Next
तुझ्या उपकारा जगी तोड नाही!
आदित्य बिवलकर
Friday, July 05 | 01:00 PM
15 0 0
Share this story


ही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. ठाणे आणि आसपासच्या भागामध्ये त्या काळामध्ये विठ्ठलाचं मंदिर नव्हतं. त्याकाळी विश्वनाथ विनायक पंडित यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी होत्या. या जमिनींना चांगला भावसुद्धा मिळत नसे. त्यामुळे हक्काची जमीन विकण्यापेक्षा तिथे भाविकांसाठी उत्तम असं विठ्ठलाचं मंदिर व्हावं, या इच्छेतून त्यांनी विठ्ठलमंदिर उभारलं. ठाणे जिल्ह्यातील हे विठ्ठलमंदिर. वारकरीपरंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य मंदिराच्या माध्यमातून भरीवपणे करण्यात आलं आणि सुरू आहे.
विश्वनाथ विनायक पंडित यांनी १८१८ मध्ये हे मंदिर बांधलं. त्यांना अध्यात्माची आवड होती. त्यांच्यानंतर आज कुटुंबीयांकडून परंपरागत या मंदिराची देखभाल केली जात आहे. भक्तिभावानं आणि निरलस वृत्तीनं पंडित कुटुंबीय या मंदिराची जबाबदारी सांभाळत आहे. विश्वनाथ विनायक पंडित चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचं व्यवस्थापन केलं जात असून यतीन पंडित सध्या मुख्य विश्वस्त आहेत. तीन वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
मंदिराद्वारे दरवर्षी भाविकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. आजपर्यंत अनेक विद्वान कीर्तनकारांनी प्रबोधनाच्या हेतूनं या मंदिरामध्ये कीर्तनसेवा सादर केली आहे. मामासाहेब दांडेकर, जेजूरकरमहाराज यांसारख्या प्रसिद्ध कीर्तनकारांचा यामध्ये समावेश होता. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं नियमित कीर्तनसप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. यावेळी विविध भागांतील कीर्तनकारांना आमंत्रित केलं जातं. याचबरोबर मंदिराद्वारे महिला विशेष कीर्तनसप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. भागवतसप्ताह, गीतासप्ताह, अखंड हरिनामसप्ताह, संत ज्ञानेश्वरमहाराज संजीवनसोहळा यांसारखे अनेक वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.
आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंदिरामध्ये मोठा उत्सव होतो. कीर्तनसेवा, भजनसेवा, संगीतसेवा यांसह प्रवचन आणि अन्य अनेक उपक्रमांची रेलचेल आषाढीनिमित्त असते. एकादशीला अंदाजे दहा ते पंधरा हजार भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात. दर्शनसोहळ्याचं आयोजन यानिमित्तानं केलं जातं. पहाटे पाच वाजता विधिवत पूजा आणि अभिषेक केल्यानंतर दर्शनसोहळ्याला सुरुवात होते. त्याचबरोबर अन्नदान व महाप्रसाद असे कार्यक्रम असतात. हे सर्व उपक्रम राबवले जात असताना मंदिरातर्फे एक नियम कटाक्षानं पाळण्यात आलेला आहे. मंदिरातर्फे कोणत्याही प्रकारचं दान किंवा आर्थिक मदत या उपक्रमांसाठी मागितली जात नाही. त्याचबरोबर स्थापनेपासूनच वर्गणी, निधीसंकलन यावर फुली मारण्यात आली असून झोळी न पसरता हे सर्व उपक्रम राबवले जातात, हे विशेष. यामुळे एक वेगळी ओळख या संस्थानाला प्राप्त झाली आहे.
सामाजिक भान
सामाजिक क्षेत्रामध्येसुद्धा मंदिराद्वारे मोठं कार्य केलं जातं. संस्थानाद्वारे आरोग्यशिबिरे, अन्नदान, शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत असे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूनं गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. त्याचबरोबर दरवर्षी शैक्षणिक साहित्याची मदत केली जाते. रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठीही मदत केली जाते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link