Next
पहिली शाळा निवडताना...
सूनृता सहस्राबुद्धे
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

सध्या बालवाड्यांचे अनेक पर्याय पालकांना उपलब्ध असतात, पण त्यातली नक्की ‘चांगली’ बालवाडी कुठली हे ठरवणं कधी कधी अवघड जाऊ शकतं. त्यामुळेच पालकांनाही बालवाडी निवडण्याचं काम आव्हानात्मक वाटू शकतं. मुलांच्या विकासाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी, अनेक वैज्ञानिक संशोधनांचा आधार घेत एखादी बालवाडी, एखादी लहान मुलांची शिकण्याची जागा, कशी असावी याविषयीचे मत विविध ठिकाणी नोंदलेलं दिसतं. त्याचा आढावा आपण या लेखात घेऊया.
मुलाची मातृभाषा हे शाळेचं माध्यम असणं सर्वात योग्य ठरतं, याबद्दल सर्व तज्ज्ञांचं एकमत दिसतं. इतर भाषा लहान मुलांना जरूर शिकायला मिळाव्यात,  मात्र शाळेचं मुख्य माध्यम मुलाची मातृभाषा असावी, असा सल्ला विविध पाहण्या देतात. ज्या भाषेतून जग समजून घ्यायला मुलानं सुरुवात केली आहे, त्या भाषेनं शाळेच्या औपचारिक वातावरणात मुलाला साथ दिली तर ते त्याच्या स्व-प्रतिमेच्या बळकटी करणाच्या दृष्टीनं आणि अभ्यासातील यशाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. इतर भाषा मुलाला सहजपणे शिकता याव्यात याची खात्री करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याला मातृभाषेतून शिकण्याची संधी देणं, याची आपण पक्की खूणगाठ बांधावी. तीन ते सहा या वयोगटातल्या मुलांसाठी बालवाडीची वेळ तीन ते चार तासांपेक्षा जास्त नसावी. या वयोगटातली मुलं कुठलीही कृती साधारण १५ ते २० मिनिटं सलग करू शकतात. त्यामुळे साहित्य वाटण्या-आवरण्याचा वेळ धरता एक तासिका अर्ध्या तासाहून जास्त वेळाची असू नये. एक बैठी कृती झाल्यावर एक शारीरिक हालचालींना वाव देणारी कृती असावी. शाळेचं वेळापत्रक हे अशा एकआड एक प्रकारच्या कृतींचं बनलेलं असावं.

मुलांनी आई-बाबांसोबत करायच्या गमतीच्या गोष्टी शाळेनं जरूर सुचवाव्यात, पण ते सोडता बालवाडीत घरी गृहपाठ देण्याचं खरंतर काहीच कारण नाही! बालवाडीच्या मुलांचं घरी आल्यावरही शिकणं सुरूच असतं, हे न समजलेलं शाळाव्यवस्थापनच घरी वेगळा गृहपाठ देण्याचा विचार करतं!
शाळेत शिस्त लावण्याच्या, शिक्षेच्या कुठल्या पद्धती वापरल्या जातात, हेही समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. स्वतःच्या वागण्यावर ताबा मिळवणं हे एक कौशल्य आहे आणि ते आत्मसात करण्यासाठी आपल्याला मुलांना मदत करायची आहे, ही जाणीव त्यातून प्रतीत होते का हे बघणं गरजेचं आहे. कुठल्या वागण्याला शिक्षा केली जाते, यावरूनही शाळेचा मुलांच्या वाढीविषयी कितपत अभ्यास झालाय ते लक्षात येतं. ‘लहान मुलं कशी शिकतात, त्यांना कसं शिकवायचं असतं’ ही अभ्यास करण्याची गोष्ट आहे ही जाणीव शाळा व्यवस्थापनाला आहे का, शिक्षकांना शिकण्याच्या कोणत्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, त्यांना नोकरीवर घेण्याआधी कुठला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट घातली जाते का, या गोष्टी बघणंही खूप महत्त्वाचं आहे.

अभ्यासक्रमाचा विचार करता– अक्षरं, आकडे लिहिणं, वाचणं हे बालवाडीत यावं अशी अपेक्षा अयोग्य आहे, याची स्पष्टता शाळा व्यवस्थापनाला आहे का हे जरूर बघावं. बालवाडीत कोणत्या प्रकारच्या खेळातून या कौशल्यांची पूर्वतयारी होते हे आपणही समजून घ्यावं. बालवाडी ही प्राथमिक शाळेतल्या गोष्टी आधीच शिकू लागण्याची जागा नाही. प्राथमिक शाळेत शिकाव्या लागणाऱ्या गोष्टी त्या त्या इयत्तेत गेल्यावर छान शिकता याव्यात यासाठीची पूर्वतयारी करण्याची ही जागा आहे. पहिलीत अक्षरओळख शिकायची असेल तर बालवाडीत तीच गोष्ट करायला लावणं म्हणजे ‘तयारी’ नाही! हे म्हणजे वर्षाचं झाल्यावर बाळांनी चालावं म्हणून एक महिन्याचं असताना त्याला सक्तीनं चालायला लावण्यासारखं आहे. बाळाचं हवेत हातपाय हलवणं, रांगणं ही जशी चालण्याची पूर्वातयारी आहे हे आपण मान्य करतो तशीच लिहिण्या-वाचण्याची, आकडे समजण्याची पूर्वतयारी नेमकी कशी करून घ्यायची असते याची स्पष्टता शाळेला आणि पालकांना असणं महत्त्वाचं. क्रमवारी, लहान-मोठा ओळखणं, कागदावर गिरगटणं, पळापळी करणं, मणी ओवणं, गोष्टी ऐकणं या कृतींमधून वाचन-लेखन-गणितपूर्व तयारी होत असते. असे खेळ मुलांना जितके जास्त खेळायला मिळतील तितकं उत्तम! एकंदर, अक्षरं गिरवायला लावणाऱ्या शाळांपासून दूर राहणंच रास्त! स्क्रीन्स- laptop, TV यांना बालवाडीच्या वर्गात बिलकूल स्थान असू नये! मोठी मंडळी आणि वर्गमित्र यांच्याशी झालेल्या संवादातून मूल कैकपटींनी जास्त शिकतं, असं आपल्याला अनेक अभ्यास सांगतात. मुलांची भावनिक कौशल्यं कशी विकसित होतात, त्यासाठी वर्गात काय प्रकारच्या संधी उपलब्ध करून देता येतात, लहान मुलांना स्वतःच्या भावना हाताळायला कसं शिकवता येतं याबद्दल शाळेचा दृष्टिकोन जरूर समजून घ्यावा. कुठलीही गोष्ट करून घेण्यासाठी भीती दाखवणं किंवा लालूच दाखवणं अशा मार्गांचा अवलंब तर केला जात नाही ना, हेही बघावं!

नवीन वर्ष सुरू होताना पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या मुलांसाठी हा किती मोठा बदल आहे याची जाणीव शाळेला असणं महत्त्वाचं ठरतं. लहान मुलांची शाळेशी ओळख होण्यासाठी सुरुवातीला आई-बाबांबरोबर शाळेत काही दिवस खेळायला येणं, शाळेची वेळ हळूहळू वाढवणं, आईबाबांना शाळेत थांबण्याची परवानगी देणं अशा गोष्टी केल्यानं आपण मुलासाठी आणि शिक्षकांसाठी हा प्रवास सुकर करतो! पालकभेटी किती नियमितपणे होतात हे बघावं. पालकभेटी म्हणजे मुलाच्या तक्रारी करायची जागा असू नये. मूल शिकण्याच्या प्रवासात कुठपर्यंत पोचलं आहे, पालक आणि शाळेनं त्याला कशी मदत करावी याची चर्चा करण्याचा अवकाश इथे मिळावा. सगळी चौकशी करूनसुद्धा पुढे अनेक गोष्टींवर चर्चा करायची गरज पडूच शकते. त्यामुळे शाळा निवडताना शाळेशी संवादाची शक्यता दिसते ना, याची खातरजमा करून घेणं महत्त्वाचं! शाळा निवडताना ताण येणं अगदी साहजिक आहे. मूल कसं शिकतं याचा आपला अभ्यास (मत नाही, अभ्यास!) जितका पक्का तितका निर्णय सोपा होत जाईल..!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link