Next
प्रतिसाद
प्रतिनिधी
Friday, June 28 | 03:55 PM
15 0 0
Share this story

टी ओ ‘टू’, डी ओ ‘डू’, जी ओ ‘गो’!
‘शिक्षणखात्यातले कारकून’ हे संपादकीय आणि संख्यावाचनातील बदलांसंबंधीचे लेख २२ जूनच्या अंकात वाचले. संख्यावाचनातील जोडाक्षरांचा विनाकारण बाऊ केला जात आहे, असे वाटते. जोडाक्षरांमागील सुसंगती नीट समजून घेतली आणि समजावून सांगितली तर त्यात फारसे कठीण काही नाही. बे, बा, ब्या अशी ‘ब’ची रूपे  ‘+२’ दर्शवतात.  (उदाहरणार्थ, बेचाळीस, बावन्न, ब्याण्णव); ते, त्रे, त्र्य अशी अक्षरे ‘+३’ दर्शवतात (उदाहरणार्थ, तेवीस, त्रेपन्न, त्र्याहत्तर); ‘एक उणे चाळीस’ म्हणून ‘एकोणचाळीस’ हे  फोड करून सांगितले तर समजून घेणे फारसे कठीण नाही. ‘त्र्याण्णव’मधील ‘ण्णव’ हा ‘नव्व’दी दर्शवतो आणि ‘त्र्या’ तीन दर्शवतो असे समजावून सांगितले तर ‘त्रेसष्ठ म्हणजे किती असतील’ हा विचार करण्याची क्षमता मेंदूत आपोआप विकसित होते, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. नव्याने शिक्षणाकडे वाळणाऱ्यांमध्येही अशी तर्कसंगती लावण्याची बौद्धिक क्षमता विकसित झाली पाहिजे. त्यातच त्यांचा खरा आणि दूरगामी फायदा आहे. सोपेपणाकरता इंग्रजीचे दाखले देणे हा तर मोठा विनोदच आहे. इंग्रजीमध्ये टी ओ ‘टू’ आणि डी ओ ‘डू’ होते, मात्र जी ओ ‘गो’ होते, आणि ते आपण तसेच लक्षात ठेवतो. अशा लेखन-उच्चारणाच्या कितीतरी विसंगती इंग्रजीमध्ये ठासून भरलेल्या आहेत. अशा स्पेलिंग्सचे/उच्चारणाचे ‘सुलभीकरण’ करण्याचा घाट साहेबांनीही अद्याप घातलेला नाही! शेवटी शरीर कमावायचे असेल तर त्यावर व्यायामाने ताण द्यावा लागतो. झाडाला वाढायचे असेल तर ऊन सहन करावेच लागते. त्याप्रमाणेच, मेंदूचा विकास करायचा असेल तर त्यावरही योग्य तो ताण द्यावाच लागतो. शिक्षणक्षेत्रात सगळ्याचेच सुलभीकरण केल्याने अर्थार्जन करण्याचा भावी आयुष्यातला काळ ‘सुलभ’ न होता उलट आणखी अवघड (आणि ‘दुर्लभ’!) होत असतो. हे सारे लक्षात घेऊन मेंदूचा सर्वांगीण आणि मूलभूत विकास घडवून आणणाऱ्या गोष्टी अति‘सुलभ’ करण्याच्या फंदात पडू नये, असे वाटते.
- विनिता दीक्षित, ठाणे
-----------------------------------------------------------

‘शेतीवाडी’तला मजकूर संदिग्ध
‘शेतीमालविरोधी नीतीमुळे शेतकरी संकटात’ या शीर्षकाखाली ‘शेतीवाडी’ या सदरात २२ जूनच्या अंकात प्रसिद्ध झालेला मजकूर संदिग्ध वाटतो. कडधान्याच्या किमती वाढत असल्यामुळे सरकारने किमतीवर नियंत्रण आणण्याची घोषणा केली आणि पाठोपाठ बाजारात कडधान्याच्या किमती घसरल्या, असे या लेखात म्हटले आहे. परंतु याच लेखाच्या पहिल्या परिच्छेदात शेतमालाचे (म्हणजे सगळ्याच) भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत, असेही म्हटले आहे. कोणत्या मालाचे हमीभाव किती आणि ते किती कोसळले याचा कसलाही तपशील लेखकाने दिलेला नाही. सगळ्या लेखातच प्रत्येक तपशिलाबाबत संदिग्धता दिसते. केवळ कांद्याच्या बाबतीत एक-दोन आकडे दिले आहेत. तेही पुरेसे मार्गदर्शन करणारे नाहीत. ‘बाजारातले तूर आणि कांदा यांचे वाढलेले किरकोळ भाव ग्राहकांच्या गावीही नव्हते’ असे लेखकाचे म्हणणे आहे. म्हणजे ग्राहकांना कसलाही त्रास नसताना सरकारने नियंत्रण आणले असा त्यांचा दावा आहे. शिवाय, या नियंत्रणामुळे तुरीचे दर हमीभावाच्याही खाली आले, असे ते म्हणतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की तुरीच्या डाळीचे भाव १०० रुपये प्रति किलोग्रॅमच्या पुढे जायला लागले होते तेव्हा ते ग्राहकांच्या गावीही नव्हते असे म्हणता येत नाही.  सरकारी नियंत्रणामुळे तुरीचे भाव हमीभावाच्याही खाली गेले असे म्हणताना लेखकाने, हमी भाव किती आणि आता कोणत्या बाजारात किती भाव कमी झाले आहेत, याचा काही तपशील दिलेला नाही. सरकारने नियंत्रण आणले की दर कमी होतात हे खरे आहे, परंतु त्यासंबंधात प्रत्यक्षात बाजाराची माहिती घेऊनच लिखाण करायला हवे.                                     
- अरविंद जोशी, सोलापूर
-----------------------------------------------------------

अभिनंदनीय उपक्रम!
टेलिव्हिजन आणि मोबाइलच्या दुनियेमध्ये वाचनसंस्कृती हरवत चालली आहे, हे भीषण वास्तव आहे. परंतु हे वास्तव स्वीकारताना या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी ठोस उपाययोजना होत नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ‘झी मराठी दिशा’सारखे आठवडापत्र काढणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र त्याहूनही अभिमानाची गोष्ट म्हणजे आपण ‘वाचनमेळाव्या’चे यशस्वी आयोजन करीत आहात. या मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील वाचनप्रेमी एकत्र येत असून नवनवीन संकल्पनांचे बीजारोपण होत आहे. यातून मराठी वाचनाचे धडे आत्मसात होऊन साहित्य-संस्कृतीमध्ये निश्चितपणे भर पडेल हे भूषणावह आहे. या वाचकमेळाव्यांमुळे वाचकांशी आपली असणारी नाळ अधिक घट्ट होऊन भविष्यामध्ये वाचकाभिमुख लिखाण ‘झी मराठी दिशा‘कडून वाचायला मिळेल याची निश्चितपणे खात्री आहे. भविष्यात वाचनसंस्कृती जोपासना आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी ‘झी मराठी दिशा’ एक महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत राहो, ही सदिच्छा.
- विक्रम दीपक रेपेे, कोल्हापूर
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link