Next
आई, तुझ्यामुळेच…
भक्ती पुष्कर कर्वे (गद्रे)
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story


आपण आपल्या आईवडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे विसरून जातो. आज या निमित्ताने माझ्या आईच्या अमर्याद त्यागाविषयी, माझ्या आयुष्यातल्या तिच्या महत्त्वाच्या भूमिकेविषयी तिचे आभार मानते. सुनीता जयवंत गद्रे हे माझ्या आईचे नाव.
हे आई, तू आम्हाला दिलेल्या आदर्श जीवनमूल्यांमुळे मी आज माझे आयुष्य व संसार निष्ठेने सांभाळत आहे. आई, तुझ्या कष्टाचे, त्यागाचे वर्णन करायला माझे शब्द कमी पडतील. नोकरी करून तीन मुलींच्या संगोपनाबरोबर सगळ्या आघाड्यांवर तू लढत होतीस, पण म्हणावा तसा मानसिक आधार, आदर तुला घरातून कधीच मिळाला नाही, याचे कायमच वाईट वाटते.
उत्तम वागण्याने तू नेहमीच आमच्यापुढे एक आदर्श उदाहरण ठेवलेस. तुझ्यातला कणखरपणा, व्यावहारिक चातुर्य, नियोजन, वक्तशीरपणा यातील थोडे गुण आमच्यात आले असतील, तर आम्ही खरेच भाग्यवान आहोत. तुझा सगळ्यात उत्तम गुण मला वाटतो, की तू कधी आपल्या मुलींमध्ये दुजाभाव केला नाहीस. तुझे आर्थिक नियोजन थक्क करणारे असेच होते. जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाला तू धीराने तोंड दिलेस. आपल्या मुलींना कुठेही कोलमडू दिले नाहीस. अर्धवट वयात झालेला आपल्या मुलीचा मृत्यू तू डोळ्यांसमोर बघण्याचे दु:ख पचवलेस. पाण्यासारखा पैसा खर्च केलास, परंतु त्याची जाणीवही करून दिली नाहीस.
आपला आत्मसन्मान जपून कायम कर्तव्यपूर्तीचा तुझा आग्रह हा खरोखरच स्तुत्य आहे. तू नोकरीत असताना, तसेच आताही अनेक लोकांना आर्थिक मदत केलीस. त्याची वाच्यताही कुठे केली नाहीस. अनेकांचे संसार उभारण्यात तुझा वाटा आहे. तुझे उदाहरण लोक सांगतात तेव्हा तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो.
आपल्या मुलींसाठी, नातवंडांसाठी, मानलेल्या नात्यांसाठी तुझी धडपड थक्क करणारी आहे. तुझे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. लग्न होईपर्यंत मी सगळ्यात लहान असूनही मला तुझा सहवास, प्रेम फारसे मिळाले नाही किंवा मला त्याची जाणीव नव्हती कदाचित! परंतु आता कधी तू माझी मैत्रीण झालीस हे माझे मलाही कळले नाही.
आज माझ्या व्यवसायाचे नाव होऊ लागले आहे. त्याची मुहूर्तमेढ तूच रोवलीस. वेळोवेळी अर्थसाहाय्य केल्याने आज मी आयुष्यात काहीतरी मिळवू शकले.
तुझी एक तरी मुलगी यशस्वी उद्योजिका व्हावी हे तुझे स्वप्न मी नक्की पूर्ण करेन, I Promise..!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link