Next
साकुरा फुलला
विद्या धामणकर
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

साकुरानं डवरलेल्या झाडांचे फोटो अनेक वर्षांपूर्वी पाहिले होते आणि तो साकुरा त्याच्या मनमोहक रंगरूपासह माझ्या मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसला होता. तरीही तो जपानला जाऊन पाहू शकेन असं वाटलं नव्हतं. नंतर कधीतरी प्रवासीकंपन्या जपानच्या टूर्स काढायला लागल्यावर मनात अंकुर फुटायला लागले. प्रत्यक्ष योग जमून यायला काही वर्षं जावी लागली. याचं कारणही तसंच आहे. साकुराचा मोसम जेमतेम महिना-दीड महिनाच टिकतो. साकुरा या जपानी शब्दाचा अर्थ चेरी ब्लॉसम. पूर्ण फुललेल्या साकुराचं झाड पाहणं हे अतिशय आल्हाददायक असतं. हा आनंद आम्हाला जपानच्या टूरमध्ये खूप मिळाला.
संपूर्ण जपानच्या टूरमध्ये हा साकुरा सतत भेटत होता. सुरुवातीला तुरळक ठिकाणी दिसला. मग काही ठिकाणी रस्त्यात दुतर्फा स्वागताला सज्ज असायचा. तळ्याकाठी पाण्यात स्वत:चं प्रतिबिंब पाहताना दिसायचा. बागांमध्ये तेवढा पूर्ण बहरात आलेल्या स्वरूपात दिसला. इथे साकुरा फुलला की लोक त्याचा बहर साजरा करण्यासाठी बागांमध्ये झाडांखाली जमतात. कुटुंबाबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर सहलीसाठी येतात. खातात, पितात, गप्पा मारतात. मजेत वेळ घालवतात. ही प्रथा मला फार आवडली.
जपानमधील ओसाका या शहरापासून टूरला सुरुवात झाली. टोकियो हे जपानमधील सर्वात मोठे शहर आणि ओसाकाचा नंबर दुसरा. ओसाका हे मोठे बंदर आहे. इथून सर्वात जास्त तांदूळनिर्यात होते. त्यामुळे त्याला देशाचं स्वयंपाकघर असं म्हणतात. शहर तसं सिमेंटचं जंगलच वाटलं. ओसाका कॅसल आणि त्याचा परिसर मात्र त्याला अपवाद होते. एका रम्य टेकडीवरचा हा कॅसल देखणा आहे. जुन्या पद्धतीच्या पॅगोडासारखं देखणं बांधकाम आहे. परिसरातील बाग सुंदर आहे. टेकडीवरून शहराचं दर्शनही होतं. १४.८ मीटर उंचीच्या या कॅसलभोवती पाण्याचा खंदक आहे. दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बहल्ल्यात याचं खूप नुकसान झालं होतं. त्यानंतर तो पूर्ववत बांधण्यात आला. आता इथे चेरीची २००० झाडं आहेत. ती पूर्ण बहरली की दिसणारं दृश्य अद्भुतच असलं पाहिजे. हे कॅसल आतून पाहण्याची परवानगी नाही. त्यामुळे बाहेरूनच फोटो काढून निघालो. क्योटो ही जपानची शाही राजधानी समजली जाते, कारण इथे जपानच्या राजाचा राजमहाल आहे. तिथे प्रवेशबंदी असली तरी राजाची ‘इंपिरियल बाग’ सर्वांसाठी खुली आहे. चेरी ब्लॉसम म्हणजे साकुराचा मोसम असल्यामुळे बाग छान बहरली होती. पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या साकुरानं मनावर गारूड केलं. कॅमेऱ्याला विश्रांतीच नव्हती. फुलांचे आणि फुलांबरोबर आमचेही भरपूर फोटो काढले. क्योटोमधील तोडाईजीमंदिर प्रशस्त आहे. बुद्धाची भव्य ब्राँझची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. जवळच नारा डीयर पार्क होतं, जिथे हरणं मोकळी सोडलेली होती. विशेष म्हणजे ती माणसांना बुजत नव्हती. क्योटोमधील किंकाऊजी हे दुसरं मंदिर पाहायला गेलो. छोट्या तलावाच्या काठावरचं, हिरव्यागार वनराईच्या सोबतीनं उभं असलेलं हे सोनेरी रंगाचं मंदिर बघणाऱ्याला क्षणभर स्तिमित करून टाकतं. अगदी चित्रासारखी या मंदिराची रचना आहे. हा परिसर आणि मंदिर मन अगदी मोहवून टाकतं. इथेही साकुरा भेटला.
हिरोशिमाला जाताना मनात अनेक विचार येत होते. ६ ऑगस्ट १९४५ रोजी दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बनं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं शहर. प्रत्यक्षात त्याचा पूर्ण कायापालट झाला आहे. महायुद्धातील हानीची आठवण म्हणून एक पडीक इमारत तशीच ठेवण्यात आली आहे. बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवळच ‘पीस मेमोरियल’ बांधण्यात आलं आहे. एक म्युझियमही उभारण्यात आलं आहे. इथले फोटो पाहून आणि माहिती वाचून मन विषण्ण होतं. यानंतरच्या दिवशी मात्र बुलेट ट्रेनचा प्रवास असल्यामुळे खूप उत्सुकता दाटून आली होती, कारण आम्ही जगातल्या सर्वात जलद ट्रेनमधून प्रवास करणार होतो. बुलेट ट्रेन हे जपानचं खास वैशिष्ट्य. तिथे तिला ‘शिन्कान्सेन’ असं संबोधण्यात येतं. १९६४ साली ती इथे सुरू करण्यात आली. बुलेट ट्रेन आणि इतर (म्हणजे सामान्य वेगाच्या) ट्रेन यांची स्टेशनं पूर्णपणे वेगळी आहेत. एका तासाला ती २८० ते ३०० किलोमीटर या वेगानं प्रवास करते. आम्ही हिरोशिमा ते नुमाझू हा प्रवास बुलेट ट्रेननं केला. अतिशय आरामशीर प्रवास व्हावा अशी याची अंतर्गत रचना आहे.
नमाझूला ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथल्या रूममधून दिसणारा देखावा फारच सुंदर होता. समोरच पसरलेला निळा समुद्र आणि एका बाजूला गर्द झाडी पाहत राहण्याचा मोह हॉटेल सोडायचं असल्यामुळे आवरता घ्यावा लागला. दुसऱ्या दिवशी माऊंट फुजियामा पाहायला जायचं ठरल्यावर शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकात वाचलेली माहिती आठवायला लागली. जपानमधला हा सर्वात उंच ज्वालामुखीपर्वत. जपानची राजधानी टोकियोपासून १०० किलोमीटरवर असलेल्या ३७७६ मीटर उंचीच्या या पर्वताला जपानी लोक पवित्र मानतात. बर्फाच्छादित असलेला हा पर्वत लांबून फार सुंदर दिसतो. या देशाचं ते एक सांस्कृतिक प्रतीक आहे. बर्फामुळे आणि थंड
वाऱ्यामुळे एका ठरावीक उंचीपर्यंतच याच्यावर जाता येतं. हवा बरी असेल तर लोक आणखी वर चढून जाऊ शकतात, पण बोचरं वारं असेल तर मात्र जास्त वेळ थांबताही येत नाही. फुजियामावर ट्रेकिंग करणं तिथे लोकप्रिय आहे.
किमोनो हा तिथल्या स्त्रियांचा पारंपरिक पोशाख आहे. हल्ली फार कमी स्त्रिया वापरतात, कारण पाश्चात्त्य ड्रेस इथे सर्वमान्य आहे. आम्हाला अधूनमधून काही तरुण मुली सुंदर किमोनो घालून आणि त्याला साजेशी केशरचना करून रस्त्यातून जाताना दिसल्या. गोड जपानी बाहुल्याच जणू. आमच्याबरोबर असलेल्या जपानी गाईडनं सांगितलं, की हल्ली समारंभांना किंवा कार्यक्रमांना हौसेनं किमोनो घालण्याची फॅशन आली आहे. त्यानं आम्हालाही किमोनो घालून फोटो काढण्यासाठी एका दुकानात नेलं. केशरचना आणि मेकअप करण्याचं काही धैर्य झालं नाही, परंतु किमोनो घालून हौसेनं फोटो काढून घेतले.
आता ट्रिपचा शेवटचा टप्पा आला. २०१२ साली बांधून पूर्ण झालेला स्कायट्री हा टॉवर पाहायला गेलो. ६३४ मीटर उंचीचा हा टॉवर सुमिदा नदीच्या काठावर बांधला आहे. टॉवरवर जाण्यापूर्वी एका छानशा बोटीमधून नदीतून विहार करण्याचा आनंदही आम्ही घेतला. टॉवरच्या ३५०व्या मजल्याच्या टेंबो डेकवरून टोकियो शहराचं सुंदर विहंगम दृश्य दिसतं. रात्र पडल्यावर दिव्यांमुळे शहर नुसतं लखलखत होतं. हेच दृश्य मनात ठसवून जपानला ‘सायोनारा’ केलं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link