Next
रिमझिम झरती श्रावणधारा
अनिल गोविलकर
Friday, August 23 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मराठी भावगीताच्या प्रांगणात अशी असंख्य गाणी तयार झाली ज्या गाण्यांत काहीही ‘बौद्धिक’ नाही, काहीही प्रयोगशील नाही, तरीही निव्वळ साधेपणाने त्या रचनांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. विशेषतः आकाशवाणीवर ‘भावसरगम’ कार्यक्रम सुरू झाला आणि अनेक विस्मरणात गेलेल्या कवींच्या शब्दरचना असोत किंवा अडगळीत गेलेले संगीतकार असोत किंवा बाजूला पडलेल्या गायक-गायिका असोत, अनेक कलाकारांना संधी मिळाल्या आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. आजचे आपले गाणे असेच साधे, सरळ गाणे आहे. कविता मधुकर जोशी यांची आहे. कविता नीट वाचली तर त्यात काही अगम्य नाही. किंबहुना, ‘धरतीच्या कलशात’ यासारखी थोडी सरधोपट प्रतिमा आहे. विरहणीची व्याकुळता आहे, प्रियकराची वाट बघणे आहे पण तसे दर्शविताना शब्दकळेत काहीही नावीन्य नाही किंवा शाब्दिक चमत्कृती नाही. वाचायला मिळतो तो केवळ आणि केवळ थेटपणा. थोडा विचार केला तर ललित संगीतातील कवितेत असा ‘थेटपणा’ असणे एका दृष्टीने चांगलेच असते. रसिकांचे सगळे लक्ष हे स्वराकृतीकडे लागते.
‘कमळमिठीमध्ये भृंग भेटता’ ही कालिदासांची कल्पना, पण तरीही इथे चपखल बसली आहे. प्रत्येक गाण्याच्या चालीचा स्वतंत्र असा ‘मीटर’ असतो आणि त्यानुरूप कविता असावी, असे संगीतकाराला नेहमी वाटत असते आणि इथे तसेच झाले आहे. संगीतकार दशरथ पुजारी हे नाव मराठी भावगीत संगीतात मान्यताप्राप्त झालेले नाव. ओठांवर सहज रुळणाऱ्या चाली या संगीतकाराने निर्माण केल्या. ‘सारंग’ रागावर आधारित स्वररचना आहे. खरे तर रागाचे स्वर फक्त आधाराला घेतले आहेत. स्वररचनेचा विचार करायचा झाल्यास, ‘प्रियाविण उदास वाटे रात’ ही ओळ मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. मुखड्याची पहिली ओळ काहीशी आनंदी स्वरांत आहे परंतु लगेच दुसऱ्या ओळीतील उदासवाणा भाव तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने घेतलेला आहे. तसेच पुढील रचना ऐकताना ‘आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात’ ही ओळ स्वरांत मांडताना, ‘अंधारात’ शब्द तितक्याच आर्ततेने घेतला आहे. ललित संगीत हे असेच खुलत जाते. वाद्यमेळ प्रामुख्याने बासरी आणि सतार या वाद्यांनी खुलवला आहे. अंतरे मात्र मुखड्याच्या स्वररचनेला समांतर असे बांधले आहेत. परंतु एकूणच चालीची जातकुळी बघता ती तशीच असणे योग्य वाटते. या संगीतकाराचे मूल्यमापन करायचे झाल्यास, त्यांच्या रचनांचे खास लक्षण असे की त्यात वाद्यरंग आकर्षक असतात. सर्वसाधारणतः वाद्यरंगात भिडलेले आणि काहीशी द्रुत लय पसंत करणारे, मुख्यतः वाद्यवृंदाच्या व गतिमान लयबंधांच्या साहाय्याने गीताची उभारणी करतात. संगीतकार आपल्या रचनेचा जाणीवपूर्वक असा रोख ठेवतात की रचना निदान काही प्रमाणात तरी सुरावटीकडे झुकलेली असावी. याचा एक परिणाम असा झाला, त्यांच्या रचनांचे मुखडे कायम लक्षात राहतात.
त्यामुळे हे गीत साधे असले तरी त्याची खूण मनात रेंगाळत राहते. यामधून एक नक्की सिद्ध होते, या संगीतकाराने आपण काही नवीन देत आहोत असला आव कधीही आणला नाही. साध्या, सामान्य श्रोत्यांसाठी रचना करण्यात समाधान मानले.  या गाण्यावर गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गायकीचा निर्विवाद हक्क पोहोचतो. सुरेल आणि स्वच्छ गायकी तसेच श्रोत्यांपर्यंत स्वररचना थेटपणे पोहोचवण्याची हातोटी ही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. मुळात आवाजात कुठेही कसल्याच प्रकारचा भडकपणा नसल्याने, गायनात एकप्रकारची शालीनता नेहमी डोकावते. संयत अभिव्यक्ती, हे तर या गायिकेचे वैशिष्ट्य म्हणता येईल आणि प्रस्तुत रचना बघता, अशाच गायनाची आवश्यकता होती. याचाच परिणाम या गायनातून विस्तीर्ण असा भावपट धुंडाळता येतो. अर्थात असे असूनही ही गायिका प्रामुख्याने मराठी भावसंगीतापुरतीच सीमित राहिली, हे दुर्दैवच म्हणायला हवे.

रिमझिम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात

बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात

प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमध्ये भृंग भेटता
बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात

मेघा असशी तू आकाशी, वर्षातून तू कधी वर्षसी
वर्षामागून वर्षती नयने करती नित बरसात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link