Next
आवड अभिनयाचीच!
अनन्या जे.
Friday, January 04 | 04:15 PM
15 0 0
Share this storyलहानपणापासूनच अभिनय ही माझी पॅशन होती आणि आहे. मला जर कोणी विचारलं, की तू अभिनेता नसता तर कोण बनला असता? या प्रश्नाचं उत्तर देणं माझ्यासाठी खरंच खूप अवघड आहे. फार तर मी कायद्याशी संबंधित काही करत असतो. अभिनय सोडून मी खरंच दुसऱ्या क्षेत्राचा कधी विचारच केला नाही. माझं पूर्ण बालपण नाशिकमध्ये गेलं. शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही नाशिकमध्येच झालं. लहानपणापासूनच जरा मस्तीखोर असल्यामुळे आई-बाबांचा भरपूर ओरडा खाल्ला आहे. आई शिक्षिका असल्याने, तशी ती खूप शिस्तप्रिय, काटेकोर. तिचं अक्षरही खूपच सुंदर. त्यामुळे अक्षरासाठी मी बऱ्याचदा ओरडा खाल्ला आहे. मला कार्टून्स बघायलाही खूप आवडायचं, त्यामुळे सतत टीव्ही बघण्यावरूनही मी बराच ओरडा खाल्ला आहे. परंतु माझी आवड जोपासायला माझ्या घरून मला नेहमीच पाठिंबा मिळाला.

‘श्यामची आई’ नाटक मिळालं
नाशिकमधील डे केअर सेंटरमधून माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. खरं सांगायचं तर माझ्यात अभिनयाची गोडी निर्माण झाली ती शाळेमुळेच. अभिनय हे करिअर म्हणून निवडण्यात शाळेचा मोठा वाटा आहे. शाळेत असताना स्नेहसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन यात मी आवर्जून सहभागी व्हायचो. तेव्हापासूनच मला थिएटरची आवड निर्माण झाली. ही आवड लक्षात घेऊन बाबांनी सुट्टीत सिद्धार्थ अहिरे यांच्या अभिनयकार्यशाळेत मला पाठवलं. नाट्यशिबिरानंतर अहिरेसर याच शिबिरातील मुलं निवडून एक व्यावसायिक बालनाट्य करणार होते. काही दिवसांनी त्यांचा मला फोन आला. ‘श्यामची आई’ हे नाटक त्यांनी बसवलं होतं आणि या नाटकातील श्यामच्या भूमिकेसाठी त्यांनी माझी निवड केली होती. वयाच्या पाचव्या वर्षी मी माझं पहिलं व्यावसायिक नाटक केलं. या नाटकाचे महाराष्ट्रात सुमारे साडेपाचशे प्रयोग झालेत. शाळेत असताना प्रणव पगारे लिखित ‘प्लॅटफॉर्म’ ही बालनाट्य एकांकिकाही केली होती. माझ्यात अभिनयाविषयी गोडी निर्माण होण्यात शाळेचा, आई-बाबांचा जितका वाटा आहे, तितकाच किंबहुना त्याहून जास्त मोलाचा वाटा माझ्या आजोबांचा आहे. आजोबा लेखक असल्यानं माझ्यात हे गुण उपजतच आहेत. शाळेत बालनाट्य, एकांकिका स्पर्धा आम्ही करायचो त्यावेळी अडीच-तीन महिने आम्ही त्याची तालीम करायचो. त्यामुळे शाळेत गेल्यानंतर पहिल्याच तासाला शाळेच्या हॉलमध्ये जायचो आणि दिवसभर तिथे नाटकाची तालीम करायचो. मजा करायचो. मधल्या सुट्टीत वर्गात यायचं, काय काय झालं याची चौकशी करायची आणि परत वर जायचं. मग शाळा सुटल्यावर थेट घरी जायचं. यामुळे कधी कधी शिक्षकांकडून ओरडाही मिळाला. यातही खूप मजा असायची.

असा सुरू झाला क्षेत्रातला प्रवास...

कॉलेजमध्ये असताना मी ‘अश्वमेध थिएटर’ या ग्रुपमध्ये सहभागी झालो. त्यातून मी बऱ्याच एकांकिका, राज्य नाट्यस्पर्धा केल्या. ‘देवबाभळी’ नाटकाचा लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यानं लिहिलेली ‘रेन मेकर’ ही एकांकिका केली. या काळात मला अनेक नाट्यस्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाची बक्षिसंही मिळाली. हे सगळं करत असतानाच मी पहिली मालिका केली. त्यात माझी अगदीच नगण्य भूमिका असली तरी मी पहिल्यांदाच कॅमेऱ्याला सामोरा गेलो होतो. त्याच प्रॉडक्शन हाऊसची आणखी एक मालिका केली. त्यात माझी बऱ्यापैकी मोठी भूमिका होती.मालिका सुरू असतानाच तीन चित्रपटही केले. ‘टाइम बरा वाईट’ हा माझा पहिला चित्रपट, त्यानंतर मी ‘भय’ आणि ‘नेबर्स’ हे चित्रपट केले. या तिन्ही चित्रपटांत मी ‘सेकंड लीड’ होतो. त्यानंतर मला मालिका मिळाली ज्यात माझी मध्यवर्ती भूमिका होती. हे सगळं करता करता मला प्रमुख भूमिका साकारण्यासाठी झी युवावरील ‘तू अशी जवळी राहा’ ह्या मालिकेची संधी चालून आली.

‘अनन्या’साठी नशीबवान समजतो
मी सध्या ‘अनन्या’  नावाचं व्यावसायिक नाटकही करतो आहे. या नाटकात मी एक वेगळ्या पद्धतीची भूमिका साकारत आहे. या नाटकाचे सुमारे दोनशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. या नाटकाला बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. मलाही या नाटकासाठी साहायक कलाकार म्हणून बरेच पुरस्कार मिळाले आहेत. ‘दीनानाथ मंगेशकर’ हा मानाचा पुरस्कारही या नाटकाच्या निमित्तानं मिळाला आहे. संस्कृती कलादर्पणसारखे अनेक पुरस्कार ‘अनन्या’मुळे मिळाले. लेखक, दिग्दर्शक प्रताप फड यांनी माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासामुळेच हे शक्य झालं. मी स्वतःला नशीबवान समजतो, की ‘अनन्या’मध्ये माझा सहभाग आहे.

घरच्यांमुळेच घेतला हा निर्णय  
बालनाट्य करत असल्यापासूनच मला घरच्यांकडून खूप सहकार्य लाभलं. मी दहावीत असतानाही माझ्या नाटकाचे प्रयोग होते, तालिमी सुरू होत्या. तरीही माझ्या घरच्यांनी मला अभ्यासासाठी कधी दडपण आणलं नाही. मुळात त्यांना माझी आवड माहीत असल्यानं त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला. त्यांचा विश्वास, सहकार्य पाठीशी आहे, म्हणूनच अभिनय हे करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय मी घेऊ शकलो. माझ्या या निर्णयाबाबत त्यांचा विरोध कधीच नव्हता. फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं, ते म्हणजे मी आवड जोपासत असतानाच शिक्षणही पूर्ण करावं. त्यामुळे अभिनयासोबत लॉचं शिक्षणही पूर्ण केलं.                                   
     
आता मुंबई सोडवत नाही !
संघर्ष हा प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो. फक्त तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. मी नाशिकचा असल्यामुळे, नाशिक सोडून दुसरीकडे राहण्याचा कधी संबंधच आला नाही. कामानिमित्तानं  घर, आई-बाबा, आणि नाशिक सोडून मुंबईला स्थायिक झालो. सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी एखाद वर्षाचा हा काळ माझ्यासाठी खूप संघर्षाचा होता. मला या सर्व गोष्टींशी जुळवून घेताना जरा जड गेलं. मात्र हळूहळू त्याची सवय झाली आणि आता खरं सांगायचं तर मुंबई अजिबात सोडवत नाही. आणि अभिनयातील संघर्षा म्हणजे मनासारखी भूमिका मिळणं, चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत राहणं. अशा प्रकारचा संघर्ष तर या क्षेत्रात प्रत्येकाच्या वाटेला येतो. खूप खडतर अनुभव आले,असं मी म्हणणार नाही पण काही कडू, गोड अनुभव मात्र नक्कीच आले. ज्यातून मला बरंच काही शिकता आलं. तीन वर्षांपूर्वी जेव्हा मुंबईत आलो तेव्हाचा मी आणि आताचा मी, यात मला स्वतःलाच खूप बदल जाणवतो. या क्षेत्रात करिअर करताना अनेक अनुभव आले, येत आहेत आणि यावेत. कारण त्यामुळेच माणूस प्रगल्भ होतो.

आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर कलाटणी
माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण म्हणजे ‘अनन्या’ हे नाटक.  प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात. जसं शाळेत असताना मला ‘श्यामची आई’ नाटक, महाविद्यालयात असताना ‘रेन मेकर’ ही एकांकिका मिळाली. हे सर्व करत असतानाच ‘अनन्या’सारखं नाटक मिळणं, झी युवावरील ‘तू अशी जवळी राहा’ मालिका मिळणं हे सोन्याहून पिवळं झालं. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांवर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे क्षण येत गेले. काही महत्त्वाची माणसं मला यादरम्यान भेटल्यामुळे आयुष्याला कलाटणी देणारा अनेक क्षण आले आणि भावी आयुष्यातही ते येतच राहतील.

राजवीर आणि माझ्यात अजिबात साम्य नाही...

‘तू अशी जवळी राहा’ मध्ये मी राजवीर मोहितेपाटील नावाची व्यक्तिरेखा साकारतो आहे. नावाप्रमाणेच ही भूमिकाही भारदस्त आहे. भूमिका जरी मला आवडली असली तरी राजवीर आणि माझ्यात अजिबातच साम्य नाही. कारण मी मनातलं लगेच बोलतो, भावना व्यक्त करतो.राजवीर तसा नाही, त्यानं आयुष्यात बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीनं अनुभवल्या आहेत, त्याची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे, तो खूप वर्चस्व गाजवणारा आहे आणि मी तसा अजिबात नाही. मी खूप बोलका आहे, मला मैत्री करायला आवडते. माझ्या स्वभावाच्या, व्यक्तिमत्त्वाच्या अतिशय विरुद्ध असलेली ही भूमिका साकारताना खूप उत्सुकता होती. अशा प्रकारची भूमिका मी याआधी कधीही केली नव्हती.

... ज्यात ‘मी’ नसेन!
अभिनय माझं सर्वस्व आहे. प्रेम आहे. त्यामुळे मला अमुकच भूमिका साकारायची आहे, असं नाही. तरीही मला अशा प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतील, ज्यात ‘मी’ नसेन. मला स्वतःतील अशी बाजू शोधायला आवडेल, ज्याचा मी याआधी कधीच शोध घेतला नसेन. अशी भूमिका करायला आवडेल, जी करताना मी अस्वस्थ होईन. माझ्यासाठी आव्हानात्मक असेल. एखादी भूमिका स्वीकारताना, ती मी करू शकेन का, हे मला जमेल का, असे अनेक प्रश्न जेव्हा निर्माण होतील, तेव्हा हे आव्हान स्वीकारायला मला नक्कीच आवडेल.

अभिनय महत्त्वाचा
माझी सुरूवात नाटकापासून झाली. नाटकामध्ये सहजता असते. नाटकांची गंमत निश्चितच वेगळी आहे. मला असं वाटतं नाटकाची जशी वेगळी गंमत आहे तशीच मालिकांची, सिनेमाचीही वेगळीच गंमत आहे. प्रत्येक माध्यमाची एक वेगळी भाषा आहे. भविष्यात वेबसीरिजमध्ये काम करायलाही नक्कीच आवडेल. अभिनय ही माझी पॅशन असल्यामुळे माझ्यासाठी माध्यम कोणतंही असो, अभिनय महत्त्वाचा आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link