Next
आवा चालली पंढरपुरा!
क्षमा दांडेकर
Friday, July 05 | 01:00 PM
15 0 0
Share this story


गेली २८ युगं पुंडलिकाच्या प्रेमाखातर कटीवर हात ठेऊन विटेवर उभ्या असलेल्या त्या सावळ्या परब्रह्माच्या पायावर डोकं ठेवलं आणि नकळत माझ्या डोळ्यांतून अश्रू आले.
खरं तर मी देव देव करणारी नाही. स्वतःच्या वाट्याला आलेलं काम आपल्या परीनं १०० टक्के मेहनत घेऊन करायचं, इथेच माझं अध्यात्म सुरू होतं आणि संपतंदेखील! एकदा वारीला चालत जायची इच्छा होती खरी, पण आषाढी एकादशीला इतकी गर्दी असते, की तिथे जाणं अशक्य होतं. तेव्हा ठाण्याच्या दांडेकर दिंडीसोबत जायचं ठरवलं.
ही दिंडी नेहमीच्या दिंडीच्या आधीच्या एकादशीला पंढरपूरला पोचते. ठाण्याहून बसने आळंदीपर्यंत जायचं, मग तिथून पदयात्रा सुरू होते. ज्यांना चालणं जमत नाही, त्यांच्यासाठी बस या मार्गावर येत असते. चालणं अशक्य झालं, की बसमध्ये बसायचं. राहण्यासाठी मोठं लग्नाचं कार्यालय असतं. फक्त आपण आपलं बेडिंग सोबत घ्यायचं.
जयंत दांडेकर आणि त्यांच्या पत्नी विजया दांडेकर यांनी २३ वर्षांपूर्वी ही दिंडी सुरू केली. तेच या दिंडीचे संस्थापक. त्यांच्यामुळे आमच्यासारख्या व्हाइटकॉलर्ड लोकांची खूपच चांगली सोय झाली आहे. रोज पहाटे साडेपाच वाजता काकड आरती झाली की चालायला सुरुवात करायची. नाश्ता, जेवण याची सोय वाटेत कुठेतरी चांगली जागा बघून होत असे. दिंडीबरोबर त्यांचा आचारीवर्गही असतो. त्यात पोळ्या, भाकऱ्या करण्यासाठी सात-आठ तरुण मुलं आणि सहा-सात महिला तसंच दोन आचारी असा वर्ग असतो. आपण फक्त चालायचं आणि सकाळ, संध्याकाळी काकड आरती, हरिपाठ यात सहभागी व्हायचं.


माझ्यासारख्या बऱ्याच नोकरी करणाऱ्या स्त्रियांची अवस्था सध्या ‘आवा चालली पंढरपुरा, वेशिवरूनी आली घरा’ अशी झालेली आहे. आवा म्हणजे संत तुकाराममहाराजांची पत्नी. असं म्हणतात, की तुकाराममहाराज तिला नेहमी विठ्ठलभक्तीचा सल्ला देत, पण ती संसारातून कधी बाहेरच पडू शकली नाही. मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या मनात एक आवा दडलेली असते. आम्ही आमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेरच येऊ शकत नाही. सतत त्याच चक्रात अडकून राहतो. आळंदी-पंढरपूर वारी कधीपासून मनात होती. शेवटी मनाचा हिय्या केला आणि निघाले मीपण वारीला!
मी हातात घेतलेलं काम तसं खडतरच होतं. त्यासाठी दोन महिने सरावही केला. परंतु तेही चार दिवस चालायला गेले, तर दोन दिवस नाही, असा प्रकार चालला होता. मग मनात विचार आला, एक तास चालून काय होणार आहे, रोज कमीतकमी चार-पाच तास तरी चालायचं आहे. त्यासाठी मनाची तयारी केली.
आमच्या दीडशे जणांच्या समूहामध्ये पूर्ण चालणारे लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. नेहमीच्या दिंडीपेक्षा या दिंडीमध्ये कमी दिवस असल्यानं रोजचं चालणंही जास्त असतं. एकूण २४० किलोमीटर अंतर आठ दिवसांत चालायचं असतं.  दहा दिवस सर्व एकत्र असल्याने नवीन ओळखी होतात, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला जातो.
खरं तर मी वारीला गेले ते वारीतल्या भक्तीचा अनुभव घेण्यासाठी आणि त्याबरोबरच माझ्या शारीरिक क्षमतेचं परीक्षणही होणार होतं. माझ्या दृष्टीनं ती एक अचिव्हमेन्ट होती, परंतु इथे कितीतरी वेगवेगळे लोक भेटले, ज्यांची वारीला येण्याची कारणं वेगवेगळी होती. कुणी पांडुरंगाच्या ओढीनं आलं होतं, तर कुणी दहा दिवस नेहमीच्या रगाड्यापासून दूर वेगळा अनुभव घेण्यासाठी आलं होतं. काही नियमित येणारी मंडळी या वारीच्या ओढीनंच आली होती. दहा-पंधरा वर्षं सलग येणारी मंडळी एकमेकांच्या भेटीसाठीही आली होती.
एक जुने वारकरी एका वर्षी काही कामामुळे जाऊ शकले नाहीत. मग त्यांच्या असं लक्षात आलं, की घरी राहून कामही झालं नाही, उलट सारखी वारीची ओढ लागली होती. त्या वर्षीपासून ते वारी चुकवत नाहीत. एका अवलियाच्या मते वारीमुळे पापं धुतली जात नाहीत, पण चालताना वाट्यास येणारं ऊन, पाऊस, सावली देणारे ढग, भेटणारा निसर्ग आणि सहयात्री याद्वारे त्याला त्या सर्वोच्च शक्तीशी जोडणं (कनेक्ट) सोपं वाटतं.
आपण शहरातील माणसं खूपच चाकोरीतलं जगत असतो. लोक काय म्हणतील याचा किती विचार करतो! बघा ना, या वारीच्या निमित्तानं मी एक दिवस चक्क पुण्याच्या फुटपाथवर बसून मस्त नाश्ता केला, देवळात बसून जेवले, शेतातील पंपाच्या पाण्यानं हातपाय धुतले, जे मी कदाचित इथे राहून कधीच करू शकले नसते. एक उसाचं गुऱ्हाळ चालवणारी स्त्री भेटली, ती आषाढीवारीच्या दिवसांत वारकऱ्यांना उसाचा रस निम्म्या किंमतीत देते. तिच्या म्हणण्यानुसार तिला दुसरं काही करणं शक्य नाही, म्हणून तिच्या दृष्टीनं हीच परमेश्वराची सेवा आहे. ज्याला इच्छा आहे, त्याला मार्ग सापडतो हेच खरं.
दांडेकर दिंडीचे संस्थापक जयंत दांडेकर म्हणजे अगदी मृदू व्यक्तिमत्त्व. परमेश्वराच्या भक्तीबरोबरच प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची शारीरिक कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी रोज कोणताही व्यायाम करणं आवश्यक आहे, यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी ते सूर्यनमस्कार, प्राणायाम यावर भर देतात. दिंडीमधील सहभागी व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्नही ते करतात. एकमेकांमध्ये संवाद साधण्यासाठी प्रोत्साहन देतात. ज्या गावात दिंडीचा मुक्काम असतो, तिथल्या काही व्यक्तींना रात्री हरिपाठासाठी आवर्जून आमंत्रित केलं जातं.


या सर्व कार्यात कित्येक वर्षं त्यांच्याबरोबर दिंडीला जाणारे त्यांचे अनेक स्नेही हे आता त्या दिंडीचे आधारस्तंभ आहेत. ही मंडळी कुठल्याही कामात मागे नसतात. अगदी चालून आलेल्या वारकऱ्यांच्या पायाला तेल लावून मालिश करतानाही त्यांचा अहंकार (इगो) कुठे आड येत नाही. खासकरून सातव्या दिवशी एका दिवसात ४१ किलोमीटर चालल्यानंतर या मंडळींनी पायाला मालिश करून दिलं, तेव्हा त्यांच्या परोपकारी वृत्तीकडे बघून अर्धी थकावट दूर झाली.
आठ दिवस अशी वाटचाल करत पंढरपूरला पोचलो, तेव्हा संत तुकाराममहाराजांचे ‘चालविशी हाती धरोनिया’ हे शब्द आठवले. नाहीतर रोज फक्त रेल्वेस्टेशन ते घर किंवा ऑफिस, असं जेमतेम एक-दोन किलोमीटर चालणारी मी एवढी कशी काय चालले, याचं आश्चर्य वाटतं. अशी माझी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link