Next
ड्युटी फर्स्ट!
अमिता बडे
Friday, November 02 | 04:00 PM
15 0 0
Share this story


दिवाळी जवळ आली की प्रत्येकात उत्साह निर्माण होतो. घराची साफसफाई, फराळाचे विविध पदार्थ, स्वतःसाठी, घरच्यांसाठी काय खरेदी करायचे याचे विचार डोक्यात सुरू असतात. त्याचप्रमाणे ही दिवाळी अविस्मरणीय कशी करता येईल, याचा प्रत्येक जण विचार करत असतो. थोडक्यात सांगायचं तर सारा माहोल उत्सवी, उत्साही असतो. आपण सर्वच जण आप्तस्वकीयांसोबत आनंदानं दिवाळी साजरी करत असतो. मात्र त्याचवेळी ‘ड्युटी फर्स्ट’  असं म्हणत काही मैत्रिणी कामाच्या ठिकाणी वेळेवर हजर असतात. त्यात महिला पोलिस असतात, डॉक्टर, नर्स, मॉलमध्ये काम करणाऱ्या विक्रेत्या, सुरक्षा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांचा समावेश आहे. माटुंगा रेल्वेस्थानकाचा कारभार तर संपूर्णत: महिलांच्याच हातात आहे. 
सणासुदीच्या काळात त्यांना सुटी मिळणे दुरापास्त असते. त्यामुळे कामाच्या ठिकाणीच आनंदाचे काही क्षण वेचण्याचा प्रयत्न त्या  करत असतात. स्टेशनमास्तर म्हणून पदभार सांभाळणाऱ्या मीना संटी यांनी सांगितले,“ इथं ४१ जणी काम करत आहोत. आमच्यासाठी घरच्या जबाबदाऱ्यांबरोबरच कामाच्या ठिकाणची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे हे दोन्ही सांभाळणं खरं तर खूप कठीण असतं. त्यात आमच्या ड्युट्यांच्या वेळाही वेगवेगळ्या असतात. दिवाळीच्या काळात सर्वजण आपल्या कुटुंबीयांबरोबर आनंद घेत असताना आपण मात्र कामावर असतो याचं थोडं वाईट वाटतं… पण कामावर पोहोचेपर्यंतच… कारण एकदा काम सुरू झालं की त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात वेळ कसा जातो हे कळतच नाही. ऑफिस हे आमचं दुसरं घरच असल्यामुळे  त्याचीही सजावट करण्यासाठी सर्वच उत्सुक असतो. फराळाचे सर्व पदार्थ करायला जमले नाहीत तरी, बेसनाचे लाडू तरी करते.” स्टेशनच्या स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या अर्चना माने  म्हणाल्या,“मुलं लहान असताना सणासुदीच्या काळात त्यांना सोडून जायचं खूप जिवावर यायचं. इतर सर्व मुलांच्या आया घरी असतात आणि आपली आई मात्र ऑफिसला जाते हे पाहून मुलं हिरमुसली व्हायची…अशावेळी घरात पाय अडकायचा, पण कामावर यावंच लागायचं. आता मुलं मोठी झाली आहेत, सुना घरी आल्या आहेत त्यामुळे मी निश्चिंत आहे.” तर पार्वतीमावशी म्हणाल्या,“दिवाळीच्या काळात आपण घराबाहेर असतो पण घरातल्या लहान लेकरांसाठी म्हणून फराळाचे पदार्थ मी आवर्जून करते… बाहेर फराळ विकत मिळत असला तरी त्याला घरची चव कशी येणार? लेकरांचं कौतुक आपण नाही करायचं तर कुणी करायचं?” असा सवालही त्या करतात.

तिकीट तपासनीस (टीसी) म्हणून काम करणाऱ्या राधिका निगुडकर यांनी सांगितलं,‘आम्ही लहान असताना पारंपरिक पद्धतीनं दिवाळी साजरी केली. किल्ले बनवणं, फराळाचे विविध पदार्थ करताना आईला मदत करणं, उटणं लावून केलेलं अभ्यंगस्नान यातील आनंद अनुभवला. हाच आनंद आपल्या मुलाबाळांना मिळावा, यासाठी माझी धडपड असते. ऑफिस आणि घरातील वेळ यांचं योग्य नियोजन करून ते साधायचा प्रयत्न मी करते.”  माटुंगा स्थानकात पॉइंटमन म्हणून काम करणारी अनिता जावळे हिची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. मात्र कर्मचारीसंख्या कमी असल्यामुळे तिला सुटीच मिळालेली नाही. त्यामुळे  गावी राहणाऱ्या सासू-सासऱ्यांनी आग्रहाने बोलावून तिला जाता येणार नसल्याची खंत तिनं व्यक्त केली. अशीच खंत घरापासून दूर एकटी राहणाऱ्या आरपीएफमधील शीतल मुंडे हिनंही व्यक्त केली. ती म्हणाली,“ कामाच्या निमित्तानं मी घरापासून दूर राहते. दिवाळीत घरी जाण्याची ओढ अनिवार असते. पण ‘ड्युटी फर्स्ट’ म्हणत ही ओढ मनातच दाबून ठेवावी लागते…अशावेळी खूप निराश वाटतं. पण ड्युटीवर येऊन चारचौघांत वावरताना नैराश्य पळून जातं.” ‘सणासुदीच्या काळात सर्वजण नटूनथटून वावरतात, आम्ही युनिफॉर्मध्ये असतो. ऑफिसला जाता-येताना नवीन कपडे, साडी नेसून येतो आणि हौस भागवतो. अशावेळी आपणही बँक, ऑफिसमध्ये काम करत असतो तर, बरं झालं असतं, असं क्षणभर वाटतं, पण एरवी आम्हाला आमचं काम प्रिय असल्यानं सणासुदीच्या काळात वाटणारी खंत तात्पुरतीच असते,’असं त्या आवर्जून सांगतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link