Next
दहा आकडे मोजा!
डॉ. राजेंद्र बर्वे
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

“मला हा इमेल लिहायला खूप वेळ लागला, कारण सारखं थांबून थांबून आकडे मोजावे लागले. मला मंत्रचळ वगैरेची बाधा झालेली नाही. म्हणजे एक गोष्ट परत परत करायची सवय नाही. मी आकडे मोजतो कारण मला खूप आणि पुन्हा पुन्हा राग येतो, त्या मारकुट्या सरांचा. त्याची गोष्ट खूप जुनी आहे. आम्हाला शाळेत एक मारकुटे सर होते. सगळ्या मुलांना येता जाता फटके मारायचे. म्हणायचे, “राग माणसाचा मोठा शत्रू आहे. त्यावर विजय मिळवायला पाहिजे. त्यासाठी राग आल्यावर दहा आकडे मोजायचे.” यावर मला खूप हसू आलं आणि मी विचारलं, “आम्हाला मारता तेव्हा तुम्हाला राग येतो ना, मग तुम्ही का दहा आकडे मोजत नाही?” यावर ते खूप रागावले आणि मला पुन्हा मारायला लागले. मी म्हणत होतो, “सर, आकडे मोजा, आकडे मोजा.” त्यामुळे मला आता या प्रसंगाची आठवण आली की राग येतो आणि मी आकडे मोजतो. राग काही जात नाही. आकडे मोजून कोणाचा राग कसा कमी होईल, असा प्रश्न पडला की मला पुन्हा राग येतो. राग आला की आकडे मोजतो. एक मित्र म्हणाला, “दहा आकडे मोजून राग जात नसेल तर हजार आकडे मोजा!” हे ऐकून मला पुन्हा राग आला आणि माझं सुरू एक, दोन, तीन, चार. आकडे मोजून आकडी येते पण राग काही जात नाही.”

...गमतीशीर पत्र होतं. पत्रलेखकाला विनोदबुद्धी आहे, हे जाणवलं आणि आपल्या त्रासातून सुटका करून घेण्याची कळकळही जाणवली. खरं म्हणजे, आपल्या रागाचं हसू होणं आणि स्वत:चं हसं होणं हा रागावरचा चांगला उपाय आहे. पण आपल्या या मित्राला ‘आकडे रहस्य’ उलगडून हवं आहे.

मित्र हो, तुम्हीदेखील ‘दहा आकडे मोज’ हा रागावरचा घरगुती उपाय कोणाकडून तरी ऐकलाच असेल. कोणीतरी कधीतरी तुम्हांला सांगितला असेल. काहींनी प्रयोग करून पाहिलाही असेल. या उपायामागची मानसिकता समजली आणि नेमका अर्थ कळला तर त्या उपायाचा प्रभावीपणा लक्षात येईल.

आकडे मोजणं हा रागावरचा फर्स्ट एड आहे. तातडीनं करायचा उपचार! १० आकडे मोजणं म्हणजे दहा श्वास मोजणं. दहा आकडे मोजायला खरं तर दहा काय, दोन-पाच सेकंदही लागत नाहीत. तेवढ्यात राग विझत नाही. मोजून १० श्वास घ्या. राग आल्यावर आपला श्वास बदलतो. आपण जोरजोरात नाकपुड्या फुगवून श्वास घेऊ लागतो. त्याऐवजी क्षणभर थांबून हवेचा आवाज होऊ न देता दीर्घ श्वास घ्यायचा आणि क्षणभरानं उच्छवास सोडायचा, तोही हळूहळू. आणि सोडतानाही झटकन न सोडता हलकेच श्वास सोडायचा. एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की उच्छवासाला अधिक वेळ लागला पाहिजे म्हणजे पाच आकडे मोजून श्वास आत घेतला तर सोडताना आठ शक्य तो दहा मोजता आले पाहिजेत. उच्छवासाला श्वास घेण्यापेक्षा अधिक वेळ द्या. म्हणजे श्वास घ्यायला चार सेकंद लागतात तर उच्छवास त्याच्या दीड-दोनपट अधिक हवा, म्हणजे ६ ते १० सेकंद लागायला हवेत.

अशा रीतीनं १० श्वास घ्या. १० दीर्घ श्वास आणि प्रदीर्घ उच्छवासामुळे श्वसनाचं नियंत्रण होतं. मेंदूला अधिक प्राणवायू मिळतो आणि रागामुळे शरीरात झालेला जीवरासायनिक बदल नॉर्मलवर येतो. रागाचं जीवरासायनिक नियंत्रण होतं. आपलं मन रागाच्या कारणाचा विचार करणं सोडून देतं आणि शांत होतं. इतका साधा वैज्ञानिक विचार यामागे आहे. याची त्या मारकुट्या सरांनाच माहिती नव्हती, तर मुलांना ते कशी सांगणार? तुम्हाला पटतंय ना माझं म्हणणं, की राग येतोय माझा? थांबा, दहा श्वास मोजून तर बघा. एकदा आजमावून पाहाच!

तो एकदम हसला. ते पाहून मी म्हटलं, “हसलास तरी हरकत नाही, हसण्यानंही राग कमी होतो, कारण हसतानाही श्वास जोरात बाहेर पडतो.”

श्वास-उच्छवास ही गोष्ट उगीचच आध्यात्मिक वाटते. खरं त्यात काहीच दैवी नाही. ते विज्ञान आहे. म्हणजे असं बघ, आपण रागावलेलो असतो तेव्हा शरीरात जीवरासायनिक बदल होतात. शरीर निष्कारण उत्तेजित होतं. या रासायनिक बदलामुळे भावनिक मेंदू चेतवला जातो आणि विचारशक्तीचं केंद्र असलेल्या कपाळामागील ‘फ्रॉटल’ मेंदूवर त्याचा ताबा होतो. विचार, तर्क, कार्यकारणभाव, योग्य-अयोग्य ठरवणाऱ्या मेंदूवर संतापाच्या रसायनाचा अंमल चढतो. साहजिकच विचार कुंठीत होतो. आपण अद्वातद्वा बोलतो, आक्रमक होतो. या क्रिया अक्षरश: क्षणार्धात घडतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी संतापाच्या जीवरसायनामध्ये सत्व म्हणजे निमिषार्धात बदल व्हावा लागतो. केवळ श्वासांच्या नियंत्रणानं ते शक्य होतं.

प्रत्येक श्वासाबरोबर मिळणाऱ्या प्राणवायूमुळे मेंदूत बदल घडतो. त्यासाठी मेंदूला प्राणवायूचा अधिक पुरवठा लागतो. त्यासाठी शरीरात अधिक श्वास म्हणजे प्राणवायू श्वासावाटे जास्त प्रमाणात आत यावा लागतो. त्यासाठी आपली फुप्फुसं रिकामी व्हावी लागतात. ती रिकामी करण्यासाठी उच्छवास दीर्घ असावा लागतो. म्हणून श्वासापेक्षा उच्छवास लांबलेला असावा लागतो.

आपण दहा आकडे मोजतो तेव्हा दहा वेळा दीर्घश्वसनाचा प्रयोग करतो. आपल्या मेंदूला अधिक प्राणवायू देतो- दहा वेळा!

दहा आकडे मोजण्यामागचं हे शास्त्रीय कारण तुझ्या मारकुट्या सरांनाही ठाऊक नव्हतं. त्यांनी ते पाठ केलं होतं इतकंच.

आता एकच प्रश्न, हे आयत्या वेळी कसं सुचणार? खरंय, अगदी खरंय. परीक्षेत आयत्यावेळी योग्य उत्तर आठवण्यासाठी अभ्यास करावा लागतो. उजळणी करावी लागते. अगदी तेच उत्तर आहे. दहा वेळा दीर्घ श्वसनाचा अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस दिवसातून चार वेळा केलीस तरी पुरेल.

आणि एक मुद्दा, शेवटचा प्रश्न न रागावता विचारलास, हे उत्तम झालं!

तो खो खो हसला!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link