Next
प्रायोगिक नाटकांचा कणा
सुषमा देशपांडे
Friday, February 08 | 03:15 PM
15 0 0
Share this story१९७१ साली ‘आविष्कार’ची सुरुवात झाली. अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे आणि अरुण काकडे या मंडळींनी ‘आविष्कार’चं रोपटं लावलं. प्रायोगिक रंगभूमीवर नव-नवीन प्रयोग करणे ही त्यामागची मूलभूत संकल्पना होती. प्रायोगिक नाटकांची संख्या कधी जास्त असते तर कधी तो प्रयोग फसतो. परंतु ‘आविष्कार’च्या मंचावर प्रायोगिक स्वरुपात झालेला प्रयोग हा उद्या व्यावसायिक रंगभूमीवर येतोच.

त्याकाळी सुलभाताई ‘आविष्कार’च्या बरोबरीने मुलांसाठी ‘चंद्रशाला’ चालवायची. ‘दुर्गा झाली गौरी’, ‘पंचतंत्र’ या नाटकातून अनेक कलाकार रंगभूमीला मिळाले. आज मुंबईतील कलाकारांना विचाराल तर त्यांच्यापैकी बहुतांशी कलाकार हे लहानपणी चंद्रशालेतूनच पुढे आलेले आहेत. नाटकं करत असताना कलाकारांचं एक मोठं प्रशिक्षण या संस्थांमध्ये व्हायचं. काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी सतत उत्सुक असलेली संस्था म्हणजे ‘आविष्कार’. आजही नवोदित कलाकारांना ‘आविष्कार’चा मोठा आधार असतो. सध्या आम्ही ज्या नाटकाची तालीम करतोय ते नाटक युगंधर देशपांडे याने लिहिलेलं आहे. आता युगंधर हा पंढरपूर मधील एक तरुण मुलगा. त्याचं हे पहिलं नाटक आणि ते ‘आविष्कार’च्या वर्धापन दिन समारंभात सादर होणार आहे. आजकाल पटकन कुणी तरुण लेखकांवर विश्वास ठेवत नाही. तरीपण युगंधर चांगलं लिहितोय, त्याच्या लिखाणाची जातकुळी वेगळी आहे म्हटल्यावर त्याने ते नाटक करावं यासाठी ‘आविष्कार’ त्याच्या मागे उभी राहते यातच सगळं आलं. आज जागेची मुख्य अडचण असूनही संस्थेची क्रियाशीलता थांबलेली नाही हे विशेष. छबिलदासमध्ये जागा मिळत होती, तेव्हा अनेकांची नाटकं ‘आविष्कार’ ने केलेली आहेत. नवीन मुलांना संधी मिळावी यासाठी ही संस्था सतत पुढाकार घेत आली आहे. लेखक-दिग्दर्शकांच्या मागे ठामपणे उभं राहणं एवढंच नाही तर त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं व तेही सातत्याने इतकी वर्षं... हे सोपं काम नाही. अशा संस्थेपुढे आज जागेचा प्रश्न निर्माण व्हावा हे फारच खेदजनक आहे.

माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, मी १९८९ साली ‘व्हय मी सावित्रीबाई’ चे प्रयोग सुरू केले. तेव्हा, ‘कोण आहे ही हा वेगळा प्रयोग करणारी मुलगी’, असं विचारत अरुण काकडे काका मला शोधत आले आणि म्हणाले की, ‘तुला मुंबईला छबीलदासला हा प्रयोग करायचा आहे.’ ती त्यांची आणि माझी पहिली भेट. मुंबईत छबीलदास मध्ये होणाऱ्या ‘आविष्कार’च्या प्रयोगांबद्दल ऐकून होते, परंतु माझा कधी संबंध आला नव्हता. छबिलदासमध्ये मी तो प्रयोग केल्यानंतर काकांनी मला सांगितलं की, ‘यानंतर तुला जेव्हा प्रयोग करायचा असेल तेव्हा छबिलदास तुझ्यासाठी विनामूल्य उपलब्ध असेल.’ तेव्हा जसे ते माझ्या मागे उभे राहिले होते तसे आज युगंधरच्या मागे उभे आहेत. एवढा मोठा पल्ला संस्थेने गाठलेला आहे. कुठे काय नवीन चाललं आहे याचा काकडे काका सतत शोध घेत असतात. काका प्रयोगांसाठी सतत चांगल्या जागेच्या शोधात फिरत असतात...अजूनही.

‘आविष्कार’च्या नाटकात काम केलेलं नाही असं कोण आहे विचारा. अगदी सत्यदेव दुबे यांनीही ‘आविष्कार’ मध्ये नाटकं केलेली आहेत, त्यांनाही ‘आविष्कार’च्या क्रियाशीलतेचं अप्रूप होतं. इतकी वर्षं एक संस्था अखंड प्रयोग करत राहते, प्रायोगिक रंगभूमी जिवंत ठेवते याचं दुबेंनाही आकर्षण आणि कौतुक होतं. ‘आविष्कार’साठी अगदी भास्कर चंदावरकरांपासून ते आजच्या राहुल रानडे पर्यंत अनेकांनी संगीत दिलेलं आहे. आज अशी दुसरी संस्थाच नाही. काकडे काकांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षं पूर्ण झाली तेव्हा त्यांनी दर महिन्याला एक नाटक सादर करण्याचा संकल्प सोडला होता. त्यावेळी त्यांनी मला विचारलं होतं. माझ्या ‘सं.बया दार उघड’ या नाटकाचा पहिला प्रयोग मी तिथे केला होता. काका कधीच थांबत नाहीत. ‘चित्रगोष्टी’ सारखं नाटक जे सुधीर पटवर्धनांच्या पेंटिंग्जवर आधारित होतं, त्याची निर्मिती सोपी नव्हती. पण ते शिवधनुष्य काकांनी उचललं आणि पेललं.

‘आविष्कार’मध्ये काय होत नाही ! अहो, नाटकाचा अनुभव शेअर करण्याची जी क्रिया असते ती तिथे घडते, तिथे चर्चा होतात, विचारांचं आदान-प्रदान होतं, लेखक-दिग्दर्शकाला सल्ले दिले जातात, सुचवलं जातं पण कधीच सल्ले, सूचना पाळण्याची सक्ती कलाकारावर केली जात नाही. ‘आविष्कार’ हा प्रस्थापित कलाकार आणि नवीन कलाकार यांच्यातील एक वेगळ्या पद्धतीचा पूल आहे. ‘आविष्कार’च्या मंचावर सादर होणारं आजच प्रायोगिक नाटक हे उद्याचं व्यावसायिक नाटक असतं. चंद्रकांत कुलकर्णीने ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ ही जी नाट्यत्रयी केली ती आधी ‘आविष्कार’च्या मंचावरच त्याने सादर केली होती.
संस्थेने परीक्षा पाहणारे अनेक कठीण प्रसंग अनुभवले आहेत. पण काकडे काकांनी त्याची छाया कधीही कलाकारांवर पडू दिली नाही. आर्थिक संकटे आली तरी काका म्हणतात, ‘तुझं काम नाटक बसवायचं आहे ना! तू त्यावर लक्ष केंद्रित कर. बाकी मी बघेन.’ नाटक पुढे किती चालेल, ते पैसे मिळवून देईल की नाही हे खरंतर कुणालाच माहीत नसतं. पण तरीही काका नाटकांची निर्मिती खूप मनापासून करतात. संस्था म्हणजे तरी नेमकं काय, तिथे काम करणारी माणसं हीच तिची ओळख असते ना ! नाटक त्यांचा श्वास आहे. कितीही संकटं आली तरी काका शांतपणे पण मोठ्या धैर्याने उभे राहतात. ‘आविष्कार’च्या लोकांना व्यवहार समजत नाही, बाकी काही काही समजत नाही. नाटक करत राहिलं पाहिजे एवढंच त्यांना समजतं. व्यायसायिक रंगभूमीवरची माणसं कधी कधी फार कुचेष्टेने बोलताना मी पाहिली आहेत, ‘काय ते तुमचं प्रायोगिक.’ पण ते हे विसरतात की प्रायोगिक रंगभूमी आहे म्हणून नवीन प्रयोग होतात आणि व्यावसायिक रंगभूमीची वाट सोपी होते. त्यात ‘आविष्कार’चं योगदान खूप मोठं आहे. इतकी वर्षं संस्था एका समर्पित भावनेने काम करत आहे. आपली स्वतःची जागा नाही, सरकारकडून अर्थसहाय्य नाही अशा परिस्थितीतही संस्था चालू आहे. संस्थेने उपक्रम बंद केले नाहीत की कधी अडचणींना कुरवाळत बसली नाही. संस्थेची वाटचाल चालूच राहिली. काकडे काका म्हणतात, ‘प्रयोग करत राहणं ही रिसर्च लॅब जर चालू नाही ठेवली तर सगळ्यालाच मर्यादा येईल.’ या संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक विकासाचा मार्ग उभा राहतोय हे टीका करणाऱ्या लोकांच्या दुर्दैवाने लक्षातच येत नाही. सांस्कृतिक जडणघडणीत हे खूप महत्त्वाचं आहे. धंदेवाईक प्रयोग कुणीही करू शकतं, पण ज्यात मला माहितेय की माझ्याच पदरचे पैसे जाणार आहेत आणि तरीही मी ते करते हे वाटतं तितकं साधं-सोपं नाही. आजच्या मुलांना जर हे रस्ते बंद केले तर वर्षातून होणाऱ्या एखाद-दुसऱ्या एकांकिका स्पर्धांच्या पलीकडे काय राहणार आहे ? कलाकारांची जी काही वर्षं ‘आविष्कार’मध्ये जातात ती त्याला आयुष्यभर पुरेल एवढं देऊन जातात. म्हणूनच चंद्रकांत कुलकर्णी असो, सचिन खेडेकर असो – ‘मौनराग’ चे प्रयोग ते आजही करत असतात. ‘आविष्कार’ने नेहमीच नव्या संकल्पनांना जागा दिलेली आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रायोगिक नाटकांचा कणा असलेल्या या संस्थेकडे मात्र आज जागा नाही... आता काय आणि कसं शासनाला समजावणार ? नाट्यक्षेत्रात सातत्याने संशोधन करण्याचं आणि नवा रस्ता तयार करण्याचं ‘आविष्कार’चं जे योगदान आहे ते अमुल्य आहे. सरकारने खरतरं न मागता जागा द्यायला हवी. नवीन प्रयोगांच्या मागे उभे राहण्याची ‘आविष्कार’ची जी ताकद आहे त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आता तरी उमगेल का!
(शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link