Next
सनथ जयसूर्य नावाचं वादळ
सतीश स. कुलकर्णी
Friday, April 26 | 04:00 PM
15 0 0
Share this story

बाराव्या विश्वचषकस्पर्धेला ३० मेपासून सुरुवात होत असून क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. या निमित्ताने विश्वचषकस्पर्धेतील काही घटना, प्रसंग, गमतीजमती आणि खेळाडूंच्या पैलूंवर प्रकाश टाकणारी ही लेखमालिका.

धावफलक आकडे मांडतो फक्त! ते आकडे कुठल्या परिस्थितीतून उमटले आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय हे त्यातून सहज कळत नाही. भारत-पाकिस्तान-श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या १९९६च्या विश्वचषक क्रिकेटस्पर्धेत दोनशेहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिला आहे. स्पर्धेत पाचशेहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज. सनथ जयसूर्याचा क्रमांक तिथे सोळावा आहे. अर्जुन रणतुंग, असांक गुरुसिंह आणि अरविंद डीसिल्व्हा त्याच्याहून वरच्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेत किमान आठ किंवा अधिक बळी घेणारे १४ गोलंदाज आहेत. त्यात जयसूर्य सोडाच, श्रीलंकेचा एकही खेळाडू नाही.
असं असलं तरी स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ठरला सनथ जयसूर्य. सहा सामन्यांमध्ये २२१ धावा, सरासरी जेमतेम ३६.८३ आणि सात बळी. झेल घेतले पाच. हे आकडे चमकदार नाहीत, शिवाय ते सनथ जयसूर्याने नेमक्या वेळी केलेल्या खेळाची साक्षही देत नाहीत. समीक्षक तर असं सांगतात, की लाहोरला १७ मार्चचा अंतिम सामना होण्याआधीच या पारितोषिकासाठी सनथ जयसूर्याची निवड नक्की झाली होती. श्रीलंकेला विश्वचषक मिळवून देणारं डीसिल्व्हाचं खणखणीत नाबाद शतकही आड आलं नाही. कारण तोवर स्पर्धेवर त्याचा अमीट ठसा उमटला होता.
यजमानाला विश्वचषक जिंकता येत नाही, हा आतापर्यंतचा अनुभव श्रीलंकेनं मोडून काढला. विश्वचषक जिंकणारा तो तिसरा आशियाई देश बनला. स्पर्धेत बरेच जुने विक्रम मोडीत निघाले, नवे पायंडे पडले. सुरक्षिततेच्या कारणावरून श्रीलंकेत न खेळण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज यांनी घेतला. त्यामुळं गटवार लढतीत दोन विजयांचे चार गुण श्रीलंकेच्या खात्यात सहज जमा झाले. म्हणून त्यांची कामगिरी मुळीच कमी होत नाही.
आदल्याच विश्वचषकस्पर्धेपासून नवा नियम लागू झाला होता- डावातील पहिल्या १५ षटकांसाठी क्षेत्ररक्षणाचे निर्बंध (३० यार्डांच्या वर्तुळाबाहेर केवळ दोन क्षेत्ररक्षक). ‘पिंच हिटर’ संकल्पनाही त्याच स्पर्धेत जन्माला आली. ती खऱ्या अर्थानं अमलात आणून प्रतिस्पर्ध्यांना दणका दिला तो श्रीलंकेनं. जयसूर्य व रोमेश कालुवितरण यांच्या सलामीच्या जोडीनं सगळं गणितच बदलून टाकलं. तोपर्यंत पहिल्या १५ षटकांमध्ये ५०-६० धावा पुरेशा मानल्या जात. ही मर्यादा किती निर्दयीपणे ओलांडता येते, हे या जोडीनं दाखवून दिलं. त्याचा भारताला दोनदा, इंग्लंड व केनिया यांना प्रत्येकी एकदा फटका बसला. या षटकांमध्ये श्रीलंकेनं केनियाविरुद्ध १२३, भारताविरुद्ध साखळी सामन्यात १०७ आणि उपांत्य सामन्यात ८६, इंग्लंडविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात १२१ धावा केल्या. ही स्फोटक सुरुवात सगळं चित्र बदलून टाकणारी होती. त्याचा प्रमुख मानकरी होता अर्थातच सनथ जयसूर्य!
खरं तर हे दोघंही काही मूळचे सलामीचे फलंदाज नव्हते. श्रीलंकेचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यानं लिहिलं आहे, की मधल्या फळीत खेळताना या दोघांना आपली गुणवत्ता पूर्ण क्षमतेनं दाखवता येत नाही, हे कर्णधार रणतुंगानं ओळखलं. बेभान, बेडर खेळणाऱ्या या दोघांना सलामीला खेळवण्याचा निर्णय त्यानं घेतला. मुक्तपणे खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं.
रणतुंगच्या या निर्णयातूनच नवा इतिहास लिहिला गेला. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा सनत-रोमेश जोडीनं उठवला. सलामीच्या गोलंदाजांची त्यांनी बेदरकारपणे पिटाई सुरू केली. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू उचलून मारायला ते अजिबात कचरत नव्हते. दिल्लीत भारताविरुद्ध त्यांनी पहिल्या तीन षटकांतच ४२ धावा फटकावल्या. सनथ जयसूर्याच्या खेळीनं (७६ चेंडूंमध्ये ७९ धावा, ९ चौकार व २ षटकार) सचिन तेंडुलकरचं नाबाद शतक झाकोळलं गेलं. कँडी येथील केनियाविरुद्धच्या सामन्यात या जोडीनं ८३ धावांची सलामी दिली. त्यात सनथ जयसूर्याचा वाटा ४४ धावांचा म्हणजे २७ चेंडू, ५ चौकार व ३ षटकार. संघाचं अर्धशतक साजरं झालं, ते फक्त २० चेंडूंमध्ये.
फैसलाबादमधील उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेनं इंग्लंडचा ५ गडी व ५६ चेंडू राखून सहज पराभव केला तो सनथ जयसूर्याच्या अष्टपैलू खेळामुळे. त्यानं आधी ४६ धावा देऊन दोन गडी बाद केले. त्यातला महत्त्वाचा बळी फिलिप डीफ्रिटस. त्याच्याच ६७ धावांमुळे इंग्लंडच्या धावसंख्येला आकार आला. जयसूर्य फलंदाजीसाठी मैदानात उतरला तोच मुळी इंग्लिश गोलंदाजांची कत्तल करण्याचं लक्ष्य ठेवूनच. त्यानं ३० चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. विश्वचषकातील सर्वांत जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी. या सामन्यात त्यानं ४४ चेंडूंमध्ये ८२ धावा (१३ चौकार व ३ षटकार) केल्या. त्याचा स्ट्राइक रेट जबरदस्त होता- १८६.३६. या दिमाखदार विजयामुळे श्रीलंकेनं विश्वचषकाची उपांत्य फेरी पहिल्यांदाच गाठली.
कोलकात्यातील उपांत्य सामना हुल्लडबाजीमुळे थांबवावा लागला आणि श्रीलंकेनं अंतिम फेरीत प्रवेश केला. अर्थात, सामना पूर्ण खेळवला गेला असता, तर निकाल बदलला असता, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. पहिल्या १५ षटकांमध्ये फटकेबाजी करून प्रतिस्पर्ध्याला दोन पावलं माघार घ्यायला लावण्याची श्रीलंकेची योजना भारताविरुद्ध फसली. खात्यावर अवघी एक धाव असताना जावगल श्रीनाथ यानं दोन्ही सलामीवीरांना बाद केलं होतं. गुरुसिंगे लगेच बाद झाला. अरविंद डीसिल्व्हा, रोशन महानामा यांची अर्धशतके, रणतुंग, हशन तिलकरत्ने यांची साथ यामुळे श्रीलंकेला ५० षटकांत २५१ धावांची मजल मारता आली.
फलंदाजीत अपयशी ठरलेल्या सनथ जयसूर्याजयसूर्यनं मग आपल्या डावखुऱ्या फिरकीनं कमाल केली. अर्धशतक पूर्ण केलेला सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर व अजय जाडेजा यांचे बळी मिळवून त्यानं भारताची अवस्था एक बाद ९८ वरून आठ बाद १२० अशी दयनीय केली. त्यानं दोन झेलही घेतले. भारतीय संघाची पराभवाच्या दिशेनं वाटचाल पाहून प्रेक्षकांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे सामना थांबवावा लागला. भारत मैदानाबाहेरही पराभूत झाला होता तेव्हा!
लाहोरला झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाचा सात गडी व २२ चेंडू राखून सहज पराभव केला. विजयाचा मानकरी होता डीसिल्व्हा. गोलंदाजाची भूमिका पार पाडताना त्यानं तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला आकार देणाऱ्या मार्क टेलर व रिकी पाँटिग यांचा त्यात समावेश होता. नंतर डीसिल्व्हानं नाबाद शतक (१२४ चेंडूंमध्ये १३ चौकारांसह १०७ धावा) झळकावत विश्वचषकावर श्रीलंकेचं नाव कोरलं! अंतिम सामन्याचा मानकरी निर्विवादपणे तोच होता. जयसूर्य सात चेंडूंमध्ये नऊ धावा करून धावबाद झाला, तरीही या विजयात त्याचाही हातभार लागलाच- सर्वाधिक धावा करणारा टेलर व मार्क वॉ यांचे झेल त्यानंच टिपले.
ही स्पर्धा श्रीलंकेची, त्यातही सनत सनथ जयसूर्याची होती. डीसिल्व्हा चार वेळा सामन्याचा मानकरी ठरला, तर जयसूर्य दोन वेळा. पण सनथ जयसूर्यचा खेळ नेमक्या वेळी परिणामकारक ठरलेला, संघाच्या वाटचालीला वेगळी दिशा देणारा होता. त्यानं सहा सामन्यांतील सहा डावांमध्ये ३६.३३च्या सरासरीनं, २२१ धावा केल्या त्या फक्त १६८ चेंडूंमध्ये. त्याचा स्ट्राइक रेट तेव्हाच्या काळात अविश्वसनीय वाटावा असाच होता, १३१.५४. त्याच्या बॅटीतून बरसलेल्या २९ चौकारांनी आणि ८ षटकारांनी रसिकांना बेहद्द खूश केलं होतं. गोलंदाज म्हणून ३३च्या सरासरीनं सात गडी बाद करून आणि पाच झेल टिपून त्यानं आपली उपयुक्तता अधोरेखित केली होती. म्हणूनच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू निर्विवादपणे तोच ठरला. त्यानं घालून दिलेली वाट टी-२०च्या जमान्यात महामार्ग बनली आहे.n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link