Next
तहानभुकेचे विस्मरण!
अनुजा हर्डीकर
Friday, May 03 | 03:00 PM
15 0 0
Share this story

उन्हाळ्याचा प्रचंड त्रास, सतत येणारा घाम, चिकचिक.... काही खायची इच्छा होत नाही. कितीही पाणी, सरबते प्यायली तरी तहान काही कमी होत नाही. हे उन्हाळ्याचे मोठे दिवस काही मुलांच्या म्हणजे खरे तर पालकांच्या मते, जाता जात नाहीत. प्रत्येक सुट्टीत गावाला किंवा फिरायला जाणे काही शक्य नसते. एरवी शाळा आणि क्लासमध्ये दिवसाचे आठ-आठ तास अडकणाऱ्या मुलांना सुट्टीत नेमके कशात रमवायचे, हा मोठा प्रश्न असतो.
...आईबाबा आणि त्यांच्या मित्रांच्या चर्चा आजोबा ऐकत होते. न राहवून ते मध्येच म्हणाले, “आमची पिढी नशीबवान म्हणायची बुवा, आपल्या मुलांचे नेमके काय करायचे, हे प्रश्न आम्हाला कधी पडले नाहीत.”
“अहो आबा, आम्ही मनसोक्त हुंदडायचो. सकाळचा नाश्ता करून बाहेर खेळायला गेलो की दुपारी आईला ओरडून ओरडून जेवायला बोलवायला लागायचं. आजूबाजूला सहज फिरत जाताना जांभळ, करवंदं, बर्फाचे गोळे, पेप्सी असा बराच खुराक खाता खाता दिवसातला वेळ अपुरा पडायचा.”
त्यांना मध्येच थांबवत आबा म्हणाले, “मग आता काय झालं?”
“अहो, हल्ली मुलांना कंपाऊंडच्या बाहेर सोडायची भीती. शिवाय ह्यांना मातीत खेळायची वगैरे सवयच नाही.”
“आता ह्यात दोष कोणाचा?” आबांना मध्येच तोडत स्वरूपचे बाबा काही बोलणार तेवढ्यात आबाच पुन्हा म्हणाले, “खरं आहे रे, दोष तर कोणाचाच नाही. आहे ती परिस्थिती स्वीकारण्यावाचून पर्याय नाही. मात्र तोडगा काढायला हवाच ना. एक गोष्ट नक्की की, हातात मोबाइल किंवा डोळ्यांसमोर टीव्ही असला की मात्र तुम्ही म्हणता तसा ह्या मुलांना कसलाही त्रास होत नाही. परवाचीच गोष्ट ऐक- इतक्या उन्हाळ्यात पंखाही न लावता स्वरूप मोबाइलवरचे गेम खेळण्यात मस्त गुंग झाला होता. घामाच्या धारा वाहत होत्या, मात्र त्या पुसण्याचीही त्याला शुद्ध नव्हती. शेवटी मलाच बघवेना म्हणून मी उठून पंखा सुरू केला, तर म्हणतो कसा पठ्ठा, ‘थँक्स हं आबा, इतकं उकडतंय, पण उठलो असतो तर गेम हरलो असतो ना!’ जेव्हा ही मुलं बाहेर खेळून येतात तेव्हाही कुठे होतो त्यांना उन्हाळ्याचा त्रास? तेव्हा आपण असं काहीतरी काम त्यांच्यासाठी शोधलं पाहिजे की ते तहानभूक हरपून कामाला लागतील, म्हणजे आपोआप त्यांच्याकडे असलेल्या वेळेचंही गणित सुटेल.”
आबांच्या बोलण्यात तथ्य असल्याने मुलांना अशा कामात रमवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ते कामाला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःचे आवरून झाल्यावर आबा साडेनऊ–दहाच्या सुमारास पाण्याच्या मोठमोठ्या बाटल्या पिशवीत भरू लागले. सोबत प्लास्टिक कंटेनरही होते.
“काय हो आबा, कुठे निघालात?” स्वरूपने विचारले.
“अरे, एवढा उकाडा आहे. जरा स्टँडपर्यंत जाऊन येतो. कोणाला काही पाणी वगैरे हवे असेल तर देतो.”
“आबा, कशाला उगाच काहीतरी करता? हल्ली प्रत्येक जण स्वतःची पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडतो.”
“अरे, कोणी एखादा विसरलाच असेल तर? आणि जर का कोणालाच पाणी नको असेल तर रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी या प्लास्टिक कंटेनरमध्ये पाणी ठेवेन.” आबांचा विचार स्वरूपला अजिबात आवडला नाही. तसे त्याने दर्शवूनही दिले.
“अरे, घरात बसून वेळ जात नाही. तुमच्यासारखं मोबाइलवर वेळ घालवायला जमत नाही. तेव्हा पाय मोकळे करून येतो.. झालीच तर एखाद्याला मदत!” असे सांगून आबांनी चपला पायात सरकवल्या.
“थांबा मीपण येतो.” असे म्हणत स्वरूपने आबांच्या हातातल्या पिशव्या घेतल्या. तोही सोबत निघाला.
कन्स्ट्रक्शन साइटवर काम करणारे काही कामगार त्यांच्या कुंटुबासमवेत एसटीतून उतरले. त्यातली तीन-चार लहान मुले खूपच रडत होती. मोठी माणसे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन त्यांना ओढत नेत होती. स्वरूपने त्यांना थांबवले आणि प्यायला पाणी दिले. ती मुले पाणी पीत असताना त्याच्या मनात काय आले कोणास ठाऊक, पाण्याची बाटली आबांच्या हातात देऊन तो धावत समोरच्या दुकानात गेला. तिथून त्या मुलांसाठी बिस्किटांचा छोटासा पुडा घेऊन आला. खिशातला मोबाइल काढून कोणालातरी फोन केला आणि पुढच्या दहा मिनिटांत स्वरूपचे अनेक मित्र स्टँडवर गोळा झाले.
आबांच्या पहिल्याच प्रयत्नाला यश आले होते. आबाही थोडावेळ त्यांच्यासोबत थांबले. अनेक जणांनी या मुलांचे कौतुक केले. घामाच्या धारांतही त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. मग मुलांनीच आबांना घरी जायला सांगितले. ‘पक्षी-प्राण्यांसाठी रस्त्याच्या कडेला पाणी ठेवायला विसरू नका’ असे सांगून आबा निघाले. आबा-नातवंडांचा हा नित्य दिनक्रम आता सुरू झालाय... तहानभूक हरपून ही मुले दुसऱ्यांची तहान भागवत आहेत...

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link