Next
असं वाचवा पाणी…
दिलीप नेर्लीकर
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story

इंग्रजीत एक म्हण आहे ‘Charity begins at home.’ कोणतीही गोष्ट तुम्ही करा, असा उपदेश करण्याआधी आपण ती करतो का, हे प्रत्येक नागरिकानं बघणं अत्यंत गरजेचं आहे. पर्यावरणसंवर्धनाच्या बाबतीतही हे आणखी अधिक महत्त्वाचं आहे, कारण ‘दुसरा करेल, आपण नंतर बघू’ हीच भूमिका आपण घेतो आणि त्यातून पर्यावरणाची जी अपरिमित हानी होत आहे, त्याचे परिणाम आपण टीव्हीवर रोज पाहतोय. आपला देश उन्हाच्या खाईत तडफडतोय. कित्येक किलोमीटर चालून, जीव धोक्यात घालून घागरभर पाणी डोक्यावरून घेऊन येणाऱ्या स्त्रिया, मुलं-मुली पाहिली, की वाटतं ही अवस्था येण्याला आपणच सर्व कारणीभूत आहोत.
नुसत्या मान्सूनवर पूर्णपणे अवलंबून असणारा आपला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून मोटभर पाण्यासाठी आसुसलेला किती दिवस राहणार? त्याच्या मदतीसाठी आपण खारीचा तरी वाटा उचलूया. त्यासाठी आजपासून आपली जीवनशैलीच बदलायला सुरुवात करू. या पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैलीला ‘ग्रीन लिव्हिंग’ असं म्हणतात. आपण त्याला आपल्या माय मराठीत ‘हरित जीवनशैली’ असं म्हणूया!
आपण दिवसभरात अनेक व्यवहार पार पाडत असतो. थोडा विचार केला आणि त्यातल्या काही गोष्टी आपण काहीशा वेगळ्या प्रकारे केल्या, तर आपला हातभार पर्यावरणसंवर्धनाला लागेल. उदाहरणार्थ, तुमच्या घरातला एखादा नळ थेंब थेंब गळतोय. आपणाला एवढ्या छोट्या गोष्टीकडे पाहायला वेळ नाही म्हणून तो महिनोन् महिने तसाच गळत राहतो. अशा थेंब थेंब गळणाऱ्या नळातून किती पाणी वाया जातं याचा नुसता हिशोब तुम्हाला चक्रावून सोडेल. थेंब थेंब गळणारं पाणी एक तर त्याच्या टप टप आवाजानं वैताग आणतं आणि त्यातून वर्षाला अंदाजे ५५०० लिटर पाणी गटारात वाहून जातं. एका घरातून ५५०० लिटर पाणी वाया जात असेल, तर संपूर्ण शहराचा विचार केल्यास किती पाणी वाया जाईल, याचा अंदाजच केलेला बरा. आणि हो, असा हा गळका नळ दुरुस्त करणं बऱ्याचवेळा इतकं सोपं असतं की त्यातला एक रबर वायसर बदलला, की ही गळती थांबते. त्याची किंमत असते एकदोन रुपये आणि तेवढ्यासाठी आपण ५५०० लिटर पाणी प्रतिवर्षी वाया घालवतो!
बऱ्याच महिलांना बाजारातून आणलेली भाजी बेसिनच्या नळाखाली धुवायची सवय असते. सवय चांगलीच आहे, कारण आजकाल भाज्यांवर इतकी कीटकनाशकं मारली जातात की ती तशीच पोटात गेली तर काय याचा विचारच करवत नाही. परंतु अशा भाज्या धुण्याच्या कार्यक्रमातून तुम्ही शेकडो लिटर पाणी वाया घालवता, हेच पाणी तुम्ही सत्कारणी लावू शकता. हीच भाजी एका मोठ्या भांड्यात घेऊन जर धुतली तर नाही का चालणार? तसं केल्यास वर्षाकाठी तुम्ही इतकं पाणी वाचवू शकाल, की तुमची घरासमोरची बाग त्यावर फुलेल. हे भाजी धुतलेलं पाणी, घरातील फुलांच्या कुंड्यांमध्ये ओता किंवा कुंड्या नसतील तर थोडा अधिक त्रास घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला घाला. ते झाड तुम्हाला सावली देईल, प्राणवायू देईल आणि निसर्ग तुम्हाला धन्यवादही देईल अनेक प्रकारे.
आताच्या कडक उन्हाळ्यात शॉवरखाली अं घोळ कुणालाही करावीशीच वाटते. शॉवरखाली बरं वाटतंय म्हणून कितीवेळ उभं राहायचं यालाही ताळतंत्र असलं पाहिजे. एकदाच अर्धा तास शॉवरखाली उभं राहून अंघोळ करण्यापेक्षा पाच-पाच मिनिटांच्या चार अंघोळी तुम्हाला दिवसातून चार वेळा हवाहवासा वाटणारा गारवा देतील, शिवाय दहा मिनिटांचं तुमच्या अंगावरून वाहून जाणारं पाणी वाचेल. पाच मिनिटांत शॉवरमधून अंदाजे ३५ लिटर पाणी वाहतं. तुम्ही शॉवरखालची दहा मिनिटं वाचवली तर तुम्ही निसर्गाला ७० लिटर पाणी परत देताय. हेच पाणी कुठेतरी पाण्यावाचून तडफडणाऱ्या गावाकडच्या एखाद्या आजीला दिलासा देईल.
आपली कार चकचकीत राहावी म्हणून रोज धुणं तर टाळाच आणि कार धुण्यासाठी कमीत कमी पाणी कसं वापरता येईल ते पाहा. आम्ही काही मित्रांनी एक स्पर्धा ठेवली होती. अगदी कमी पाण्यात कार कोण धुतो याची. एका मित्रानं एक लढ़िटर बाटलीतील पाण्यानं अख्खी मारुती कार चकचकीत धुतली होती. जरा विचार केला तर हे सहज शक्य आहे. आजकाल स्प्रे पंप लावलेल्या बाटल्या मिळतात. त्यांचा वापर करून खरोखरच एक कार एक-दोन लिटर पाण्यात स्वच्छ होते. यासाठी गरज आहे ती थोड्या विचारांची आणि त्याच्या सोबतीला थोड्या सामाजिक जाणिवेची!
जी गोष्ट कार धुण्याची तीच गोष्ट अंगणातल्या बागेला पाणी घालण्याची. एका बागेला पाणी घालण्यासाठी साधारण ६०० लिटर पाणी आपण वापरतो. जरा विचार करा आज आपला शेतकरी आपली अर्ध्या एकरातील डाळिंबांची बाग तेवढ्याच पाण्यात ड्रिप इरिगेशनचं तंत्र वापरून जगवून दाखवतो आणि आपण मात्र त्यामानानं खूप छोटी शोभेच्या फुलांची बाग भरपूर पाणी वापरून फुलवतो. हा अपव्यय आपण टाळू शकतो हेच ड्रिपचं तंत्र वापरून. त्यासाठी फार मोठी मशिनरी नको, मोटारी नकोत. आजकाल लोकांनी पाणी पिऊन बाहेर टाकलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवरील बुचाला पोतं शिवायच्या दाभणानं एक भोक पाडायचं. त्यातून सुताची जाड नाडी ओवून घ्यायची. ही अशी पाण्यानं भरलेली बाटली झाडाच्या वरच्या फांदीला उलटी अडकवायची आणि त्यातून आलेल्या नाडीचं दुसरं टोक झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत पुरायचं. त्या ठिकाणी जमीन थोडी भुसभुशीत असेल तर उत्तम, नसेल तर त्या जागी थोडं शेणखत पसरा. यानंतर प्रत्येक बाटलीत फक्त कमी झालेलं पाणी अधूनमधून पुन्हा भरलं की झालं काम. पाणी वायाही जाणार नाही आणि झाडंही जगतील. तीही अगदी कमी पाणी वापरून.
आणखी एक सवय आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीनं खूप महागात पडते. सकाळी उठल्यावर दात घासणं हा एक अत्यावश्यक कार्यक्रम. हे करताना बरेचसे महाभाग बेसिनवरचा नळ तसाच सुरू ठेवतात. भले पाचदहा मिनिटं त्यांचा हा दंतयज्ञ चालू असतो. एका अंदाजानुसार या पाच मिनिटांत साधारण पाचएक लिटर पाणी बेसिनमधून गटारात वाहून जातं. आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला आणि थोड गणित केलं तर या विधीसाठी अंदाजे एक कोटी ८० लाख लिटर पाणी दररोज वाया जातं. हे पाणी साधारण पंचवीस लाख वस्तीच्या एका गावाची किमान एक दिवसाची तहान भागवू शकेल. जी गोष्ट दात घासण्याची तीच दाढी करतानाही असते. फरक इतकाच, की त्यासाठी त्याहून अधिक पाणी वाया जातं.
प्रवासाला जाताना सोबत घरातून पिण्याचे पाणी न नेता अनेकजण एक लिटरच्या PET बाटल्या विकत घेतात. त्या वापरून झाल्या, की अशा बाटल्या दिसेल तिथे भिरकावल्या जातात. अशा बाटल्या पर्यावरणाला धोकादायक आहेत, कारण अशी बाहेर फेकलेली एक बाटली १००० वर्षांपर्यंत वातावणात तशीच राहू शकते. प्रवासाला आपण कारनं जात असाल तर हल्ली २० लिटरचे प्लास्टिकचे मोठे कॅन मिळतात, त्यातून हवं तेवढं पाणी काढण्यासाठी पंपही मिळतो. असे कॅन दूरच्या प्रवासात तुमची तहान तर भागवतीलच शिवाय बाहेर फेकलेल्या बाटल्यापासून होणारं पर्यावणाचं नुकसान कितीतरी पटींनी कमी करण्यात तुमचा हातभार लागू शकेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link