Next
मनाच्या शांतीसाठी साधना
स्वामी मकरंदनाथ
Friday, September 28 | 03:30 PM
15 0 0
Share this story

सा धकाला सद्गुरूंकडून अनुग्रह प्राप्त झाला, की संप्रदायाकडून संक्रमित होत आलेली साधना त्याला समजते. जे सद्गुरू नामसाधनेच्या संप्रदायातील असतात ते शिष्याला नामसाधना सांगतात, तर ध्यानसाधनेच्या संप्रदायातील सद्गुरू ध्यानसाधनेचे मार्गदर्शन करतात. परमात्मप्राप्तीच्या वाटचालीत नाम व ध्यान या दोन्ही प्रमुख साधना मानल्या जातात. सद्गुरूंकडून अनुग्रह लाभल्यानंतर त्यांनी सांगितलेली साधनाच साधकासाठी प्रधान असते, मग शक्य असेल तेव्हा या साधकाने इतर साधनाही पूरक म्हणून करावयास हरकत नाही.
 
खरे तर सर्वच साधना खूप चांगल्या आहेत, तरी त्यातही एकमेव प्राधान्याने करावयाची साधना म्हणजे आपल्या सद्गुरूंनी सांगितलेली साधना! ती जन्मभर आत्यंतिक निष्ठेने सांभाळण्याचा संकल्प करावयाचा आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो प्रत्यक्षात उतरवायचा. ‘साधनानां अनेकता’ हा श्रृतिसिद्धांत आहे. त्यामुळे साधकाने एका साधनेविरुद्ध दुसरी साधना, अशा प्रकारचा संघर्ष जीवनामध्ये उभा न करता, सद्गुरूंनी दिलेली साधना सातत्याने करण्याची शिकस्त करावी.
नामसाधना जेवढी सुलभ आहे तेवढीच ती अवघडही आहे. जन्मभर नाम घेणाऱ्या व्यक्तींबाबतही असे होऊ शकते, की हाताने माळेचे मणी ओढले जात आहेत आणि मन मात्र इकडे-तिकडे अस्ताव्यस्त फिरते आहे; नामावर केंद्रित नाही. नाम घेताना एकाग्र झालेले मनही एखाद्या क्षणी बेसावध होते आणि भरकटत जाते; म्हणून नामसाधना करताना साधकाने निश्चितपणे लक्षात ठेवावे, की मनाला नामात पक्के गुंतवून ठेवायचे आहे. नामस्मरण ही अतिशय अंतरंगसाधना आहे आणि ती तुम्ही कोणतेही कर्म करताना उदाहरणार्थ, स्वयंपाक करताना, जेवताना, चालताना, अगदी प्रवास करत असतानाही करू शकता! बाह्यत: कर्म घडते आहे आणि आत नामस्मरण चालू आहे! नामसाधनेला स्थळ, काळ, वेळ यांचे कोणतेही बंधन नाही. यादृष्टीने पाहिले असता नामसाधना खरोखरच सुलभ आहे, पण जन्मभरासाठी हृदयाशी जपून ठेवण्याच्या निश्चयाच्या दृष्टीने मात्र ती तितकीच अवघड आहे. त्यासाठी नामाविषयी आंतरिक प्रेम आणि परमेश्वराविषयी उत्कट भाव यांची गरज आहे.

ध्यानसाधनेमध्ये मनात उठणाऱ्या विचारांकडे साक्षीभावाने पाहायचे आहे. ‘ध्याता’ म्हणजे आपण स्वत:, मस्तकाच्या पोकळीमध्ये-चिदाकारामध्ये शुद्ध जाणीवरूपाने आहोत व आज्ञाचक्रापाशी विचार उठण्याचे स्थान आहे, अशी कल्पना करायची आहे. तेथे उठणाऱ्या प्रत्येक विचाराचे अथवा वृत्तीचे अवलोकन आपण अलिप्तपणे करून, साक्षी राहून, तो विचार सोडून द्यायचा आहे. त्यामुळे उठणाऱ्या दोन विचारांमध्ये अंतर पडते. साधकाला निर्विचारक्षण अनुभवाला येतात आणि दोन विचारांमधील अंतर हळूहळू वाढत जाऊन पुढे निर्विचारस्थितीचा अनुभवही प्राप्त होतो. या निर्विचारस्थितीत क्षण क्षण आत्मप्रत्यय येऊ लागला, की आनंद, शांती यांचा लाभ साधकाला होतो. नाम आणि ध्यान, दोन्ही साधनांना साधकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून ध्यान करू की नाम घेऊ, असे द्विधा मन होऊ न देता सद्गुरू सांगतात त्या पद्धतीने साधना करण्याचा बुद्धीने निश्चय करावा आणि तो प्रयत्नपूर्वक राबवावा. चंचलतेला थारा न देता आपली जिद्द वाढवणे अधिक महत्त्वाचे आहे. ‘मनाने कितीही व्याप केला तरी एकदा स्वीकारलेली साधना सोडणार नाही’ असा दृढनिश्चय करावा. हळूहळू गुरुकृपेने आणि स्वप्रयत्नांनी साधना चांगली होऊ लागते. त्यायोगे मनाची शांती, बुद्धीची स्थिरता प्राप्त होते. साधनेमुळे लाभलेल्या शांत मनाने, स्थिर बुद्धीने कोणत्याही प्राप्त परिस्थितीत साधकाला योग्यप्रकारे राहता येते, म्हणून उत्तम जीवन जगण्यासाठी आणि मुख्यत: आत्मज्ञानाचे ध्येय गाठण्यासाठी गुरुपदिष्ट मार्गाने साधना व त्याबरोबरच इतर पूरक साधना जरूर हाताळाव्यात.
(पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य स्वामी माधवनाथ
यांचा वारसा पुढे चालवणारे स्वामी मकरंदनाथ यांचे
खास तरुणांसाठी सदर)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link