Next
आपण किती पाणी वापरतो?
दिलीप नेर्लीकर
Friday, February 01 | 03:00 PM
15 0 0
Share this story

एक माणूस दिवसभरात किती पाणी वापरतो? सरळ आणि सोपा प्रश्न. परंतु याचं उत्तर वाचल्यावर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. अगदी काटेकोर हिशोब केला तरी प्रत्येकाला दररोज १५० लिटर पाणी लागतं. पिण्यासाठी तर फक्त ५ लिटर पाणी लागतं, पण तो वापरत असलेल्या इतर गोष्टींसाठी त्याला वरचं १४५ लिटर पाणी लागतं, पण हाही हिशोब चुकतो, कारण हा फक्त वरवरचा हिशोब आहे.
पाणी काही माणसालाच लागतं असं थोडंच आहे. माणूस वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टी बनवण्यासाठी पाण्याची कोणत्या ना कोणत्या कारणासाठी गरज भासतेच. आपण नेहमी जेवणात वापरतो तो साधा एक टोमॅटो शेतातून तुमच्या ताटात येईपर्यंत अंदाजे १३ लिटर पाणी वापरतो. अंदाजे १५० ते १७० लिटर पाणी एक बाटलीभर बियर तयार करण्यासाठी खर्ची पडतं. तुम्ही अंगावर चढवता तो कॉटनचा टीशर्ट बनवेपर्यंत ४,००० लिटर पाणी वापरलं जातं. अर्थात या हिशोबात त्यासाठी लागणारा कापूस शेतात लावल्यापासून टीशर्ट बनेपर्यंत लागणारं पाणी गृहीत धरलं आहे. माणूस दिवसभर वापरत असलेल्या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर त्याला साधारण ४५०० लिटर म्हणजे ४.५ टन पाणी दररोज लागतं.
आता आपण त्याच्या इतर गरजांसाठी किती पाणी तो वापरतो ते पाहू. टॉयलेट फ्लश करण्यासाठी एकावेळी सरासरी आठेक लिटर पाणी वापरलं जातं. हो, पण जर ती लो फ्लश टॉयलेट असेल तर. काही काही घरात मी पहिलंय, की स्वच्छतेचा अतिरेक म्हणून तिथं हाय फ्लश टॉयलेट वापरल्या जातात. एखादा नवखा माणूस त्या घरात गेला आणि त्यानं एकदा का ती  टॉयलेट फ्लश केली की वाहून जाणारं पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं, की तो ओघ थांबेपर्यंत आपला मध्यमवर्गीय जीव टांगणीला लागतो.
अंघोळीसाठी खरं तर एक बादली म्हणजे अंदाजे ४० लिटर पाणी पुरतं. परंतु एका आकडेवारीनुसार एक माणूस साधारण ८० लिटर पाणी त्यासाठी वापरतो. आजकाल बहुतांश घरात शॉवर बसवलेला असतो. खरं तर त्याचा योग्य वापर केल्यास साधारण ३५ लिटरमध्ये काम भागतं, पण नाही, बरेचसे महाभाग अंगाला रगडून रगडून साबण लावत असतानाही शॉवर तसाच चालू ठेवतात आणि त्यामुळे प्रत्येकाच्या अंघोळीसाठी पाण्याची बचत तर होत नाहीच, उलट यासाठी १०० लिटरपेक्षा अधिक पाणी लागतं आणि ते बऱ्याच घरातून सांडपाणी म्हणून गटारात सोडलं जातं. हे पाणी खरं तर आपण बागेतील झाडांना घालू शकतो.
आजकाल माणसाच्या हातात जरा पैसा आला, की त्याची गरज असो किंवा नसो प्रत्येकाच्या स्वप्नात कार येते. या इएमआयच्या जमान्यात ती घेणं अत्यंत सोपं आणि सरळ आहे. कार एकदा घेतली की त्यावर छुपा खर्च किती असतो ही गोष्ट अलाहिदा! माझी कार दुसऱ्याच्या कारपेक्षा चकचकीत दिसली पाहिजे यासाठी भरमसाठ पाणी वापरून ती घासूनपुसून स्वच्छ केली जाते, बऱ्याच वेळा ती डांबरी रस्त्यावर उभी करून धुतली जाते. या स्वच्छतेमुळे वापरलेलं पाणी सरळ वाहून एक तर गटारात जातं किंवा त्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणात जातं. हीच कार जर का तुमच्या घरासमोरच्या फरशी न घातलेल्या अंगणात धुतली तर ते पाणी जमिनीत मुरेल आणि लगेच नाही परंतु कालांतरानं ते तुमच्या उपयोगी पडेल.
आजकाल शीतपेयाच्या भल्यामोठ्या बाटल्या असतात. अशा बाटल्यांना फवारणी करता येण्यासारखी जोडणी असणारी बुचं मिळतात. एक कार स्वच्छ पुसण्यासाठी तीन चार लिटरची अशी एक बाटली पुरते. विचार करा, घरातील प्लास्टिकची होज पाइप घेऊन तीच कार धुण्यासाठी तुम्ही कमीत कमी २५० लिटर पाणी वाया घालवता.
आणखी एक शौक आपल्यासारख्या सामान्यांनाही असतो, तो म्हणजे आपल्या घरासमोर एक बगीचा असावा. यासाठीही पाणी लागतं. बऱ्याच घरात पाणी घालायची झारी उचलायचे कष्ट नकोत म्हणून इथेही प्लास्टिकच्या नळीनं पाणी घातलं जातं आणि बऱ्याच वेळा ते पाटातून सोडलं जातं. ते झाडांच्या मुळाना पोचण्याआधी जमिनीत मुरतं. यासाठी अंदाजे ५५० लिटर पाणी एका सामान्य घरातील साध्या बागेसाठी लागतं. हो, आपण बागेला दिवसात कोणत्यावेळी पाणी देतो हे तर पाहतच नाही. बागेला पाणी देताना एक तर ते सकाळी किंवा संध्याकाळी देणं योग्य आहे, कारण त्यावेळी पाण्याचं बाष्पीभवन कमी प्रमाणात होत असल्यामुळे त्यावाटे होणारा पाण्याचा अपव्यय कमी होतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link