Next
अंत:प्रेरणेतून मुहूर्तमेढ!
स्मिता गुणे
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story

प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की त्यावेळी जर त्याने पंख पसरले तर उंच आकाशात भरारी घेता येते. तो क्षण ज्याने बरोबर पकडला तर तो नंतर यशस्वी म्हणून जगासमोर येतो. डॉक्टर प्रेरणा शिरसाठ यांच्याही बाबतीत अगदी असेच घडले. ज्यावेळी त्यांना वाटले की आता बास झाले निव्वळ संसारी स्त्री म्हणून जगत राहणे, तो क्षण त्यांनी घट्ट पकडून ठेवला आणि ‘चतुरा आयुर्वेद’ या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
कट्टर डाव्या विचारांचे डॉक्टर जगन्नाथ मुंडे आणि जयश्री मुंडे यांची प्रेरणा ही सुकन्या. घरात सतत चर्चा, लेखन, वाचन, चळवळीत वावर असे वातावरण! माणसांचा राबता आणि स्त्री-पुरुष समानता घरात मुरलेली होती. त्यामुळे करिअरच्या बाबतीतही निर्णयस्वातंत्र्य होतेच. प्रेरणानं बी.ए.एम.एस. म्हणजे आयुर्वेदाचे शिक्षण घ्यायचे ठरवले.
दरम्यानच्या काळात एक मोठी घटना घडली होती. डॉक्टर जनार्दन मुंडे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यावेळी प्रेरणा आणि सगळा परिवार अक्षरशः मोडून पडण्याची वेळ आली. आई खंबीरपणे उभी राहिली. त्यांचे वैद्यकीय शिक्षण पती डॉ. जनार्दन यांनी लग्नानंतर धोशा लावल्याने पूर्ण झाले होते. त्या शिक्षणाचा उपयोग आता होणार होता. स्नेहीजनांच्या मदतीने डॉक्टर जयश्री मुंडे यांनी हॉस्पिटल सुरू केले.
प्रेरणा यांना करियर वगैरे करायची इच्छा नव्हती. त्यांचे स्वप्न एकदम साधे होते. लग्न करून छान सुखी संसार करणे, सुगृहिणी होणे, मुलांचे संगोपन करणे याची प्रेरणाची मनापासून ओढ होती. प्रेरणा डॉक्टर झाल्यावर लगेच त्यांचे लग्न ठरवले गेले.
बीड जिल्ह्यातील खालापुरीच्या डॉक्टर प्रेरणा ह्यांचा शुभविवाह टप्पा पिंपळगावचे कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांच्याशी झाला. हे शिरसाठ घराणेदेखील पूर्णपणे डाव्या विचारांचे होते. माणसांचा राबता आणि त्यांचे खाणेपिणे यामध्ये प्रेरणा सहज समरस होऊन गेल्या. दरम्यान एक मुलगी आणि एक मुलगाही झाला. पतीची बदली झाली की त्या गावाला जायचे आणि मुलांचे शिक्षण, आलागेल्यांचे करणे यात प्रेरणा आपण स्वतः एक डॉक्टर आहोत, हे अगदी विसरून गेल्या होत्या.
प्रेरणा यांची अंतःप्रेरणा मात्र निखळ सुंदरतेची होती. सगळ्या कृतींमध्ये तिच्यातली सौंदर्यदृष्टी ठळकपणे दिसून यायची. स्वयंपाक करणेही रेखीव आणि मुलांचे आवरून देणेही तसेच. वस्तू आणि कपडेलत्ते खरेदीदेखील उच्च अभिरुची दर्शवणारी. एके दिवशी प्रेरणा यांच्या मनात आले की आयुर्वेदामध्ये माणसाचे सौंदर्य जतन व संवर्धन करण्याची जी शिस्त आणि पद्धती सांगितली आहे, तिला जगात तोड नाही. हे सौंदर्यवर्धनशास्त्र आपण शिकून घ्यावे आणि एखादा स्पा सुरू करावा.
कुटुंबामध्ये रमून गेलेल्या प्रेरणा हिच्या मनात असा विचार येणे हीच त्यांच्या जीवनात संधीने केलेली टकटक होती. पस्तिशीच्या आसपास काहीतरी नवीन सुरू करण्याच्या कल्पनेचे सुरुवातीला कोणीच स्वागत केले नाही. प्रत्येकाला वाटत होते की या वयात एकदम स्पा सुरू करणे नकोच. घरची नीट बसलेली घडी या क्षणिक उर्मीमुळे विस्कटेल आणि ते कोणालाही आवडणारे नव्हते. मुलांचे आणि कुटुंबाचे बघणे महत्त्वाचे आहे, हे घरातील प्रत्येक जण तिच्या मनावर ठसवू लागला. मात्र तिच्या मनाने बंडाचे निशाण फडकावले आणि पुण्यामधील एका आयुर्वेदतज्ज्ञाकडे प्रशिक्षण घ्यायला जाणार असल्याचे त्यांनी घोषित करून टाकले.
सगळे निगुतीने करणाऱ्या प्रेरणाने सौंदर्योपचार आणि प्रसाधननिर्मितीशास्त्र मनापासून शिकून घेतले. शिक्षण पूर्ण होताच अहमदनगरला, राहत्या बंगल्याच्या खालच्या जागेत स्पासाठी बांधकाम सुरू केले.
“महिलांना एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर नुसती तांत्रिक माहिती असून भागत नाही. मनाचा खंबीरपणा आणि ठामपणा आवश्यक असतो. स्पा सुरू करतानाचे वातावरण बघून जर मी डळमळले असते तर माझे हे रूप तुम्हाला कधीच दिसले नसते,” हे डॉक्टर प्रेरणा यांचे शब्द त्यांच्या प्रवासाची झलक दाखवतात. स्पा आणि महिलांसाठी वेलनेस सेंटर आकाराला येऊ लागले. त्यांच्या सासूबाईंचे नाव या सेंटरला अगदी साजेसे होते, म्हणून तेच ठेवले. ‘चतुरा आयुर्वेद’!
अहमदनगरच्या सावेडी भागात ‘चतुरा आयुर्वेद’ सुरू झाले आणि पहिल्या दिवसापासून आजतागायत महिलांचा छान प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. प्रेरणा यांची सौंदर्यदृष्टी, सखोल अभ्यास त्यांच्या प्रत्येक हालचालीत जाणवतो. या उपचारांसाठी लागणारी प्रसाधने, औषधे आपण स्वतःच निर्माण करायची हा ध्यासदेखील प्रेरणा यांच्या नव्या उद्योगाची प्रेरणा ठरला आहे.
गुरुजनांकडून मार्गदर्शन घेऊन, महाराष्ट्रभर फिरून प्रेरणा कच्चा माल मागवतात. देशी आणि मोकळ्या हवेत वावरणाऱ्या गायींचेच तूप घ्यायचे, काजळ तयार करण्यासाठी चांदीची भांडी वापरायची, गॅसऐवजी चूल, शेगडी ही उपकरणे वापरायची, रसायननिर्मिती, अर्कनिर्मितीसाठी उत्तम साधने, स्वतंत्र, स्वच्छ जागा आणि वनस्पतींची स्वतः पारख करून निवडलेली पूड अशा काटेकोरपणातून ‘चतुरा आयुर्वेद’ने विश्वासार्हता निर्माण केली आहे. केस, चेहरा, शरीर यांच्या सौंदर्यवृद्धीसाठी अंजन, काजळ, लीपबाम, उटणे, वेगवेगळी तेले तसेच केशकल्प अशा उत्पादनांची मोठी श्रेणी मार्केटमध्ये स्थान मिळवण्यास सज्ज आहे.
डॉक्टर प्रेरणा शिरसाठ कायम मोकळ्या वातावरणात वाढल्या. कुटुंब, संसार दृष्ट लागावा इतका नेटका केला. वयाच्या पस्तिशीत एक वेगळेच स्वप्न पाहिले. हळूहळू या स्वप्नात घरच्यांनाही सामील करून घेतले. सर्व महिलांना सुंदर करण्याचे स्वप्न प्रारंभी खडतर होते, मात्र झपाटून जाऊन काम केल्याने ते साध्य झाले. त्यांचे पती सतीश शिरसाठ भक्कमपणे पाठीशी उभे राहिले. आज ‘चतुरा आयुर्वेद’ने स्वत:ची उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यास सिद्ध केली आहेत.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link