Next
राष्ट्रीय संरक्षण अकादमी परीक्षा
फारुक नाईकवाडे
Friday, November 30 | 05:41 PM
15 0 0
Share this story

बारावी  परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संरक्षणसेवेमध्ये करिअर करण्यासाठी ही परीक्षा म्हणजे उत्तम संधी आहे. या परीक्षेतून राष्ट्रीय संरक्षण अकादमी या सर्व सेनादलांसाठीच्या अकादमीमध्ये प्रवेश मिळतो. या अकादमीतून पदवी व प्राथमिक प्रशिक्षण घेऊन आपापल्या पसंतीच्या संरक्षणसेवेमध्ये प्रवेश मिळतो आणि तेथील विशिष्ट प्रशिक्षणानंतर त्या त्या सेवेमध्ये कमिशन्ड अधिकारी म्हणून प्रवेश मिळतो.

  • उमेदवारांसाठी पात्रता
 वयोमर्यादा व वैवाहिक दर्जा
 फक्त अविवाहित पुरुष उमेदवारांनाच या परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येतो. उमेदवाराचे वय परीक्षा असेल त्या वर्षीच्या २ जानेवारी रोजी किमान १८ वर्षे पूर्ण आणि कमाल २१ वर्षे असावे.
 
  • शैक्षणिक पात्रता
उमेदवार दहा अधिक दोन पद्धतीने कोणत्याही शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाची १२वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
 
  • परीक्षा योजना
ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि कर्मचारी भरती मंडळ (SSB) यांच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात येते. परीक्षेचा लेखी टप्पा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून तर बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व चाचणीचा टप्पा कर्मचारी भरती मंडळाकडून आयोजित केला जातो. परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणेः


 

  • लेखी परीक्षा
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ प्रकारचे असते आणि प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांमागे मिळालेला एका उत्तराचा गुण वजा करण्यात येतो. दोन्ही पेपर हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असतात. सामान्य क्षमता चाचणीमधील इंग्रजी भाषा हा विभाग फक्त इंग्रजीमध्ये असतो. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेच्या जाहिरातींमध्ये सविस्तरपणे देण्यात आलेला आहे.
 
  • बौद्धिक व व्यक्तिमत्त्व चाचणी
या टप्प्यास एसएसबी प्रक्रिया म्हणतात. ही प्रक्रिया टप्पा एक आणि टप्पा दोन अशा पद्धतीने पार पडते. टप्पा १ मध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवार टप्पा दोनसाठी पात्र ठरतात.

  • एसएसबी टप्पा १
यामध्ये अधिकारी बुद्धिमत्ता रेटिंग (Officers Intelligance Rating -OIR) आणि चित्रबोधन वर्णन परीक्षा ( Picture Perception & Description Test PP&DT) या दोन परीक्षांचा समावेश होतो. एसएसबी टप्पा दोनसाठी उमेदवारांची निवड करण्यात येते.

  • एसएसबी टप्पा २
यामध्ये मुलाखत, घटकचाचणी, मानसशास्त्रीय चाचणी व परिसंवाद यांचा समावेश असतो. या टप्प्याबाबत विस्तृत माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हे दोन्ही टप्पे मिळून चार दिवस ही चाचणी चालते.
 
एसएसबी टप्प्यातील मूल्यमापन हे मुलाखतकार अधिकारी (IO), गट चाचणी अधिकारी (GTO) व मानसशास्त्रज्ञ यांच्याकडून एकत्रितपणे करण्यात येते. उमेदवारांमध्ये अधिकाऱ्यांसारखे गुण आहेत का, तसेच ते प्रशिक्षणक्षम आहेत का याची खातरजमा करण्यात येते. या आधारावर कर्मचारीनिवड मंडळाकडून उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस करण्यात येते.

  • निवड व पुढील प्रक्रिया
निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश मिळतो. हा प्रवेश घेताना उमेदवाराच्या पालकाने एक प्रमाणपत्र व बॉंड लिहून देणे आवश्यक असते. प्रशिक्षणादरम्यान उमेदवार जखमी, शारीरिकदृष्ट्या अक्षम झाल्यास किंवा मृत्यू पावल्यास कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई तो किंवा त्याचे पालक मागणार नाहीत याची हमी यातून द्यावी लागते. तसेच, हे प्रशिक्षण मधूनच सोडण्याचा निर्णय उमेदवाराने घेतल्यास त्याच्या प्रशिक्षणावर तोपर्यंत झालेला खर्च भरून देण्याची हमीही द्यावी लागते.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये सर्व सेनादलांसाठीचे तीन वर्षांचे मूलभूत शारीरिक व शैक्षणिक प्रशिक्षण देण्यात येते. यातील अडीच वर्षे सर्वांसाठीचे समान प्रशिक्षण असते तर शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार त्या त्या सेनादलाशी संबंधित अभ्यासक्रम असतो. तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पुढीलपैकी एक पदवी मिळतेः

  • लष्कर कॅडेट्स - बीएससी/ बीए
  • नौसेना कॅडेट्स - बीटेक
  • वायुदल कॅडेट्स - बीटेक
अशा प्रकारे राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांनी परीक्षेचा अर्ज भरताना दिलेल्या सेनादलांच्या प्राधान्यक्रमानुसार पुढील संस्थांमध्ये प्रवेश देण्यात येतोः

1. भारतीय लष्करी अकादमी, डेहराडून
2. भारतीय नौसेना अकादमी, एझीमाला
3. वायुदल अकादमी, हैदराबाद

लष्करी व नौसेना अकादमीमध्ये एका वर्षाचे तर वायुदल अकादमीमध्ये दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवारांना त्या त्या दलांमध्ये स्थायी कमिशन मिळते. लष्करामध्ये लेफ्टनंट, नौसेनेमध्ये सबलेफ्टनंट आणि वायुदलामध्ये फ्लाईंग ऑफिसर या पदांवर उमेदवारांची नियुक्ती होते. ही तिन्ही पदे एकमेकांशी समकक्ष आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link