Next
मराठी भाषा-संस्कृती आणि सरकार
दिनकर गांगल
Friday, July 05 | 01:00 PM
15 0 0
Share this story


जग क्षणोक्षणी बदलत असते. तो अनुभव प्रत्येकाचा आहे. तो बदल माणसाला हवा तसा घडवून आणायचा असेल, तर त्याने वाचन केले पाहिजे. त्यामुळे तो स्वत: शहाणा होतो- त्याची कल्पनाशक्ती जागृत होते. म्हणजेच प्रतिभा! होय, ती प्रत्येक माणसाजवळ असते. ती त्याला व्यक्त करता येतेच असे नाही. म्हणून तो वाचतो, पाहतो, ऐकतो. मग माणसाचे मन त्याचे त्याच्याशी चालू-बोलू लागते. ते क्षणात सहा खंड आणि सात सागर फिरून येऊ शकते- स्वत:चे स्वत:ला काही सांगू लागते. त्याला चिंतन म्हणतात. चिंतन म्हणजे विचार नव्हे. विचार म्हणजे मुद्यांची संघटित शृंखला. ती शहाणपणाच्या पुढील पायरी आहे. ती माणसाला उन्नत अशा प्रगल्भावस्थेकडे नेते. माणूस वाचनाने प्रगल्भ होतो, मोकळा होतो, उदार होतो, समंजस होतो.
पु.ल. देशपांडे इचलकरंजीच्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. निपाणीचे काही साहित्यरसिक संमेलनास आले होते. त्यांनी एका परिसंवादात पुलंना थांबवून मध्येच विचारले, ‘मुंबई दिनांक आणि विश्रब्ध शारदा ही (त्या काळात गाजत असलेली) पुस्तके दिसतात कशी हो?’ कवी आहे कसा आननी? हा, वाङ्मयीन ओढ दाखवणारा प्रश्न साहित्यिकांना प्रिय असतो. परंतु रसिक वाचकाचा असा प्रश्न! पुल आणि परिसंवादाचे अध्यक्ष रा.ज. देशमुख चकित झाले. ग्रंथव्यवहार त्यावेळी पुण्या-मुंबईपुरता सीमित होता. उलट, साक्षरता दूरवर पसरत होती. ‘ग्रंथाली वाचक चळवळी’चा जन्म त्या एका प्रसंगातून झाला. सुमारे पाचशे साहित्यिक-कलावंत आणि गावोगावचे साहित्यप्रेमी त्या एका व्यासपीठावर आले. विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, गो.नी. दांडेकर ते मधु मंगेश कर्णिक, अमोल पालेकर... सारी सारी मंडळी त्या प्रयत्नात सामील झाली. राज्यभर ग्रंथप्रसार यात्रा निघाल्या- ‘ग्रंथमोहोळ’सारखे पुस्तक प्रदर्शनांचे, ऑलिंपिकमध्येच शोभतील असे कार्यक्रम घडून आले. तो काळ साधारण १९७५ ते १९९० या पंधरा वर्षांचा. असे म्हटले जाते, की संतसाहित्य आणि दलितसाहित्य हे मराठी वाङ्मयविश्वाचे खरे वैभव आहे. पैकी दलित साहित्य त्या काळात बहरले. ‘ग्रंथाली’ ही त्याचे प्रमुख व्यासपीठ बनली.
‘ग्रंथाली’ने तीन दिवसांची वाचनपरिषद १९८९ मध्ये घेतली व तेथे ‘वाचनाचा जाहीरनामा’ प्रकट केला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी परिषदेचे उद्घाटक-अध्यक्ष होते. ते म्हणाले, की त्यांनी त्यांच्या नव्वद वर्षांच्या आयुष्यात तसा प्रसंग अनुभवलेला नाही! तेथील प्रदर्शनात पुस्तकांच्या संगतीला टेलिव्हिजनचा पडदा होता आणि त्यापलीकडे संगणकाचे दालन! त्यावेळी डेस्क टॉप कम्प्युटर नुकताच मुंबईत आला होता आणि त्याच्या दालनात सुधीर व नंदिनी थत्ते हे विज्ञानलेखक संगणकाच्या पडद्यावर वेगवेगळे खेळ करून दाखवत होते. जाहीरनाम्यात म्हटले होते, की वाचन ही गोष्ट स्वयंभू नसून ते जिज्ञासेचे एक रूप आहे. जिज्ञासा हा माणसाचा स्थायीभाव आहे. तो जागा कसा होईल आणि तो आयुष्यभर तसाच कसा राहील यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे माणसाने तंत्रज्ञानाचे सारे विभ्रम जाणले पाहिजेत व त्यांना बुद्धिप्रगल्भतेसाठी उपयोगात आणले पाहिजे. माणसाची सर्व ज्ञानेंद्रिये त्यातून विकास पावतील- त्यांची वाढ होईल, ती सूक्ष्मतरल अनुभव घेऊ शकतील.
इंटरनेट त्यानंतर सहा वर्षांनी आले आणि सारे जग जोडले गेले- एका खेड्यासारखे वाटू लागले! ‘ग्रंथाली’चा तो प्रवास आठवला, कारण तो सुरू झाला, महाराष्ट्रातील सात कोटी लोकांच्या- प्रत्येकाच्या हाती वाचण्यासाठी पुस्तक असावे, या स्वप्नापासून; आणि तो इष्ट स्थानी पोचला, प्रत्येक माणसाची जिज्ञासा जागी व्हावी- त्याने ज्ञानी होण्याचा-राहण्याचा आटापिटा आयुष्यभर ठेवावा यासाठी केलेल्या संकल्पापर्यंत. लक्ष्मणशास्त्री जोशी यांना परिषदेचे अद्भुत वाटले ते त्या वैचारिक विकासप्रक्रियेचे.
जाणिवेची मोठी उत्क्रांती त्या पंधरा वर्षांत घडून आल्याचे, मला माझे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशात हिंडणे होते तेव्हा जाणवते. त्या प्रभावातील माणसे भेटतात, जुन्या गोष्टी सांगतात. त्यानंतरच्या तीस वर्षांत तंत्रज्ञानाच्या झपाट्याने मूलभूत काही बदलल्याचे त्यांच्या बोलण्यातून येते- जाणवते, की समाजासमोरील ‘अजेंडा’च बदलून गेला आहे! जवळजवळ प्रत्येक व्यक्ती तिला इंटरनेट व मोबाइल ही दोन मुख्य साधने उपलब्ध झाल्याने सक्षम झाली आहे. तिला स्वत:चे अस्तित्व निर्माण झाले आहे. मात्र, त्या व्यक्तीसमोर समूह अथवा समुदाय म्हणून काहीच विचार-कार्यक्रम नाही, म्हणून लोक एकत्रितपणे एका बाजूला लोकशाही निवडणुका म्हणजे लोकव्यवहाराचे व्यवस्थापन आणि दुसऱ्या बाजूला देवादिकांबद्दलची भाविकता व टेलिव्हिजन, भटकंती यांसारखी करमणूक अशा गोष्टींत विरंगुळा शोधत आहेत. त्यांना आंतरिक हवा आहे त्यांचे मन समृद्ध करील असा ‘अजेंडा!’
हे सारे, असे इतिहासक्रमाने प्रतिपादन करण्याचे कारण मुख्यत: मराठी प्रमुख साहित्यिकांनी मराठी भाषेसाठी केलेले धरणे आंदोलन. मधु मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, नागनाथ कोतापल्ले यांनी त्याचे नेतृत्व केले. महाराष्ट्रातील चोवीस संस्थांचे प्रतिनिधी त्यात सामील झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून काही आश्वासनेदेखील मिळवली. आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकेका व्यक्तीने एकेक मागण्याचा आग्रह धरला होता, जसे की मधु मंगेश यांना मराठी भाषाभवन हवे आहे तर लक्ष्मीकांत यांचा आग्रह वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी आहे... अशा सहा प्रमुख मागण्या. लक्ष्मीकांत यांनी वाचनसंस्कृतीसाठी आराखडाही (त्यांचा शब्द –नीलप्रत, म्हणजे ब्ल्यू प्रिंट) सरकारला सादर केला आहे. तो त्यांच्या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातही महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रंथालये ही शाळा-कॉलेजांत व सार्वजनिक क्षेत्रात कशी वाढतील, पुस्तके गावोगावी उपलब्ध कशी होतील याकरता आराखड्यात विधायक सूचना आहेत. ती सर्व कामे सरकारने सरकारच्या पैशाने करायची आहेत! श्रीरंग गोडबोले यांनी ‘घडलंय-बिघडलंय’मधील एका कार्यक्रमात मराठी प्रेक्षकांनी मराठी नाटकांना यावे यासाठी प्रेक्षकांनाच अनुदान द्यावे, अशी अफलातून सूचना केली होती. साहित्य-संस्कृतीक्षेत्रामधून सरकारकडे मागणे झाले, की मला त्या कार्यक्रमाची आठवण येते. मला त्यावेळी हसू आले होते. माझ्यावर तीच भूमिका घेऊन उभे राहण्याची वेळ आली तर माझे मलाच हास्यास्पद वाटेल.
शाळा-कॉलेजे स्वातंत्र्योत्तर काळात तालुका पातळीवर गेली तेव्हा नवसुशिक्षित लोकांना पुस्तक (व सरकारी मालकीचा रेडिओ) हे एकमेव माध्यम उपलब्ध होते. नवनवे समाजघटक अजून, या काळातही नव्याने शिकत आहेत, परंतु त्यांना किती विविध माध्यमे उपलब्ध आहेत! त्या काळात, बसमध्ये भेटणाऱ्या तरुणांना लेखनाची हौस असे – त्यासाठी वाचले पाहिजे याची त्यांना जाणही असे. आज बसमध्ये भेटणारा तरुण सहसा ‘कम्युनिकेशन’च्या उद्योगात असतो व त्याचे माध्यम ‘शॉर्ट फिल्म’ हे असते. मी हे संवेदनशील तरुणांबाबत बोलत आहे. तेच त्या त्या काळचा ‘ट्रेंड’ ठरवत असतात. वाचन-लेखन हा त्यांच्यासाठी सद्यकाळात साहाय्यक घटक असतो.
तेव्हा वाचनाचा विचार मल्टिमीडियातील एक घटक असा केला गेला पाहिजे. संवेदने घडणे वा काही घडवणे असेल तर मुलांसाठी-तरुणांसाठी आज खूप सारे पर्याय आहेत. त्या प्रत्येक पर्यायाचे एकेक सामर्थ्य आहे. प्रत्येक व्यक्ती तिची पसंती ते पर्याय जोखून ठरवते. त्यात माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या दृष्टीने कल्पनाशक्तीला चालना देणारे वाचनाचे माध्यम हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढावी यासाठी मी दोन पातळ्यांवर काम करतो. एकतर आम मराठीजनांची जिज्ञासावृत्ती वाढावी, त्यांनी माध्यमांचा उपयोग चोखंदळपणे करावा याकरता प्रबोधन आणि दुसऱ्या पातळीवर वाचनाचे फायदे लोकांसमोर, मुख्यत: शाळा-कॉलेजांतून मांडण्याचा वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न. आमच्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा रोख त्या दोन्ही पातळ्यांवरच असतो. वाचन हे यापुढे व्यक्तीजवळ एकाद्या छंदासारखे असणार, जसे की सतार अथवा बासरी वाजवण्याची ओढ.
अरुण टिकेकर म्हणत असे, की माणूस वाचतो ते भावनिक आनंदासाठी नाही, बौद्धिक संपदेसाठी. सतीश काळसेकर म्हणतो, की माणूस आंतरिक गरजेतून वाचतो. वाचनसंस्कृतीत बौद्धिक संपदा व आंतरिक गरज हे घटक महत्त्वाचे आहेत. ते घटक सुदृढ होतील यासाठी खटाटोप हवा. देशाचे चित्र पूर्णत: बदलले आहे असे दिसते. सर्वसामान्य माणसाला दारिद्र्याचे (म्हणजे अभावाचे) प्रश्न जे एकेकाळी भेडसावायचे, ते तसे राहिले नाहीत. त्याला अन्नधान्य मुबलक आहे, निवारा जरुरीपुरता आहे, कपड्यांची ददात नाही. त्या मूलभूत गरजा! समाज त्यांपुढे गेला आहे. त्याला त्या टप्प्यावरील मार्गदर्शन हवे आहे. साहित्यसंस्कृतीतील लोक ते काम करू शकतात. मधु मंगेश, लक्ष्मीकांतजी, काळाची पावले ओळखू व मग मराठीच्या, वाचनसंस्कृतीसंबधीच्या मागण्यांची, आंदोलनाची दिशा ठरवू. साहित्य-संस्कृतीबाबतच्या प्रश्नांचे उत्तर सरकारकडे नाही, ते आपल्या सर्वांकडे आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link