Next
सत्संगती आणि साधना
स्वामी मकरंदनाथ
Friday, July 06 | 06:07 PM
15 0 0
Share this story

त्त्वगुणी मनुष्याला पूर्वजन्मींच्या सुकृतामुळे परमार्थ करण्याची बुद्धी होते. परमार्थामध्ये सत्संगतीला फार महत्त्व आहे. सत्संगती ही स्वत:च एक उत्तम साधना आहे. सद्गुरूंनी जन्मजन्मांतरी धरलेले शिष्याचे बोट, याही जन्मात अनुग्रह देऊन सद्गुरू पक्के धरून ठेवतात. अनुग्रहानंतर मनुष्याला परमार्थाविषयी अधिकच ओढ वाटू लागते, पण परमार्थ नेमकेपणाने करणे, तो व्यवहारात उतरवणे त्याला खूप अवघड वाटते. वास्तविक, संत सांगतात त्यानुसार परमार्थ अगदी सोपा आहे, त्याचा बाऊ करण्याचे काहीच कारण नाही. जिवाने ‘आपण परमात्मा आहोत’ या बोधावर येणे एवढाच परमार्थ आहे. मात्र त्यासाठी अंत:करण, चित्त, मन, बुद्धी यांची शुद्धता करावी लागते आणि याकरताच साधनेची आवश्यकता असते.
मन शुद्ध होणे, चित्त शुद्ध होणे, अंत:करण निर्मळ होणे, यागोष्टी साधनेशिवाय घडू शकत नाहीत. मन, बुद्धी, चित्त आणि अंत:करण ही सगळी अंतरिंद्रिये आहेत. ती जीव चैतन्याला बाह्य व्यवहाराकरिता साहाय्यभूत होत असतात. परमार्थामध्ये चित्तशुद्धीकरता, मन निर्मळ होण्याकरता भक्ती सांगितलेली आहे. बुद्धी अग्र होण्यासाठी ध्यान सांगितलेले आहे. अलिप्तदशा प्राप्त होण्यासाठी अंत:करणात निर्माण होणाऱ्या विविध भावभावनांपासून वेगळे राहायला सांगितलेले आहे. इंद्रियांकडून होणाऱ्या कर्मापासून आपण ‘आत्मस्वरूपाने वेगळे आहोत’ ही गोष्ट समजून घेऊन, व्यवहारात तसे भान राखून आचरण करण्यास सांगितले आहे. संसारात कधीकधी मन विविध विकारांनी फारच मलीन होते. ग्राह्य-अग्राह्य, नीती-अनीती यांना बाजूला सारून, केवळ स्वत:च्या सुखासाठी मनुष्य स्वार्थी विचार करतो. आणि त्यापोटी दु:ख ओढवून घेतो. यामध्ये बदल घडवून आणणे हे केवळ साधनेनेच शक्य होते. नामस्मरण, पूजाअर्चा, जपजाप्य, ध्यान, सद्ग्रंथांचे वाचन, चिंतन, सत्संगती, सद्गुरूंकडून श्रवण या सर्व गोष्टी साधनेत मोडतात. जो साधक सत्संगतीत राहतो, त्याची ध्याननामस्मरणादि साधना निश्चितपणे फलद्रूप होते. कारण साधनेला आवश्यक ती योग्य दिशा, साधनेचे मर्म संतसंगतीमुळेच समजते. संतांच्या संगतीशिवाय परमार्थात एक पाऊलही पुढे पडणे शक्य नाही. म्हणूनच संतांच्या सहवासात शक्य तितके अधिकाधिक राहण्याचा प्रयत्न साधकाने करावा. मग त्याहीपुढे जाऊन मनानेही त्यांच्या संगतीत सतत राहण्याचा अभ्यास करत जावा. त्यानंतर संतांकडून बुद्धीचा निश्चय करायला शिकावे. असे काही केले तरच आपण संतसंगतीचा लाभ करून घेतला, असे म्हणता येईल.

संतांच्या सहवासाकडे साधकाने फार सावधपणे पाहावे. त्यांच्या विचारांच्या अवतीभोवती मनाने राहावे. संतांच्या सहवासात बुद्धीचा परमार्थविषयक निश्चय सदृढ होईल हे पाहावे. संतांचा बोध, त्यांचे व्यापक प्रेम, दया, उत्कट भाव, भक्ती आपल्यामध्ये उतरवण्याच्या प्रयत्नात असावे. असे झाल्यास मनाने, बुद्धीने, भावाने संतांच्या सहवासाचा लाभ आपल्याला मिळेल. अशा प्रकारे निश्चयपूर्वक आपण संतांच्या सहवासात परमार्थसाधना करायची आहे. जेथे कमी पडू तेथे तळमळून सद्गुरूंना हाक मारायची आहे. पूर्ण प्रयत्न केल्यानंतर जेथे आपल्या शक्तीचे टोक गळून पडते तेथे सद्गुरू मदतीसाठी धावून येतात, असा सर्वच प्रामाणिक साधकांचा अनुभव आहे. तुम्ही ध्यानाला बसा, ते तुम्हाला मन आवरण्यासाठी साहाय्यभूत होतील. तुम्ही नाम घ्या, तुमचे चित्त त्यात कसे रंगेल हे ते पाहतील. अशा प्रकारे संतसंगती आणि साधना यांचा उत्तम समन्वय साधकाच्या जीवनामध्ये घडावा. असे केले तर संसार नीट तऱ्हेने सांभाळत असतानाच, त्यातील कर्तव्ये सुयोग्य प्रकारे पार पाडून शाश्वत आनंद प्राप्त करून घेण्याचे आपले ध्येय, याच जन्मात निश्चित पूर्ण होईल, याची खात्री वाटते.
(पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य स्वामी माधवनाथ 
यांचा वारसा पुढे चालवणारे स्वामी मकरंदनाथ यांचे
खास तरुणांसाठी सदर)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link