Next
अजब सोहळ्यांचे सुबक नियोजन
विशेष प्रतिनिधी
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this story

छोट्या आणि मोठ्या पडद्याने दाखवलेले शाहीलग्नाचे दृश्य आपल्या जीवनात प्रत्यक्ष आणण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या हौशी मंडळींची संख्या आता वाढते आहे. सिनेमा आणि मालिकांतून वारंवार दिसणारे भव्य समारंभ आपल्या आयुष्यात एकदा तरी का नको, विशेषत: लग्नासारख्या, आयुष्य बदलवून टाकणाऱ्या घटनेचे ‘साजरीकरण’ का करू नये, असा विचार आज अनेक जोडपी आणि त्यांचे प्रिय पालक करतात. त्यातून साकारतो लग्न नावाचा ‘इव्हेंट’. इव्हेंट म्हटले की त्यातील प्रत्येक गोष्ट दिमाखदार, प्रेक्षणीय आणि समोरच्याला अचंबित करणारी असावी, यासाठी अट्टहास सुरू होतो. त्यासाठी भरमसाट खर्च करायची तयारी असते. सोहळा मनासारखा तरी विनासायास व्हावा यासाठी व्यावसायिक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची साथ घेतली जाते. आपल्या कल्पना समजून घेऊन इव्हेंट मॅनेजर त्यांच्याही सूचना करतात, अनुभवाचे बोल सांगतात, काही हटके आयडिया सांगतात आणि मग लग्ननामक ‘इव्हेंट’चा बेत आणि बजेट निश्चित केले जाते. काही इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे ५, १०, २० वेडिंग प्लानरची टीम असते. लग्नाचे आराखडे तुमच्यासमोर ठेवले जातात. आज अनेक लग्नांमध्ये बॉलिवूडच्या सेटला लाजवेल असे स्टेज साकारले जातात. कुठे महालाची थीम असते, तर कुठे पुष्करणी साकारली जाते. लग्नाच्या मांडवाची सजावट करण्याच्या अनेक तऱ्हा पाहायला मिळतात. एका लग्नात स्टेजच्या मधोमध कमळाच्या आकाराचा गोल फिरणारा व लिफ्टसारखा वरती येणारा सेट तयार केला होता. त्यामध्ये नवरी व नवऱ्याला उभे केले गेले. ते एकमेकांना हार घालत असताना हा संपूर्ण सेट हायड्रॉलिक तंत्राच्या साहाय्याने उचलला गेला. अशी तंत्रे वापरण्याचा नवीन ट्रेंड आता सुरू झाला आहे.

लग्नमंडपात वधू-वरांचे आगमन हाही एक सोहळा असतो. कुठे नवरा-नवरी सजलेल्या घोड्यावर बसून येतात, तर कुठे विंटेज कारमधून. सजवलेल्या घोडागाडीसाठी ७० ते ८० हजार रुपये मोजले जातात.हल्ली लग्नसोहोळ्याची लांबीही वाढत चालली आहे. दोन दिवस आधी मेहंदी, आदल्या दिवशी ‘हळद’ लावण्याचा सोहळा, रात्री ‘संगीत’ यांच्या आयोजनापासून इव्हेंट मॅनेजरचे काम सुरू होते. मेंदी कलाकार, मेकअप आर्टिस्ट, साडी ड्रेपर हे सारे साहाय्यक निश्चित केले जातात. ‘संगीत’सोहोळ्यात कुठे डीजे असतो, तर कुठे डिस्क जॉकी, तर कुठे गाण्याची मैफल! प्रत्यक्ष लग्नदिवशी सकाळी पाहुण्यांच्या स्वागताचेही खास नियोजन केले जाते. त्यांना आल्या-आल्या फूल-गजरा देणे, अत्तर लावणे, वेलकम ड्रिंकची व्हरायटी, स्टार्टर म्हणून काही खास खाद्यपदार्थ योजले जातात. त्यांना रिझवण्यासाठी लाइव्ह ऑर्केस्टा असतो. लग्नाच्या विधीतील नारळ, सुपारीलाही मण्यांचा साज चढवला जातो. अक्षता सुबकशा डबीतून हातात येतात. आता ओटीचा नारळही छानशा बटव्यातून दिला  जातो. नवरा-नवरीचे पोशाखही भरजरी बॅगेतून आणले जातात आणि देण्या-घेण्याचे कपडेही जरतारी पिशवीमधून दिले जातात. रुखवतात पूर्वीच्या मण्यांच्या फुलदाण्या आणि साबणातून कोरलेल्या शेगड्या आता दिसणे दुरापास्त! आता रुखवतात असतात ब्रॅन्डेड क्रोकरी, किचनवेअर. प्री-वेडिंग शूटच्या फोटोचे प्रदर्शन हाही एक नवा ट्रेंड. काही जण त्याची व्हिडिओ फिल्म करून तीही मोठ्या स्क्रीनवर लावतात. विधी चालू असताना आमंत्रित मंडळीना ते दिसावेत म्हणून त्याचेही चलतचित्रण स्क्रीनवर दाखवले जाते. कुठे गाण्याचा ग्रुप बोलावून मंगलाष्टके सुरात गायली जातात.  हॉल किंवा लॉन घेऊन लग्न करण्यापेक्षा भन्नाट कल्पना काही जण राबवतात. मध्यंतरी चंदन ठाकूर व दीप्ती प्रधान यांनी एकदम वेगळ्या रीतीने लग्न करायचे ठरवले. हे दोघे ‘अॅडव्हेंचर हॉलिडेज’ ही कंपनी चालवतात. त्यांनी ठरवले, की आपल्या आवडीची गोष्ट आपल्या लग्नातसुद्धा आपण करावी. या दोघांनी  साखरपुडा केला हवेत रोपच्या साह्याने लटकत आणि त्यांचे लग्न झाले पाण्याखाली! पाण्याखाली लग्न करण्यासाठी त्यांनी महिनाभर प्रशिक्षण घेतले. त्यांच्याबरोबरच त्यांचे आई-वडील, भाऊ हेसुद्धा सराव करायचे. जास्त वेळ पाण्याखाली राहता यावे म्हणून ते श्वसनाचे प्रकार शिकले. रवी कुलकर्णी हे त्यांचे ट्रेनर हेच त्या लग्नाचे पुरोहित होते. अशा आगळ्यावेगळ्या कल्पना सुचवून त्या अमलात आणायला मदत करतात इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या.

पूर्वीच्या काळी लग्नघरी असायचे तसे मनुष्यबळ आता नसते. पुलंच्या ‘नारायण’सारख्या व्यक्ती आता दुर्लभ! आताच्या इव्हेंट मॅनजमेंट कंपन्या म्हणजे आधुनिक नारायण. ते व्यावसायिक असल्याने त्यांची कल्पनाशक्ती व मेहनत यांचा बक्कळ मेहनताना ते घेणे स्वाभाविक आहे. शिवाय त्यांच्या हाताशी मोठी टीम असते. समारंभाची आखणी, त्यासाठी जमवाजमव, नियोजन, त्यानुसार सर्व काही सुरळीत होईपर्यंत अनेक गोष्टी ही मंडळी करतात.  एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालक अर्पिता कोर्डे यांनी सांगितले, की ‘क्लायंट इज अवर फॅमिली’ असे आम्ही मानतो. इव्हेंट मॅनेजमेंट हा सुंदर व्यवसाय आहे. काम करण्याचा आनंद आम्ही उपभोगतो. आपल्याच घरचे लग्न आहे असे समजून आम्ही जीव ओतून काम करतो. सगळे नीट पार पडेपर्यंत आमचा जीव भांड्यात पडत नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link