Next
‘आयर्न थ्रोन’चे दावेदार
श्रिया गुणे
Friday, May 10 | 04:00 PM
15 0 0
Share this story

एखादा कथा-कादंबरीकार आपल्या लेखणीतून एक नवीन काल्पनिक विश्व उभं करतो. त्या विश्वाला त्यातली पात्रं जिवंत करत असतात. जर ही पात्रं कृत्रिम वाटली तर ते विश्वही जिवंत वाटत नाही, पण जर ही पात्रं खरीखुरी वाटली तर मात्र हे नवं काल्पनिक विश्व जिवंत, अजरामर होऊन जातं. गेम ऑफ थ्रोन्स या जगभरात गाजत असलेल्या मालिकेतलं विश्वही त्यातल्या पात्रांनीच जिवंत केलंय. नेड स्टार्कपासून रामझी बोल्टनपर्यंत सगळ्यांचे आपापले गुणदोष आहेत, महत्त्वाकांक्षा आहेत, लोभ, असूया, द्वेष, कपट, प्रेम सगळंच आहे. प्रत्येकाचा इतिहास-भूगोलात त्याच्या वर्तमानातल्या वागण्याची आणि भविष्यातल्या फळांची मुळं आहेत. मालिका शेवटाकडे आलेली आहे, फक्त दोन एपिसोड बाकी आहेत. आपली आवडती कित्येक पात्रं आता जिवंत नाहीत आणि जी जिवंत आहेत त्यांचं काय होणार याची चिंतामिश्रित उत्सुकता सगळ्या चाहत्यांना सतावत आहे. चला तर मग भेटू या आयर्न थ्रोनचे प्रमुख दावेदार आणि कथेच्या प्रवासातले महत्त्वाचे मोहरे असलेल्या आपल्या आवडत्या पात्रांना…


धाडसी पण निष्ठुर : सर्सी
सर्सी आपल्याला पहिल्यांदा भेटते ती रॉबर्ट बॅराथोन म्हणजेच ‘वेस्टरोस’च्या राजाची सुंदर पण असंतुष्ट आणि कपटी राणी म्हणून. तिचे स्वत:च्या सख्ख्या भावाशी असलेले अनैतिक प्रेमसंबंध आपल्याला अवाक् करतात आणि ते गुपित लपवत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तिची चाललेली कारस्थानं तिच्यात मुरलेल्या राजकारणीपणाची चुणूक दाखवतात.
सर्सीचं फक्त तिच्या तीन मुलांवर आणि भाऊ जेमीवर प्रेम असतं आणि बाकी सगळं जग आपलं शत्रू आहे हे वास्तव तिनं कधीच ओळखलेलं असतं. आपल्या सत्तेच्या आड येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा काटा काढत तिचा प्रवास ‘आयर्न थ्रोन’वर बसून ‘वेस्टरोस’ची पहिली महिला सत्ताधीश होण्यापर्यंत पोहोचलाय. तिन्ही मुलं गमावल्यानंतर, हाय स्पॅरोनं शहरभर तिची धिंड काढल्यानंतर आणि जेमी तिच्यापासून दुरावल्यानंतर ती अधिकच निर्दय, निष्ठुर आणि निर्विकार झाली आहे.  जॉन आर्यनचा काटा काढण्यापासून ग्रेट सेप्टऑफ बेलर आणि तिथे जमलेले हाय स्पॅरोसह सगळे शत्रू जाळून खाक करेपर्यंतचा सर्सीचा प्रवास क्रौर्याच्या एकेक सीमा ओलांडत चालला आहे. तिला ‘डिनेरिस’चं आव्हान परतवून सत्ता टिकवून ठेवता येते की तिच्या जीवनप्रवासाचा अंत होतो हे येत्या दोन भागांमध्ये कळेलच. कारण सर्सीच्याच भाषेत सांगायचं तर “When you play the game of thrones, you win or you die,  there is no middle ground.”


मदर ऑफ ड्रॅगन : डिनेरिस टारगॅरियन
मॅड किंग एरिस  टारगॅरियनविरुद्ध बंड करून  रॉबर्ट बॅराथोन सत्तेवर येतो. ऱ्हेगार  या एरिसच्या मुलालाही युद्धात संपवल्यानंतर टारगॅरियन  घराणं आणि त्यांचे ड्रॅगन्स फक्त गोष्टींपुरतेच उरतात. परंतु वेस्टेरोसबाहेर एरिसची एक मुलगी डिनेरिस आणि मुलगा व्हिसेरिस गुप्तपणे जिवंत असतात आणि आपलं गेलेलं राज्य परत मिळवण्याची स्वप्नं रंगवत असतात. राज्य परत मिळवायला सैन्य हवं म्हणून व्हिसेरिस आपल्या बहिणीचं लग्न डोथ्राकी नावाच्या क्रूर टोळीचा म्होरक्या ड्रोगाशी लावायचं ठरवतो. ड्रोगो डिनेरिसचे अमानुष हाल करतो. ती ते सहन करते. पण हळूहळू ती त्याच्या हृदयात आणि या डोथ्राकी सैन्याच्या मनात आपली जागा निर्माण करते. तिला ड्रॅगनची तीन अंडी लग्नात भेट मिळालेली असतात. किंग्ज लँडिंगवर चाल करण्याच्या तयारीत असताना ड्रोगोचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि डोथ्राकींमध्ये दुफळी माजते. ड्रोगोच्या चितेबरोबर डिनेरिस आपली ही ड्रॅगन्सची अंडी घेऊन जळत असते. परंतु आग विझल्यावर ती तीन लहान ड्रॅगन्ससह जिवंत बाहेर येते आणि जन्म होतो आपल्या मदर ऑफ ड्रॅगन्सचा. हे तीन ड्रॅगन्स आणि डोथ्राकी सैन्य घेऊन तिचा कारवाँ चालू पडतो.. रस्त्यातली एकेक गावं गुलामगिरीतून मुक्त करत. सोबत येतात जोराह, दारियो नहारिस, मिसांदेई, अनसलिड योद्धे. जनसामान्यांचा विश्वास आणि आशीर्वाद डिनेरिसलाला खात्री करून देतो की तिचाच ‘आयर्न थ्रोन’वर खरा हक्क आहे. पुढे टिरीयन लॅनेस्टर्ससारखा हुशार मदतनीस आणि व्हेरससारखा कुटिल राजकारणी तिला येऊन मिळतात. ती आपल्या जन्मस्थळी ड्रॅगन्सस्टोनला तळ ठोकून आहे. मार्टेल्स, टायरेल्ससारखी मित्रघराणी संपली असली तरी विंटरफेलच्या युद्धात साथ दिल्यानं उत्तरेकडची घराणी तिच्यासोबत आहेत. जॉन स्नोवर तिचं प्रेम आहे पण तो लियाना स्टार्क आणि ऱ्हेगार टारगॅरियनचा मुलगा असल्यानं त्याचाही आयर्न थ्रोनवर हक्क असल्याचं आता उघड झालंय. एकच ड्रॅगन, तुटपुंजं सैन्य शिल्लक असताना, व्हेरिससारखे सहयोगी तिच्याविरुद्धच कटकारस्थानं करत असताना डिनेरिस काय करते हे बघणं रंजक ठरणार आहे. अन्याय, अत्याचार, द्रोह, एकाकीपणा आणि सतत संघर्षाच्या अग्नीतून तावूनसुलाखून निघालेली डिनेरिस आपल्या हक्काचा आयर्न थ्रोन मिळवते की आपल्या वडिलांसारखी अहंकाराच्या अग्नीत राख होते हे आपल्याला आगामी भागांत कळेलच.


चतुर राजकारणी : सान्सा स्टार्क
नेड स्टार्कची ही मोठी मुलगी. लहानपणापासून ती युवराजाशी लग्न करण्याची स्वप्नं बघणारी, विणकाम-भरतकामात रमणारी सर्वसामान्य मुलगी. तिचं लग्न रॉबर्ट बॅराथोनचा मुलगा आणि भावी राजा जोफ्रीशी ठरतं आणि तिथून तिचा प्रवास सुरू होतो. किंग्ज लँडिंगमधलं राजकारण भाबड्या सान्साला समजण्यापलिकडचं असतं. सर्सी आणि जेमीच्या अनैतिक संबंधांचं सत्य नेडला समजल्यापासून तो सर्सीचा शत्रू होतो. त्याचा भरराजधानीत शिरच्छेद करण्यात येतो आणि सान्सा एकटी पडते. तिचा भाऊ आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घ्यायला  लॅनिस्टरविरुद्ध बंड पुकारतो, पण ते बंड पार मोडीत निघतं आणि सान्साचे अधिकच हाल व्हायला लागतात. जोफ्री तिच्याशी लग्नाचं वचन मोडतो आणि तिचं लग्न टिरियन लॅनिस्टरशी लावून देण्यात येतं. जोफ्रीचा कोणीतरी विष घालून खून करतं आणि आपण अपराधी धरले जाणार लक्षात येऊन सान्सा तिथून पळ काढते. लिटलफिंगर म्हणजेच पिटर बेलिश तिला आधी व्हेलला आणि नंतर विंटरफेलला रामझी बोल्टनशी लग्न करण्यासाठी घेऊन जातो. दरम्यान सान्साला राजकारण कळू लागतं आणि करताही यायला लागतं. विकृत रामझीशी लग्न केल्यावर तिचे भयंकर हाल होतात पण ती जगण्याची आणि लढण्याची जिद्द टिकवून ठेवतो. थियॉन ग्रेजॉयच्या मदतीनं सान्सा विंटरफेलमधून पळ काढते आणि लेडी ब्रिएनच्या मदतीनं जॉनकडे पोचते. प्रचंड संघर्षानंतर दोघे बहीण-भाऊ एकमेकांना सुखरूप बघून समाधानी होतात. सान्सा जॉनला रामझीविरुद्ध लढून विंटरफेल परत मिळवण्यासाठी आणि आपला लहान भाऊ रिकोनला सोडवण्यासाठी तयार करते. ती दोघं उत्तरेतल्या इतर घराण्यांशी युतीची बोलणी करतात आणि शेवटी रामझीबरोबर युद्धं होतं. युद्धात जॉन हरतोय असं वाटायला लागतं तेवढ्यात व्हेलचं सैन्य घेऊन लिटलफिंगर तिथे पोचते. सान्सा साधीसुधी मुलगी राहिलेली नसून चतुर राजकारणी झाल्याचं चिन्ह या युद्धात आपल्याला दिसतं. पुढे ती विंटरफेलची जबाबदारी घेते, आर्या आणि ब्रान परत आल्यावर ती आणखीच आत्मविश्वासानं उभी राहते. परंतु ती कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही, डिनेरिसवरही नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही तसंच दगाबाजी, क्रौर्य, अत्याचार सोसल्याशिवाय राजकारण येत नाही आणि सान्साला ते आता यायला लागलं आहे. येणाऱ्या काळात सान्सा आपल्या या अनुभवातून आलेल्या शहाणपणाचा कसा उपयोग करते आणि तिच्या नशिबात काय येतं याची सर्वांनाच उत्सुकता आहे.


स्वच्छंदी स्वभावाची : आर्या स्टार्क
नेड स्टार्कची ही चुणचुणीत लहान मुलगी, कपडे विणण्यात रस नसलेली, कोण्या राजपुत्राशी लग्न करून राणी होण्याची इच्छा नसणारी, स्वतंत्र, स्वच्छंदी मुलगी.  जॉननं दिलेली नीडल तलवार चालवण्यात तिला भारी रस. किंग्ज लँडिंगमध्ये सिरियो फोरेलकडून ती तलवारबाजीचे धडे घेत असते. नेड स्टार्कचा शिरच्छेद होत असताना गर्दीतून ती त्याच्याकडे झेपावू बघते. परंतु योरेन तिला तिथून बाहेर काढतो. त्यानंतर ती केस कापून, मुलाच्या वेषात योरेन, गेन्ड्री, हॉट पाय अशा सगळ्यांबरोबर उत्तरेला जॉनकडे जाण्यासाठी प्रवास करते. मध्ये बऱ्याच घटना घडतात. तिला ब्रदरहूडवाले भेटतात, पुढे ती सँडोर क्लिगेन म्हणजेच हाउंडच्या तावडीत सापडते. तो तिला तिच्या आई आणि भावाला नेऊन विकता येईल म्हणून रेड वेडिंगला नेतो. तिथे तिच्या डोळ्यांसमोर स्टार्क्सची कत्तल होते. तिचा प्रवास चालू राहतो. ती रोज काही नावांची यादी प्रार्थनेसारखी पुन्हा पुन्हा म्हणत असते... ही नावं असतात अशा लोकांची असतात ज्यांना मारून तिला बदला घ्यायचा असतो. तिला प्रवासात अनेकदा जॅकेन हेगार नावाचा एक गूढ माणूस भेटतो. तो फेसलेस असॅसन असतो. त्यानं दिलेलं नाणं दाखवून वालार मोर्घुलिस म्हणत आर्या ब्राव्होसला पोचते आणि तिचं ट्रेनिंग सुरू होतं. बघता बघता हे खडतर ट्रेनिंग घेत घेत आर्या निष्णात निनावी खुनी बनते आणि अखेर आपण आर्या स्टार्क आहोत आणि आपल्या कुटुंबाच्या कत्तलीचा बदला घ्यायला सज्ज झालो आहोत हे लक्षात येऊन ती विंटरफेलला परतते. दरम्यान वाल्डर फ्रे आणि त्याच्या अख्ख्या खानदानाचा खून करून ती रेड वेडिंगचा बदला घेते. विंटरफेलला येऊन ती ब्रिएनबरोबरच्या तलवारबाजी प्रात्यक्षिकात आपल्या युद्धकौशल्याची झलक दाखवून देते. विंटरफेलच्या महायुद्धात आर्या नाईट किंगच्या हृदयात चाकू खुपसून ‘Anybody can be killed’ हे आपलंच वाक्य सिद्ध करते आणि वेस्टरोसवरचं महासंकट परतवून लावते. पण, आता ती परत प्रवासाला निघाली आहे. तिच्या लिस्टमध्ये नाव असलेली सर्सी अजून जिवंत आहे. आता आर्या सर्सीलाही ‘वालार मोर्घुलिस’ म्हणत यमसदनी पाठवते का हे बघण्यासाठी सगळेच आर्याचे चाहते आतुर आहेत. आर्याची भूमिका करणारी मेसी विल्यम्स आणि सान्साची भूमिका करणारी सोफी टर्नर या खऱ्या आयुष्यात अगदी जिवलग मैत्रिणी आहेत.


हुशार पण मनस्वी : टिरियन लॅनिस्टर
लॅनिस्टर या महान घराण्याचा हा वंशज. सर्सी आणि जेमीचा लहान भाऊ. त्याला जन्म देताना त्याच्या आईचा मृत्यू होतो आणि त्यामुळे सर्सी आणि त्यांचे वडील टायविन टिरियनचा द्वेष करतात. त्याचं ड्वार्फ (बुटका) असणं हेही टायविनच्या द्वेषाचं महत्त्वाचं कारण असतं. ‘I drink and I know things’ असं म्हणणारा अत्यंत हुशार आहे. तो योद्धा मात्र अजिबात नाही. सुरुवातीचं आयुष्य तो  दारू आणि व्याभिचारात घालवत असतो. हळुहळू वेस्टरोसच्या सत्तास्पर्धेत तो ओढला जातो. जोफ्रीच्या खुनाच्या संशयावरून सर्सी त्याला कैद करते. त्याच्यासाठी ट्रायल बाय कॉम्बॅटमध्ये ओबेरिन मार्टेल माउंटनशी झुंज देतो आणि हरतो. आपला जीव वाचवण्यासाठी टिरियन आपल्या वडिलांचा टायविनचा खून करतो आणि किंग्ज लँडिंगमधून पळ काढतो. टिरियन सध्या डिनेरिसचा हँड म्हणजेच वजीर आहे. डिनेरिस वेस्टरोसची सत्ताधीश होण्यासाठी सर्वात योग्य आहे असं त्याचं अजून तरी मत आहे. परंतु येणाऱ्या काळात हे मत बदलेल का, तो आपल्या हुशारीचा कशासाठी आणि कसा उपयोग करेल याचा अंदाज बांधणं अवघड आहे. टिरियनची भूमिका साकारणाऱ्या पिटर डिंकलेज या अभिनेत्यानं त्याच्या उत्कृष्ट  अभिनयासाठी एमी, गोल्डन ग्लोब असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत.

सहृदयी : जॉन स्नो ऊर्फ एगॉन टारगॅरियन
नेड स्टार्कचा अनौरस मुलगा म्हणून जॉनची  आपल्याशी ओळख होती. तो मानी असतो, सहृदयी असतो, त्याच्या सावत्र भावंडांवर आणि स्टार्क कुटुंबावर त्याचं प्रेम असतं पण आपली विंटरफेलमध्ये गरज नाही हे ओळखून तो नाइट्स वॉचमध्ये प्रवेश करतो.  नाईट्स वॉच म्हणजे व्हाईट वॉकर्सपासून संरक्षणासाठी उत्तरेला बांधलेल्या भिंतीवर पहारा देणारी तुकडी. व्हाईट वॉकर्स आणि नाईट किंग म्हणजे जणू मृत्यूचं रूपच. त्यांच्या कथा सगळ्या वेस्टेरोसने ऐकलेल्या, पण त्या खरंच आहेत यावर कोणाचाही विश्वास नसतो. जॉनचा सगळा प्रवास या नाईट किंग च्या मृत्यूरूपी सैन्याभोवती फिरत असतो. भिंतीपलिकडच्या वाइल्डलिंग्जशी तो युती करतो, सॅम टॅलीसारखे  मित्र साथीला येतात, वॉचचा तो लॉर्ड कमांडर बनतो. मात्र फंदफितुरी कोणाला चुकली आहे! त्याचेच साथीदार त्याचा खून करतात. परंतु एवढ्या सहज त्याचा प्रवास संपत नाही. मेलिसांड्रे नावाची एक तांत्रिक त्याला पुन्हा जिवंत करते. कुठलंतरी मोठं कार्य पूर्ण करण्यासाठी प्रकाशाच्या देवतेनं त्याला संजीवनी दिली आहे असं ती सांगते. तोपर्यंत सान्सा स्टार्क, त्याची सावत्र बहीण त्याला येऊन मिळते आणि दोघं मिळून आपल्या कुटुंबाच्या वाताहतीचा बदला घ्यायचं ठरवून विंटरफेलवर चाल करतात. सान्साचे अनन्वित हाल करणाऱ्या रामझी बोल्टनला जॉन युद्धात हरवतो. सगळे उत्तरेकडचे इतर सरंजाम जॉनला उत्तरेचा राजा घोषित करतात. तो त्यांना नाईट किंगच्या सैन्याचं संकट किती भयंकर आहे याची जाणीव करून देतो आणि पुढे डिनेरिसला जाऊन भेटतो. डिनेरिस आणि जॉन मिळून सर्सीलाही हा धोका पटवून देण्याचं ठरवतात. नाईटकिंगविरुद्ध लढण्याच्या ध्येयानी झपाटलेला जॉन जिवावर उदार होऊन हा धोका सगळ्यांना पटवून देतो. दरम्यान तो नेड स्टार्कचा अनौरस मुलगा नसून लायना स्टार्क आणि ऱ्हेगार टारगॅरियनचा औरस मुलगा आणि आयर्नथ्रोनचा खरा उत्तराधिकारी असल्याचं सत्य उलगडलं आहे. त्याला सत्तेचा मोह नाही, पण पावलोपावली लोकांना त्याच्यामध्ये आपला नेता दिसला आहे आणि दिसतोय. आपल्याला त्याच्या नशिबात काय आहे हे लवकरच कळेल. जॉनची भूमिका करणारा अभिनेता किट हॅरिंगटन आणि त्याची पहिली प्रेयसी यिग्रीटची भूमिका साकारलेली रोज लेझली खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि गेल्या वर्षी विवाहबद्ध झाले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link