Next
व्यथा निळावंतीची!
विशेष प्रतिनिधी
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this storyमनुष्यप्राणी आणि पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती यांचं अनादिकालापासून चालत आलेलं नातं भविष्यातही अबाधित राहील याची छातीठोक हमी देण्यासारखी स्थिती नाही. ‘सेव्ह टायगर’सारख्या मोहिमांमुळे जंगल आणि वन्यप्राण्यांच्या बाबतीतील जागरूकता आणि संवेदनशीलता यात काकणभर का होईना भर पडली आहे, पण त्यावेळी पक्ष्यांच्या बाबतीत आपण आणखी असंवेदनशील बनत आहोत. ‘शब्दातीत संवाद’ ही अशा संवेदनशीलतेची पूर्वअट. त्यासाठी पक्ष्यांची भाषा समजून घेण्याची इच्छा आणि कुवतही लागते. निळावंती हे पक्ष्यांच्या मधुर भाषेला दिलं गेलेलं गोंडस नाव. मात्र त्या निळावंतीची व्यथा आपल्या गावीच नाही.

जागतिक पातळीवर या परिस्थितीचा पहिला इशारा अमेरिकेतून दिला गेला. रेचेल कार्सन ही संशोधक-लेखिका. तिनं १९६२ साली अमेरिकेतील शहरांमधून अस्तंगत होऊ लागलेल्या काही प्रजातींविषयी ठोस चिंता व्यक्त केली. ‘सायलेंट स्प्रिंग’ या तिच्या गाजलेल्या पुस्तकात केलेल्या शास्त्रोक्त दाव्यांमुळे अमेरिकेची झोप उडाली. अनेक प्रकारचे कृमी-कीटक, बेडूक, मधमाश्या, गांडूळ आणि अनेक पक्षी अमेरिकेतील शहरांमधून दिसेनासे होत असल्याच्या तिच्या निरीक्षणांमुळे या समस्येकडे लक्ष वेधलं गेलं. सामाजिक चिंतेतून दबाव वाढला. सरतेशेवटी हा प्रश्न धसास लावण्यासाठी अमेरिकी सरकारला ‘यूएस एन्व्हार्यन्मेंट एजन्सी’ची स्थापना करावी लागली. परिणामी पक्षी आणि पक्षिसंवर्धन या विषयाला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर पंख लाभले. संपूर्ण आशिया खंडातून गिधाडं नामशेष होत असल्याची बातमी धडकल्यानंतर आपल्याकडे गावोगावी गिधाडांच्या न दिसण्याची चर्चा सुरू झाली. टॉवर ऑफ सायलेन्सच्या आवाजाला वाचा फुटली. तोपर्यंत आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आलो होतो. गुरांसाठी वापरण्यात येणारे डायक्लोफेनेक हे वेदनाशामक औषध गिधाडांसाठी जिवघेणं बनलं. तशात कत्तलखान्यांमध्ये जाणाऱ्या गुरांच्या संख्येत वाढ झाल्यानं नैसर्गिकरीत्या मरण पावणाऱ्या गुरांचं खाद्य गिधाडांना मिळणं दुरापास्त झालं. डायक्लोफेनेक औषधावर भारत सरकारनं बंदी आणल्यानंतर गावागावात काही प्रमाणात गिधाडांचं पुन्हा दर्शन होऊ लागलं आहे.

    

चिमण्या तर नेमकी कारणमीमांसा होण्याआधीच दिसेनाशा झाल्या. त्यांना ‘परत फिरा रे...’ असं आर्जवी आवाहन करण्यापूर्वीच त्यांचा वावर एकाएकी विलक्षण कमी झाला. या साऱ्या घटनाक्रमातून आपण पुरेसा बोध घेतला का, हे तपासण्याची वेळ आली आहे. वास्तुशास्त्र, शहरविकास आराखडे यामध्ये चिमण्यांना हक्काचं घर मिळालं का, कृषिव्यवस्थेतून, दैनंदिन वापरातून घातक रसायनं, कीटकनाशकं नष्ट केली का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी द्यायला विशाल छातीच हवी! पक्ष्यांचा अस्तंगत होण्याचा वेग हा सरकारी कृतीच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणूनच त्यात केवळ सरकारवर अवलंबून न राहता समाजालाही कृतिशील योगदान द्यावं लागणार आहे. ज्या प्रदेशातील समाज पक्ष्यांप्रती प्रेमभाव बाळगतो, त्यांची शिकार करत नाही, त्यांना इजा पोचवत नाही, त्या प्रदेशातील पक्षी लोकजीवनात अधिक निर्भयतेनं मिसळतात.

महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये पक्षिसंवर्धनाची संस्कृती खोलवर रुजली आहे. तेथील पक्ष्यांचे सामाजिक सहजीवन याची साक्ष देतं. धनुष्यबाण घेऊन फिरणाऱ्या आदिवासींच्या प्रांतात शेकडो किलोमीटर पायपीट केल्यावरही पक्षिदर्शन होत नाही. बस्तर हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण. थोड्याफार फरकानं उत्तरेकडील बिहार, झारखंड तर दक्षिणेत तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यांतही अशीच प्रतिकूल परिस्थिती दिसते. या पार्श्वभूमीवर सरकार आणि समाज या दोघांनाही पक्षिसंवर्धनासाठी तयार करण्याचं काम पक्षिमित्रांना हाती घ्यावं लागेल. हे अशक्य नाही. गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्षिपर्यटनाचा सरकारी उपक्रम त्याचीच तर साक्ष देतो. नजीकच्या भविष्यात अशा अनेक पक्ष्यांच्या प्रजाती प्रादेशिक मानबिंदू ठरण्याच्या दृष्टीनं अशा प्रकल्पांची संख्या आणि व्याप्ती वाढणं गरजेचं आहे.

मुख्य म्हणजे वाघांच्या अभयारण्यांची आणि पक्ष्यांच्या अभयारण्यांची हाताळणी वेगळ्या पद्धतीनं करावी लागते, याचं भान सरकारी यंत्रणांना येणं गरजेचं आहे. गावांच्या आणि शहरांच्या आसपास पक्षिनिरीक्षण करतानाच प्रत्यक्ष वनक्षेत्र तसंच इतर अधिवासांमध्ये पक्ष्यांच्या प्रजातींचा वावर आणि त्यांच्या संपन्नतेची खानेसुमारी शास्त्रोक्त पद्धतीनं करणं गरजेचं आहे. पक्षिमित्रांना पक्षिअभ्यासक बनवण्याच्या कामात अशा छोट्या प्रकल्पांचं मोठं योगदान मोठं राहील. पक्ष्यांचा शास्त्रोक्त अभ्यास ही पक्षिनिरीक्षण आणि पक्षिगणनेची पुढची पायरी. ती गाठण्याचं लक्ष्य बहुसंख्य पक्षिमित्र ठेवतील तेव्हा डॉ. सलीम अलींनी चोखाळलेली वाट अधिक प्रशस्त होईल.

या पार्श्वभूमीवर पक्षिमित्रांची जबाबदारी वाढते. निरीक्षण, गणना आणि सूची बनवणं याच्यापलिकडे विचार केल्याखेरीज पक्षिसंवर्धनाच्या कामाला गती मिळणार नाही. स्थलांतरित पक्ष्यांच्या हालचाली, त्यांच्या परतीचा कालखंड हे सारं न्याहाळणं आनंदादायी असतं, पण त्यापलिकडे जाऊन त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करणं संवर्धनाला खचितच आणखी बळ देईल. अर्थात केवळ भाराभर शोधनिबंध प्रसिद्ध केल्यानं पक्ष्यांच्या प्रजाती वाचतील, अशा भ्रमात कोणी राहू नये. माळढोक हा महाराष्ट्रातील सर्वाधिक संशोधन झालेला पक्षी. तो नामशेष होतो आहेच ना! अस्तंगत झालेल्या रानपिंगळाच्या पुनर्दर्शनानं हीच गोष्ट नव्यानं अधोरेखित केली. म्हणूनच पक्षिमित्रांनी, संशोधकांनी लोकसमूहांच्या पोटात शिरून संवर्धनाच्या नवनव्या हातोट्या आत्मसात केल्या तर आपली संमेलनं सार्थकी लागतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link