Next
गोंधळलेली निवडसमिती
नितीन मुजुमदार
Friday, July 26 | 03:00 PM
15 0 0
Share this story

विश्वचषकाच्या सेमिफायनल शॉकमधून बाहेर पडताना निवडसमितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडताना काही अगदी अनाकलनीय निर्णय घेतलेले दिसतात. विश्वचषकातील मधल्या फळीतील संघनिवडीवरून भरपूर टीका सहन केल्यानंतर निवडसमितीने संघ निवडताना प्ले सेफ या विचाराने संघ निवडला आहे, पण एक चूक निस्तरताना दुसऱ्या चुकीचा पायाभरणी समारंभही उरकण्यात आलेला दिसतो!
मुळात विंडीज दौरा हा आता पूर्वीसारखा ‘मार’ खाण्यासाठी ओळखला जात नाही. त्यामुळे या दौऱ्यात खरे तर खूप सारे प्रयोग करायला हरकत नव्हती, पण विश्वचषकातील धक्कादायक ‘एक्झिट’नंतर निवडसमितीने धोका पत्करलेला दिसत नाही आणि हे सारे करताना काही अनाकलनीय निर्णयदेखील घेतलेले दिसतात!
शुभमन गिलसारखा अत्यंत गुणवान खेळाडू या दौऱ्यावर भारतीय संघात असायलाच हवा होता. शुभमनला पुरेशी संधीदेखील मिळालेली नाही. त्याचे वय लहान आहे, घाईगडबडीने घेतलेल्या निर्णयानुसार न्यूझीलंडमध्ये त्याचे पदार्पण झाले खरे, पण एवढ्या प्रतिभावान खेळाडूला अजून संधी मिळायला हव्या होत्या आणि त्यासाठी वेस्ट इंडिज दौरा हा अगदी योग्य प्लॅटफॉर्म होता. सध्या विंडीज दौऱ्यावर असलेल्या भारताच्या ‘अ’ संघाकडून त्याने छान कामगिरीदेखील केली आहे. आयपीएलमध्येही त्याचा फॉर्म चांगला होता. त्यामुळे दौऱ्याचा उपयोग शुभमन गिलसारख्या खेळाडूंना आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी चांगल्या प्रकारे करता आला असता, पण या निवडसमितीचा ‘आंतरराष्ट्रीय अनुभव’ येथेही कमी पडला. विराट कोहली, रोहित शर्मा, जडेजा, रिषभ पंत, के. एल. राहुल हे केवळ पाच खेळाडू तीनही फॉरमॅटसाठी (एकदिवसीय, कसोटी आणि टी-२०) भारतीय संघात आहेत. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे खेळाडू निवडणे गरज असेल तर समजले जाऊ शकते, पण तशी गरज नसताना असे करणे समर्थनीय ठरणार नाही.
मुंबईचा अजिंक्य रहाणे विश्वचषकातील चौथ्या क्रमांकाच्या गडबडीनंतर पुनरागमन करेल असे वाटले होते. एक्स्टेन्शन मिळालेल्या प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘आम्हांला विश्वचषकात ‘सॉलिड’ अशा क्रमांक ४ची कमी जाणवली’ असे सूचक विधानही केले होते. मात्र एकदिवसीय क्रिकेटसाठी निवडसमितीला अजिंक्य रहाणे ‘सॉलिड’ वाटलेला दिसत नाही. रहाणेचे एकदिवसीय रेकॉर्ड खरोखर चांगले आहे. भले तो एकदिवसीय क्रिकेटसाठी तितका ‘ग्लॅमरस’ फलंदाज नसेलही, पण असा एक फलंदाज संघात असणे फार गरजेचे असते आणि ते आपण विश्वचषकात अनुभवलेदेखील आहे. चेतेश्वर पुजाराही एकदिवसीय क्रिकेटसाठी फार मोठी ‘केस’ आहे असे म्हणणार नाही, पण त्याला या फॉरमॅटसाठी अगदीच बाजूला टाकले आहे, तेही बरोबर नाही. वेस्ट इंडिजसारख्या मालिकेत असे बरेच प्रयोग करण्याची संधी आपण गमावली आहे.
मयांक अगरवाल हे निवडसमितीच्या सातत्य नसलेल्या धोरणाचे आणखी एक उदाहरण. त्याच्यावर अमुक एका फॉरमॅटचा खेळाडू असा कुठलाही शिक्का लागलेला नाही. तसा शिक्का लागण्याजोगा तो खेळाडूदेखील नाही. मात्र त्याचे अतिशय आश्वासक पदार्पण झाले ऑस्ट्रेलिया कसोटीत. त्याला नंतर विश्वचषकासारख्या खूप महत्त्वाच्या स्पर्धेत बोलवण्यात आले ते एकदिवसीय स्पर्धेसाठी. तेथे संधी मिळाली नाही आणि आता त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे!
रवींद्र जडेजाला तीनही फॉरमॅटसाठी निवडले आहे हे त्याचे भाग्यच! एवढा उपयुक्त अष्टपैलू खेळाडू २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पराभवानंतर तब्बल ४४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने संघात नव्हता. त्याच्या नावावर ४१ कसोटी सामन्यांत तब्बल १९२ विकेट आहेत. आजपर्यंत कुणा भारतीय डावऱ्या स्पिनरचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त असेल, असे वाटत नाही. कसोटीत त्याच्या धावांची सरासरी ३२ च्या आसपास आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीने जवळजवळ तीस धावा प्रति डाव संघाला योगदान दिले आहे. त्याच्या क्षेत्ररक्षणाचे करू तेवढे कौतुक कमी आहे. विश्वचषकस्पर्धेत सर्वाधिक धावा वाचवणारा क्षेत्ररक्षक जडेजा होता. त्याला तीनही फॉरमॅटसाठी निवडल्याबद्द्ल निवडसमितीचे कर्णधारासह आभार! वृद्धिमान साहाचे कसोटीत पुनरागमन योग्यच. निवडसमितीचा हा एक अगदी चांगला निर्णय.
रोहित शर्माला विश्वचषकातील चांगल्या कामगिरीबद्दल बोनस म्हणून कसोटीत आणखी एक ट्रायल मिळाली असावी. बाकी प्रस्थापित खेळाडूंची निवड अपेक्षितच होती. तीन एकदिवसीय सामने, तीन टी-२० आणि केवळ दोन कसोटी एवढ्या छोट्या दौऱ्यासाठी तीन वेगवेगळे संघ निवडण्याचे काम निवडसमितीला अंमळ जडच गेलेले दिसते.

सामन्यांचे वेळापत्रक
*  टी-२० (पहिली) – ३ ऑगस्ट
*  टी-२० (दुसरी) – ४ ऑगस्ट
*  टी-२० (तिसरी) – ६ ऑगस्ट
*  एकदिवसीय सामना (पहिला) – ८ ऑगस्ट
*  एकदिवसीय सामना (दुसरा) – ११ ऑगस्ट
*  एकदिवसीय सामना (तिसरा) – १४ ऑगस्ट
*  कसोटी (पहिला) – २२ ते २६ ऑगस्ट
*  कसोटी (दुसरा) – ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link