Next
आव्हान जायबंदी न होण्याचं!
रविराज गायकवाड
Friday, March 29 | 03:00 PM
15 0 0
Share this story

गेली जवळपास दहा वर्षं भारतात उन्हाचा आणि आयपीएलचा तडाखा एकदम सुरू होतो. गेल्या आठवडाभरात ऊन जसं तापू लागलंय तसे आयपीएलचे रंगही गडद होऊ लागले आहेत. मुळात आयपीएल नेहमीच वादाचा विषय राहिलाय. दुष्काळात क्रिकेटच्या मैदानावर गवताला पाणी देणं योग्य आहे का, यापासून लोडशेडिंगच्या काळात डे-नाइट सामन्यांची चैन परवडणार आहे का, अशा अनेक विषयांनी आयपीएल नेहमी गाजत असते. पार्ट्या, स्पॉट फिक्सिंग, संघांवर बंदी, संघ मालकांची दिवाळखोरी हे सगळे विषय असले तरी आयपीएल केवळ भारताच्याच नव्हे, तर क्रिकेटजगाचा अविभाज्य भाग बनली आहे याविषयी कुणाचं दुमत नसावं. या सगळ्यात शेवटी विषय येतो क्रिकेट या खेळाचा!
मुळात आयपीएलचा टी-२० फॉरमॅटलाचा सुरुवातीला नावं ठेवण्यात आली. परंतु क्रिकेटप्रेमींनी ज्या पद्धतीनं या फॉरमॅटला उचलून धरलं त्यानं सगळ्यांचीच तोंडं बंद केली. आता विषय येतो या फॉरमॅटचा परिणाम क्रिकेटच्या पारंपरिक फॉरमॅटवर काय परिणाम होणार याचा. यंदाच्या आयपीएलचा विचार केला, तर आयपीएलमधील अंतिम लढत १२ मे रोजी होणार आहे आणि ३० मे रोजी इंग्लंडमध्ये विश्वचषकस्पर्धेला सुरुवात होईल. बाकीचे खेळाडू किंवा संघांचं सोडून देऊ, आपल्या संभाव्य भारतीय संघातील सर्व खेळाडू आयपीएलमध्ये उतरले आहेत. मग या खेळाडूंना विश्वचषकस्पर्धेच्या तयारीसाठी किती वेळ मिळणार हा खरा प्रश्न आहे.
मुळात भारतातील वातावरण आणि विश्वचषकस्पर्धा होत असलेल्या इंग्लंडमधील वातावरण यात जमीनअस्मानचा फरक आहे. त्यामुळे खेळाडूंना त्या वातावरणासाठी जुळवून घ्यायला वेळ देण्याची गरज आहे. पूर्वी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकांसाठी संघ दौऱ्यावर गेल्यानंतर, इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सरावसामने व्हायचे. आता संघांचे दौरेच एवढे घाईचे असतात,  की अशा सरावसामन्यांनासाठी वेळ ठेवलेलाच नसतो.
यापूर्वी, १९९९ साली इंग्लंडमध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकस्पर्धा झाली होती. त्यावेळी अझरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं फारशी समाधानकारक कामगिरी केली नव्हती. २००७च्या वेस्ट इंडिजमधील विश्वचषकस्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या पराभवानं भारताचं पॅकअप केलं होतं. तर, १९९९मध्ये इंग्लंडमध्ये झिंबाब्वेविरुद्धचा पराभव महागात पडला होता. सचिनच्या वडिलांचं निधन. त्याचं भारतात येणं आणि त्याच्या अनुपस्थितीत झालेला झिंबाब्वेविरुद्धचा सामना, हे सगळं नाट्यमय होतं. त्यानंतर भारतानं इंग्लंडमधली पराभवाची मालिका खंडित केली आहे. नेटवेस्ट ट्रॉफी असेल किंवा त्यानंतर २०१३मध्ये जिंकलेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, भारताला इंग्लंडमध्ये संधी आहे हे निश्चित. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून मार खाल्ला होता. या सगळ्याचा विचार केला तर, भारताला यंदाच्या विश्वचषकस्पर्धेमध्ये चांगली संधी आहे हे निश्चित. परंतु त्यासाठी गाफील राहून आणि तयारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

दुखापती हीच चिंता
एकदिवसीय विश्वचषकस्पर्धा खेळाडूंचा कस पाहणारी असते. यंदा ३० मे ते १४ जुलै, अशी दीर्घकाळ ही स्पर्धा चालणार आहे. (आयपीएलही तशीच, खेळाडू भारतभ्रमण करूनच थकतात.) या काळात खेळाडूंच्या मानसिक क्षमतेपासून शारीरिक क्षमतेपर्यंत सगळ्याचीच कसोटी लागणार आहे. त्यामुळे कोणताही खेळाडू पूर्ण तयारीनेच तिकडे जावा, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विश्वचषकस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयपीएलकडे पाहिलं तर चिंतेत भर पडते. परवाच्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. तो पुढच्या एका सामन्याला मुकणार हे जाहीर करण्यात आलं. अर्थात त्याची दुखापत कितपत गंभीर आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण, खेळाडूंची दुखापत ही भारतीयांसाठी आयपीएलची सर्वांत मोठी चिंता आहे, हे मान्य करावं लागेल.
आयपीएल नको, विश्वचषकस्पर्धेची तयारी करा, असं म्हटलं तर, खेळाडूंच्या पैसे मिळवण्याच्या हक्कावर गदा आणल्याची चर्चा होते आणि ज्या पद्धतीनं आयपीएलमध्ये पैशांची उलाढाल होते ती पाहता, विश्वचषकस्पर्धेसाठी आयपीएलवर कोणीच पाणी सोडणार नाही. ना बीसीसीआय, ना कोणताही व्यवसायिक खेळाडू. त्यामुळे आयपीएल खेळायची हे निश्चित ठेवून, किमान विश्वचषकस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जपून खेळ करावा, एवढं तर करावंच लागणार आहे.
भारतासाठी विश्वचषकस्पर्धेमध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी हे तीन वेगवान गोलंदाज हुकमी एक्के असतील. आजवर इंग्लंडमधील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदांजांना पूरक मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिथे लो स्कोअरिंग गेम्स जास्त पाहायला मिळायचे. परंतु इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या मालिकांचा विचार केला तर, छोटी मैदानं आणि बॅटवर सहज येणारे बॉल यामुळे इंग्लंडमध्येही हाय स्कोअरिंग गेम्स पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकस्पर्धेसाठी थोडी वेगळी तयारी करावी लागणार असल्याचं दिसतंय. गोलंदाज आणि फलंदाजांच्या दुखापतींचा विचार केला, तर तुलनेत गोलंदाजाची दुखापत गंभीर असते आणि त्यातून बाहेर पडायला त्याला खूप वेळ लागतो. त्यामुळेच बुमराहची दुखापत कितपत गंभीर आहे, याचा चिंता वाटते.
मुळात आयपीएल हा एक एंटरटेनमेंट व्हॅल्यू असलेला खेळ आहे, असं म्हटलं तर जास्त सयुक्तिक ठरेल. आता हा फॉरमॅट आपल्याशी कायमचा जोडलेला आहे. त्यामुळे त्याला स्वीकारावं लागेल. किंबहुना आपण ते स्वीकारलंय. आता एवढंच करावं लागेल, की या आयपीएलचा विश्वचषकस्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेवर परिणाम होणार नाही, आयपीएलमधील दुखापत एखाद्या खेळाडूची विश्वचषकस्पर्धा चुकवणार नाही, याची दक्षता खेळाडूंनी घेतली पाहिजे. तेव्हा बाबांनो, आयपीएल जरा जपूनच खेळा!

हरभजन काय म्हणतो पाहा!
भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंग यानं आयपीएलमधील दुखापतींच्या विषयाकडे लक्ष वेधलं आहे. हरभजन म्हणतो, ‘भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची चांगली संधी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं चांगली कामगिरी केली आहे, पण आयपीएलमध्ये खेळताना आपण दुखापतग्रस्त होणार नाही, याची काळजी खेळाडूंनी घ्यायला हवी. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमरहा या खेळाडूंना कोणतीही दुखापत होऊ नये, अशी माझी इच्छा आहे.’

गुरू गॅरी म्हणतात, ‘हा तर सराव’
आयपीएल की विश्वचषकस्पर्धा अशी चर्चा होत असली तरी, भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आयपीएल हा चांगला सराव असल्याचं म्हटलंय. भारताला २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात गॅरी कर्स्टन यांचा मोलाचा वाटा होता. कर्स्टन म्हणतात, ‘जर कोणी विराट कोहलीला आयपीएल न खेळता थेट विश्वचषकस्पर्धेत खेळ करण्याचा सल्ला दिला तर, ते योग्य नाही. कारण तुम्ही जेवढे सामने खेळात तेवढी तुमच्यात सुधारणा होत असते. विराट जर केवळ सराव करत राहिला तर ते चुकीचे ठरेल. मुळात आयपीएलमध्येही आंतरराष्ट्रीय सामन्यांसारखाच दबाव असतो. हा दबाव झेलण्याची क्षमता तुमच्यामध्ये वाढू शकते. त्यामुळे आयपीएल हा एक चांगला सराव आहे.’

आयपीएलचा परफॉर्मन्स आणि बीसीसीआय
भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आयपीएलच्या कामगिरीवर संघाची निवड अवलंबून नसल्याचं मत जाहीर केलं आहे. परंतु, बीसीसीआयच्या सूत्रांनी मात्र त्याच्याशी सहमती दर्शवलेली नाही. भारतासाठी मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार ही चिंता सतावत आहे. त्यासाठीची निवड ही आयपीलमधील खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचं बोललं जातंय. यात अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्यात चुरस आहे. त्यामुळे या चौघांच्या आयपीएलमधील कामगिरीकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.n

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link