Next
कार्बनपासून इंधन देणारे काळे सोने
समीर कर्वे
Friday, July 05 | 01:00 PM
15 0 0
Share this story


मूळचे नागपूरचे व आता मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये कार्यरत असलेले प्रा. विवेक पोलशेट्टीवार यांनी नॅनोतंत्रज्ञानाच्या साह्याने ‘काळे सोने’ विकसित केले असून त्याद्वारे कार्बन- डाय-ऑक्साइडपासून मिथेन वायूचे इंधन मिळवण्यात त्यांना यश आले आहे. सध्या जगभर वातावरणातील बदल व कार्बन उत्सर्जनाचे वाढते प्रमाण यातून प्रदूषणाची गंभीर समस्या उभी राहिली असताना या समस्येलाच संधीमध्ये रुपांतरित करून तिचे त्यांनी सोने केले आहे.
  सोन्याच्या गुणधर्मात काही बदल करून त्याचे ब्लॅकगोल्ड या वेगळ्या पदार्थात रूपांतर करून त्यांनी हा प्रयोग केला आहे व याच पदार्थाचा वापर करून समुद्राच्या पाण्याचे बाष्पीकरणाद्वारे पिण्याच्या पाण्यात रुपांतर करणेही शक्य होईल, असे त्यांनी म्हटले आहे. ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’च्या रसायनशास्त्रातील प्रथितयश जर्नलमध्ये डॉ. पोलशेट्टीवार यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला असल्याने एकप्रकारे त्यावर मान्यतेची मोहोर उमटली आहे.
या काळ्या सोन्याचे कृत्रिम वृक्ष उभे केल्यास वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइड शोषून घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे बहुपयोगी इंधनात रुपांतर करता येईल. त्यातून वातावरण स्वच्छ होण्यासही मदत होईल. अर्थात या प्रयोगातून व्यापारी तत्त्वावर इंधननिर्मिती करण्यास काही काळ जावा लागेल. लवकरच ते या प्रयोगाच्या पेटंटकरता अर्ज करणार आहेत. यात सोने वापरल्याने ते खर्चिक असले, तरी ते एकदाच वापरायचे असते व सोन्याऐवजी इतर कोणता पदार्थ वापरता येईल का, याचेही पर्याय आम्ही तपासले, मात्र आतापर्यंत तरी सोनेच योग्य ठरले आहे, असे प्रा. पोलशेट्टीवार यांनी सांगितले.
या प्रयोगाविषयी डॉ. विवेक पोलशेट्टीवार म्हणालेे, नॅनोतंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही सोन्यातील नॅनो म्हणजेच अतिसूक्ष्म कणांमधील पोकळ्यांमध्ये बदल केला व त्याची प्रकाश ग्रहण करण्याची क्षमता वाढवली. त्यामुळे प्रकाश संग्रहित केल्यावर या कणांमधील इलेक्ट्रॉन्सचे संक्रमण होऊन त्यातून ऊर्जा तयार होते. तिचाच वापर करून कार्बन- डाय-ऑक्साइड व पाण्यातील हायड्रोजनचा वापर करून मिथेन वायू तयार करणे शक्य झाले आहे. हा काळ्या सोन्याचा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आला. निसर्गातील वृक्ष ज्याप्रमाणे कार्बन-डाय-ऑक्साइड, पाणी व सूर्यप्रकाश यांचा वापर करून आपले अन्न तयार करतात, त्याचप्रमाणे आम्ही तयार केलेले काळे सोनेही इंधन तयार करते व हे इंधन मोटारी चालवण्यासाठी वापरता येऊ शकते. हा पदार्थ तयार करताना सोने व सिलिका यांचा वापर केला असून त्याचा रंग काळा होतो व म्हणून त्याला ‘काळे सोने’ (ब्लॅकगोल्ड) म्हटले गेले आहे. या प्रक्रियेत  सोन्याच्या नॅनोकणांमध्ये सूर्यकिरण संग्रहित केले जातात व त्यामुळे औष्णिक व विद्युतचुंबकीय क्षेत्र तयार होते, या चुंबकीय क्षेत्रामुळे कार्बन-डाय-ऑक्साइडचे मिथेन इंधनात रुपांतर होते.

 
या प्रयोगामध्ये प्रा. पोलशेट्टीवार यांच्यासह टीआयएफआरमधील त्यांचे पीएचडीचे दोन विद्यार्थी संशोधक महक धीमन व आयन मैती सहभागी झाले होते. या प्रयोगास केंद्र सरकारचा अणुऊर्जा विभाग व विज्ञान-तंत्रज्ञान विभाग यांचे सहकार्य लाभले होते.
सध्या या पदार्थाचे उत्पादन कमी असले, तरी भविष्यात या प्रक्रियेद्वारे कार्बन-डाय-ऑक्साइडपासून इंधन मिळवणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होईल, असा विश्वास प्रा. पोलशेट्टीवार यांनी व्यक्त केला.
नॅनोतंत्रज्ञानाचील सूत्रे वापरून प्रदूषित वायूपासून इंधन मिळवणे व त्याद्वारे जगातील पर्यावरणाच्या प्रश्नावर मात करणे हे माझ्या आयुष्याचे ईप्सित बनले होते. त्यात यश आले, याचा आनंद आहे, असे प्रा. पोलशेट्टीवार म्हणाले. याच काळ्या सोन्यापासून समुद्राच्या पाण्याची वाफ तयार करून शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळवण्याची क्रियाही आम्ही ‘केमिकल सायन्स जर्नल’मधील शोधनिबंधात दिली आहे.  ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ने त्यांच्या ‘१७५ फेसेस ऑफ केमिस्ट्री’मध्ये प्रा. पोलशेट्टीवार यांना स्थान दिले आहे.
जिज्ञासूंना हा शोधनिबंध पुढील लिंकवर वाचता येईल. https://pubs.rsc.org/en/content/articlelanding/sc/2019/c9sc02369k?fbclid=IwAR3dvVpWci-QohcgL7MxLLTZHEZF7B1o16AEuHupPU4iE90EAKTAajQiOm0#!divAbstract
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link