Next
कसोटी क्रिकेट पुन्हा लोकप्रियतेच्या लाटेवर
नितीन मुजुमदार
Friday, January 25 | 03:30 PM
15 0 0
Share this story

बीबीसीने १९५७ साली सुरू केलेला ‘कसोटी मॅच स्पेशल’ हा  रेडिओवरील प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम आजही चालू आहे. हा कार्यक्रम आजही कसोटी, एकदिवसीय व टी-२० या सर्व फॉरमॅटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे समालोचन प्रसारित करत असतो. १९५७ साली हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा अर्थात केवळ कसोटी क्रिकेट प्रचलित होते. आज क्रिकेट सामन्यांच्या स्वरूपात खूप बदल झाले आहेत, तरीही ‘कसोटी मॅच स्पेशल’चा रुबाब आणि त्याचे नावही आज कायम आहे! बीबीसीसारख्या नामांकित संस्थेने ‘कसोटी मॅच स्पेशल’ हे नाव उगाचच कायम ठेवलेले नाही. कसोटी क्रिकेटचे स्थानही क्रिकेटच्या साऱ्या फॉरमॅटमध्ये आजही तितक्याच मानाचे आहे. एखाद्या टेनिसपटूला विम्बल्डन जिंकल्यावर जो आनंद होतो, बॅडमिंटनपटूंच्या मनात ‘ऑल इंग्लंड’चे जे स्थान असते तेच महत्त्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटमधील कामगिरीला देत असतात.
कसोटी क्रिकेट म्हणजे जागतिक क्रिकेटचा गाभा, मात्र एकदिवसीय व टी-२० क्रिकेटच्या झंझावातात कसोटी क्रिकेटचे काय होणार, असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडला होता. त्यातही आयपीएलने चिंता अधिक वाढवली. दशकभरापूर्वी भारतात आयपीएलला सुरुवात झाली आणि या अतिझटपट क्रिकेटमुळे कसोटीचे काय होणार, अशी चर्चा सुरू झाली. कसोटी क्रिकेटचे पाच दिवस व अनिर्णित राहणारे सामने या बाबी क्रिकेटच्या सध्याच्या ट्रेंडशी मिळत्या जुळत्या नव्हत्या. मात्र दोन दशकांमधील आकडेवारीनंतर खूप आशादायक निष्कर्ष समोर आला आहे ज्यामुळे ‘कसोटी’चे चाहते निश्चितच खूश होतील.
मागील दोन दशकांच्या काळात प्रत्येक वर्षाची तुलना केली तर २०१८ हे वर्ष कसोटी क्रिकेटसाठी खूप म्हणजे खूपच छान गेले. खेळल्या गेलेल्या एकूण ४८ कसोटींपैकी फक्त पाच सामने अनिर्णित राहिले. गेल्या २० वर्षांमध्ये निकाली सामन्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वोत्तम होते आणि मागील पाच वर्षांपासून हा ट्रेंड जवळजवळ असाच आहे, हे विशेष. पाच वर्षांमध्ये अनिर्णित सामन्यांची संख्या प्रत्येक वर्षी दहाच्या आत आहे, तर १९९८ पासून २०१३ पर्यंत (१६ वर्षे) केवळ एका वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी किमान १० अथवा अधिक सामने अनिर्णित राहिल्याची आकडेवारी सांगते.
कसोटी सामने निकाली लागण्याचे प्रमाण पाच वर्षांपासून वाढले आहे. याची कारणे अनेक असतील, पण एक प्रमुख कारण टी-२०चा प्रसार हेही असू शकते. टी-२०च्या प्रभावामुळे कसोटी सामने निकाली लावण्याकडे कल वाढू लागल्याचे प्रथमदर्शनी दिसते. टी-२०मुळे नवीन पिढीचा कल वेगाने धावा काढण्याकडे झुकलेला दिसतो. पृथ्वी शॉ, शुभमन गिल, रिषभ पंत या खेळाडूंची नावे वानगीदाखल देता येतील. ही संपूर्ण पिढी दशकापूर्वी आयपीएल सुरू झाली तेव्हा १०-१२ वर्षांची असेल. त्यामुळे त्यांच्या खेळावर आयपीएलचा प्रभाव असणे साहजिक आहे.
कसोटीमध्ये स्ट्राइक १००च्या आसपास ठेवणाऱ्या पिढीचे आगमन झाले आहे हेच खरे! आणि याच हिटर्सच्या मांदियाळीत एखादा पुजाराही चमकू लागतो तेव्हा समाधानही वाटते. कारण कसोटी क्रिकेटला असे पुजाराही अत्यावश्यक आहेत! आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे रनरेट उत्तम ठेवताना क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटशी जुळवून घेण्याचे कसब नवीन पिढी दाखवत आहे. भारतात आयपीएलच्या आगमनानंतर कसोटी खेळणाऱ्या सर्व देशांमध्ये हे लोण वेगाने पोहोचले. त्यामुळे तेथेही क्रिकेटकडे बघण्याच्या नवीन पिढीच्या दृष्टिकोनमध्ये बदल दिसू लागलाय. अर्थात गरज पडते तेव्हा विकेटवर उभे राहण्याची क्षमता टी-२० शिकवत नाही. ती पारंपरिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शिकता येतात.
कसोटी म्हणजे आजच्यासाठी काहीसा वेळखाऊच खेळ. त्यामुळे या युगात इतरांची सोडा क्रिकेटमधल्या इतर प्रकारांकडून होणारी स्पर्धाचं कसोटी क्रिकेटला मारक ठरू शकते. तरीही कसोटी क्रिकेटची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. जलदगती गोलंदाजांसाठी चार स्लिप व दोन गली हे क्रिकेटरसिकाला आकर्षित करणारे दृश्य तुम्हाला फक्त आणि फक्त पारंपरिक क्रिकेटमध्येच दिसते. स्पिनर्स, फॉरवर्ड शॉर्ट लेग, बॅकवर्ड शॉट लेग, सिली पॉईंट व एक स्लिप असे चार चार जण फलंदाजाच्या अगदी आसपास लावून प्रचंड दबावाखाली त्याला खेळायला भाग पाडणारे आणि प्रेक्षकांना स्टेडियमकडे खेचणारे दृश्य हीदेखील पारंपरिक क्रिकेटचीच मक्तेदारी आहे. त्यात परत विकेट फिरणारी असेल तर बघायलाच नको. कसोटी क्रिकेटची स्वतःची अशी मजा आहे. फक्त टी-२० आणि एकदिवसीयमध्ये यशस्वी झालेले आणि तरीही लक्षात राहिलेले किती क्रिकेटपटू असतील? फारच थोडे! टी-२० वा एकदिवसीय क्रिकेट म्हणजे फास्टफूड असलेला ब्रेकफास्टच! वेळ तात्पुरती भागवली जाईल, पण पोटभर सात्त्विक जेवल्याचे समाधान तुम्हाला कसोटी क्रिकेटच्या पंगतीतच मिळणार! टी-२०ची जिंगल्स तुम्ही नुसतीच काही वेळ गुणगुणत राहणार पण कसोटी क्रिकेटची मैफल रेंगाळत राहणार!
कसोटी क्रिकेटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाच दिवस खेळपट्टीचे स्वरूप कमीअधिक स्वरूपात वापरामुळे बदलत राहते. त्यात वातावरणातील फरकामुळे आणखी बदल घडू शकतो. तुमच्या संयमाची सर्वाधिक परीक्षा कसोटीमध्येच घेतली जाते आणि तुमचे तंत्र अपुरे असेल कसोटी क्रिकेटमध्ये ते उघडे पडणारच! गोलंदाजांनादेखील जास्त न्याय कुठे मिळत असेल तर तो कसोटी क्रिकेटमध्येच!  असो, एकंदरीत कसोटी क्रिकेटला सध्या उत्तम दिवस येत आहेत. भारतीय संघाची कामगिरी छान होत असल्यामुळे ते अतिउत्तम वाटत आहे. लवकरच आयसीसीतर्फे कसोटी क्रिकेटची जागतिक चॅम्पियनशिप सुरू होणार आहे, ही बातमी कसोटीचाहत्यांना नक्कीच सुखावणारी आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link