी सुरू झाली. गावात कुस्तीचे प्राथमिक धडे दिल्यानंतर त्यांनी बालाला कोल्हापूरला पाठवलं. सुरुवातीला खूपच आर्थिक ओढाताण झाली. कुस्ती शिकणं हे तसं खर्चिकच. कारण, दूध, बदाम, फळं, मांसाहार या खुराकासाठी खूपच पैसे खर्च करावे लागतात आणि हा खुराक एक दिवसही कमी पडून चालत नाही. त्यामुळे बालासाठी कोल्हापुरातील सुरुवातीचे दिवस खूपच आव्हानात्मक होते. वडील आणि भावानं लाकडाच्या व्यापारातून खुराकासाठी पैसे दिल्याचं बाला सांगतो. पुढे जसं छोटी, मोठी मैदानं मारून मिळणाऱ्या पैशांतून खुराकसाठी बालानं पैसे साठवले आणि घरच्यांवरचा भार थोडा हलका केला.

महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणं हे बालाचं स्वप्न होतं, पण, त्याला सतत हुलकावणी मिळत होती. चांगल्या कुस्ती करूनही बाला थोडा मागं राहिला. उपभारत केसरी झालेला बाला गेली काही वर्षे मोठ्या कुस्त्या करत होता. कोल्हापुरात हिंद केसरी स्पर्धा झाली होती. त्यावेळी त्यानं युद्धवीरला पाडलं होतं. ज्या युद्धवीरनं आघाडीचा पैलवान रोहित पटेलला पराभूत केलं होतं. त्या युद्धवीरला आस्मान दाखवणारा पैलवान म्हणून बालाची कुस्तीजगतात ओळख होती.

यंदा महाराष्ट्र केसरीसाठी जातानाच बाला यंदाचा दावेदार असल्याचं पैलवान मानत होते. दोन वर्षे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत लढत देणारे किरण भगत आणि अभिजीत चौधरी यंदा दोघेही या मैदानात नव्हते. त्यामुळे बालासाठी ही नामी संधी होती. त्याचं त्यानं सोनं केलं. अर्थात गेली दहा-बारा वर्षे त्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे गुरू गणपतराव आंदळकर यांनी त्याच्यावर घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं. आता हिंदकेसरी हे बालाचं पुढचे लक्ष्य आहे. त्या मैदानातही तो अशीच धडाकेबाज कामगिरी करेल, अशी अपेक्षा करू.

ताकद हेच बलस्थान
सध्या महाराष्ट्रात बालाच्या ताकदीएवढा कुठलाच पैलवान नाही. याआधीही अनेक मैदानांमध्ये पैलवान त्याच्या ताकदीला आव्हान मानत होते. आजही मानतात. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत अभिजीत कटकेविरुद्धही बालाची ताकदच कामी आली. अभिजीतच्या विरोधात दुसरा कोणी पैलवान असता, तर कदाचिक निकाल अभिजीतच्या बाजूनं लागला असता. पण, बालाच्या ताकदीपुढं अभिजीतला पराभव पत्करावा लागला. ताकद हीच जमेची बाजू असल्यानं पट काढणं आणि ढाक लावणं, ही बालाच्या कुस्तीची वैशिष्ठ्य असल्याचं त्याचे सहकारी पैलवान सांगतात. बाला कधीही बचावात्मक खेळत नाही. समोरच्या पैलवानावर ताकदीनं आक्रमण करणं, हीच त्याची मैदानावरची रणनिती असते.


  •  कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीमध्ये हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आणि  त्यांच्या डाव्या बाजूला बाला रफीक शेख.

वजन घटवलं

महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेच्या आधी काही काळ बालाचं वजन १४३ किलो होतं. ते कमी करण्याचं सर्वांत मोठं आव्हान त्याच्यापुढं होतं. त्यानं प्रचंड मेहनतीनं ते कमी करून दाखवलं. त्या जिद्दीमुळं तिथंच त्याच्या विजयाचा पाया रचला गेल्याचं मानलं जातं. त्यासाठी दिवसातून चार वेळा धावण्याचा सराव तो करत होता. पोहणं, जोर मारणं, फूटबॉल यातून त्यानं आपलं वजन १२५ किलोच्या आत आणलं. त्यासाठी आहारातही मोठे बदल करून घेतले. जेवण पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. उकडलेली अंडी, भाजलेलं चिकन, कडधान्य, मोसंबी ज्यूस आणि फळं असा त्याचा आहार होता.

बेताची परिस्थिती आणि बाला
आपली पोरं पैलवान व्हावीत, असं स्वप्न पाहणाऱ्या आदम शेख यांचे हात परिस्थितीनं बांधले होते. मोठी दोन्ही मुलं पैलवानकी करत असल्यानं घरचं दूध त्यांना जायचं. मला बालासाठी दूध कमी पडायचं. तर, बाला गावातच घराजवळ असलेल्या गुऱ्हाळ घरात जाऊन उसाचा रस प्यायचा. वडील आदम शेख बालाबरोबर कुस्ती करायचे. एकदा बालानं वडिलांना कुस्तीत पाडलं. त्यावेळी ‘आता तू कुणालाही पाडू शकतोस,’ हे वडिलांच्या तोंडचे शब्द घेऊन बालानं गाव सोडलं. आमदार नारायण पाटील यांच्या तालमीत थोडा सराव केल्यानंतर आमदार पाटील यांनी बालाच्या वडिलांना बोलवून घेतलं. “त्याला कोल्हापूरला पाठवायचं झालं तर किती खर्च करू शकता?” असा प्रश्न आमदार पाटील यांनी आदम शेख यांना केला. त्यावेळी वडिलांनी ३-४ हजार रुपये शक्य असल्याचं सांगितलं. त्यात आमदार पाटील यांनी ३-४ हजार खर्च करण्याची तयारी दर्शवली आणि कोल्हापुरातील त्याच्या ७-८ हजार रुपये खर्चाची जुळवाजुळव झाली. पुढे कुस्त्या जिंकत बालानं स्वतःचा खर्च स्वतः करण्यास सुरुवात केली.

हिंदकेसरी आंदळकरांचा  गुरूमंत्र
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी मला एकच गुरूमंत्र दिला होता. ‘तू मनापासून सराव कर, तुला सगळं मिळेल,’ या त्यांच्या सूचनेचं मी पालन केलं आणि आज इथवर पोहोचलो. आज जे काही आहे ते वस्तादांमुळे आहे. माझ्या या वाटचालीत करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्यासारख्या बऱ्याच लोकांचा वाटा आहे. त्यांचा मी कायम ऋणी राहीन.
- बाला रफीक शेख, महाराष्ट्र केसरी

माझी नवी ओळख
केवळ मलाच नाही, तर आमच्या गावाला बालाच्या यशाचा आनंद आहे. माझ्याबरोबर अनेक कुस्त्यांना तो आला होता. त्यामुळे आदमभाईचं पोर म्हणून त्याला ओळखतात. आता मला बालाचा वडील म्हणून ओळख मिळाली, यासारखा दुसरा आनंद नाही.
- आदम शेख, बाला रफीकचे वडील
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link