Next
सुट्टीचे स्वागत
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, April 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story

“सुट्टी सुरू झाल्यावर आनंद होतो,” सोहम म्हणाला, “परीक्षा संपली, आता हवं तेवढं झोपायचं किंवा आराम करायचा हे थोडे दिवस बरं वाटतं, पण लवकरच वेळ कसा घालवायचा, तेच कळेनासं झाल्यामुळे कंटाळा येतो. म्हणून दरवर्षी एवढी लांबलचक सुट्टी देऊच नये.”
“एवढे व्हिडिओ-गेम्स आणि सिनेमे असताना सुट्टी कशी घालवायची हा प्रश्नच पडायचं कारण नाही,” सुट्टीत सोहमकडे आलेला खुशाल म्हणाला, “पण सोहमच्या आईला हे पटत नसल्यामुळे ती त्यासाठी मोबाइल किंवा कॉम्प्युटर देतच नाही. मग कंटाळा येणारच ना?”
“सोहमची आई करते ते बरोबरच आहे,” तनुजाताई म्हणाली, “व्हिडिओ-गेम्स आणि सिनेमात वेळ घालवणं हा काही सुट्टीचा चांगला उपयोग नव्हे. या गोष्टींची एकदा सवय लागली की सुट्टी संपल्यावर अभ्यासाकडे वळायलासुद्धा नकोसं वाटतं.”
“माझी आत्या तिच्या मुलांना पुढच्या वर्षीची पाठ्यपुस्तकं आणून अभ्यास करायला लावते,” अमना म्हणाली, “माझ्या बाबांच्याही ती मागे लागली होती. ‘सुट्टीत अभ्यास नको,’ असं बाबांनी तिला सांगितलं.”
“बाबांनी बरोबरच केलं,” विद्याताई म्हणाली, “सुट्टीत आनंदानं आणि आवडीनं करण्याजोग्या खूप गोष्टी आहेत.”
“सुट्टीचा जास्त चांगला उपयोग कसा करता येईल, हे ऐकायला खरं तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडेल,” सानिया म्हणाली.
सानियाच्या बोलण्यावर सर्वांनीच उत्साहाने मान हलवली.
“सांगतो!” उत्साहाने राहुलदादा म्हणाला, “अभयारण्यात गेल्यावर निसर्गसौंदर्याच्या आनंदाबरोबर जंगलातल्या वनस्पती, प्राणी, पक्षी, तसंच डोंगर, नद्या यांची माहितीही मिळते. संग्रहालयांना भेट दिल्यास मासे, पुरातन वस्तू, नाणी, नोटा, टपालतिकिटं यांची माहिती मिळते. विज्ञान-संग्रहालयांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि उद्योगांमधल्या गोष्टींचे नमुने, कार्य करणाऱ्या प्रतिकृती (वर्किंग मॉडेल), प्रत्यक्ष करायचे प्रयोग मांडलेले असतात. तारांगणांमध्ये (प्लॅनेटेरिअम) ग्रह, तारे, नक्षत्रं आणि विश्वाची रचना यांची दृक्-श्राव्य कार्यक्रमांमधून ओळख होते.”
“किल्ले, राजवाडे यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देताना इतिहास डोळ्यांसमोर साकारतो,” तनुजाताई म्हणाली, “लेण्यांना भेटी देऊन कलेच्या वारशाची माहिती होते. आनंदवन, भामरागडसारख्या ठिकाणी सामाजिक जाणिवा उंचावतात. सार्वजनिक काम कसं करावं याचा आदर्श वस्तुपाठ पाहून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते.”
“संभाषण, वक्तृत्व, स्वसंरक्षण आणि स्वयंपाक अशा वेगवेगळ्या कला शिकता येतात,” विद्याताई म्हणाली, “किंबहुना, मुलगा असो की मुलगी, प्रत्येकालाच या सगळ्या गोष्टी सहजपणे आल्या पाहिजेत. एखादी नवी भाषा शिकलात तर परदेशांमधल्या नोकरी-व्यवसायातल्या संधींचा फायदा मिळू शकतो.”
“उत्तम आरोग्य ही आयुष्यभर उपयोगी पडणारी गोष्ट आहे,” राहुलदादा म्हणाला, “आपली तब्येत उत्तम राहाण्यासाठी अनेक गोष्टी शिकता येतील. योगासनांचा आरोग्य उत्तम राखायला खूप उपयोग होतो. हवं तर, पीळदार शरीरासाठी व्यायामशाळेत जाता येईल.”
“या सर्वच गोष्टी करण्यासाठी लागणारी माहिती मिळवणं महाजालकामुळे (इंटरनेट) हल्ली खूपच सोपं झालं आहे,” विद्याताई म्हणाली, “संकेतस्थळांवरून (वेबसाइट) विविध अभयारण्यं, संग्रहालयं आणि संस्थांमधल्या सोयीसुविधा, तिकिटांचं आरक्षण, कामाच्या वेळा आणि सुट्या यांची माहिती मिळते. सेवाभावी संस्थांच्या संकेतस्थळांवर त्यांच्या कार्याची माहिती आणि स्वयंसेवक म्हणून काय शिकता आणि करता येईल, हे कळतं.”
“विविध कला आणि छंदांना वाहिलेली अनेक चांगली संकेतस्थळं आहेत,” तनुजाताई म्हणाली, “भाषा विनामूल्य शिकवणारी संकेतस्थळं आहेत. शिवाय अनेक उत्तम शब्दकोश, विश्वकोश आणि स्वामित्व अधिकार (कॉपी राईट) संपलेली विविध भाषांमधली अनेक चांगली पुस्तके महाजालावर विनामूल्य उपलब्ध आहेत. त्यांच्या वाचनात सुट्टी कशी संपली हेही कळणार नाही.”
“संशोधकांनी सुट्टीच्या परिणामांचा आणि त्यांच्या कारणांचा सविस्तर अभ्यास केला आहे,” विद्याताई सांगू लागली, “मानवाला सुट्टी का घ्यावी लागते याची कारणं त्याच्या जीवनपद्धतीशी निगडित आहेत. सर्वसाधारण प्राणी कळपातल्या इतर प्राण्यांचं पाहून जगण्यासाठी उपयोगी गोष्टी शिकतात. त्यासाठी त्यांच्या मुलांना शाळेत जाण्याची गरज नसते. निसर्गात जे मिळेल त्यावर प्राणी गुजराण करत असल्यामुळे त्यांना नोकरी-व्यवसायासाठी मोठेपणीही शालेय शिक्षणाची उणीव भासत नाही. तसंच, साठवण-क्षमतेच्या अभावी त्यांना जगण्यासाठी रोजच धडपडणं भाग असल्यामुळे मोठी सुट्टी घेणं शक्यही नसतं. गेल्या काही हजार वर्षांमध्ये मानवानं आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून अग्नीपासून शेतीपर्यंत विविध शोध लावत प्रगती करून स्वतःचं जीवन समृद्ध बनवलं. यातूनच विविध ज्ञानशाखांचाही प्रचंड विस्तार झाला. परिणामी, लहानपणी शाळेत आणि तरुणपणी महाविद्यालयात जाऊन पद्धतशीरपणे शिकणं महत्त्वाचं ठरू लागलं. विज्ञान-तंत्रज्ञानातले भविष्यकालतज्ज्ञ म्हणतात, ‘विज्ञान-तंत्रज्ञानाची क्षितिजं आता तर एवढ्या झपाट्यानं विस्तारू लागली आहेत की पुढच्या पिढ्यांना तर आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकतच राहावं लागेल, नाहीतर त्या व्यक्ती कालबाह्य होऊन निरुपयोगी बनतील!”
“बापरे, म्हणजे आयुष्य़भर शिकतच राहायचं? किती कंटाळवाणं होईल ते!” सोहम म्हणाला.
“अगदी बरोबर, सुट्टी महत्त्वाची ठरते ती याचमुळे!” तनुजाताई म्हणाली, “सतत त्याच गोष्टी करून मेंदू कंटाळतो. त्यातून सुटका होण्यासाठी जगातल्या सर्व देशांमध्ये शाळांना सुट्टी देतात. ताजंतवानं होऊन परत पुढच्या वर्षाचा अभ्यास करण्यासाठी आणि इतर उपक्रमांमध्येही नव्या दमानं सहभागी होण्यासाठीही मोठ्या सुट्टीची गरज असते.”
“सुट्टीतल्या उपक्रमांमुळे शरीर, बुद्धी आणि मन ताजंतवानं होऊन त्यांची कार्यक्षमता आणि मेंदूची सृजनशीलता वाढते,” स्वप्निलदादा म्हणाला, “मुलांच्या समतोल विकासासाठी आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्व अंगानी बहरण्यासाठी मोठी सुट्टी फारच उपयोगी पडते. शिवाय, वेगवेगळ्या उपक्रमांमधून आपल्या आवडी-निवडी आजमावता येतात. त्यातून भावी विकासाची, शिक्षणाची आणि करिअरची दिशाही आपल्याला गवसू शकते.”
“हे सगळं ऐकल्यावर मला वाटायला लागलं आहे, मोठी सुट्टी कंटाळवाणी नसून ती एक सुसंधीच आहे. तिचं आनंदानं आणि उत्साहानं स्वागत करायलाच हवं!” सोहम उद्गारला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link