Next
हा काळही सरेल!
प्राजक्ता कशेळकर
Friday, August 30 | 02:45 PM
15 0 0
Share this story


पुन्हा एकदा इक्विटी मार्केटमध्ये मोठी पडझड आणि एकामागून एक जागतिक तसेच देशांतर्गत वाईट बातम्यांची रीघ सुरू झाली आहे आणि पुन्हा एकदा सामान्य गुंतवणूकदारांमधे गोंधळाचे वातावरण पसरले आहे. ‘पुन्हा एकदा’ म्हणण्याचे कारण म्हणजे २०१८च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अशीच जोराची पडझड झाली होती आणि निरनिराळ्या वाईट बातम्यांचे पेव फुटले होते. तेव्हा ‘झी मराठी दिशा’मध्ये मी ‘धीर धरी रे’ या लेखात सामान्य गुंतवणूकदारांसाठी संयम आणि चिकाटीचे महत्त्व सोदाहरण विशद केले होते. जेव्हा सर्व काही आलबेल असते तेव्हा बरेच लोक हे विसरून जातात की शेअर बाजारात मुदत ठेवींप्रमाणे स्थिर दराने परतावा मिळणार नसतो, तर अनेक महिने – काही वेळा वर्षे – गुंतवणूक नुकसानीत दिसत राहू शकते. मात्र चांगले दिवस आले की थोड्याच अवधीत अशी गुंतवणूक नुकसानच भरून काढते असे नव्हे तर वर नफाही करून देते.
याविषयी बहुसंख्य गुंतवणूकदारांची वर्तणूक गमतीची गोष्ट असते. जेव्हा मार्केट वर वर चाललेले असते, निर्देशांक नियमितपणे नवीन नवीन उच्चांक गाठत असतो, तेव्हा उगवलेला सूर्य कधी बुडणारच नाही, अशा आत्मविश्वासात ते असतात. मात्र परिस्थिती पालटते आणि मार्केट पडू लागते, तेव्हा ते इतके पराकोटीचे निराश होऊन जातात की जणू ‘इस रात की सुबह नहीं’! अर्थातच ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येणारच असते आणि रात्रीनंतर पुन्हा पहाट होणारच असते, त्याचप्रमाणे गुंतवणूकविश्वातही चांगला आणि वाईट काळ आलटूनपालटून पुनःपुन्हा येत राहणार असतो. त्यामुळे आपल्याला शेअर बाजारातील पडझडीकडे एखादी समस्या म्हणून नव्हे तर त्याचा आंतरिक भाग, एक स्वभावविशेष म्हणून बघायला शिकले पाहिजे.
लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवतेय. एक पराक्रमी आणि वैभवशाली राजा असतो. एकदा लहरीच्या भरात तो राज्यात दवंडी पिटवतो की ‘आनंदी माणूस दुःखी होईल आणि दुःखी माणूस आनंदी होईल’ असा मंत्र जो कोणी सांगेल, त्याला मोठे इनाम देण्यात येईल. तेव्हा एक हुशार माणूस त्याला एक मोठ्ठा आरसा भेट देतो, त्यावर लिहिलेले असते ‘हा काळही सरेल’ -- अतीव दुःखाने व्याकुळ झालेल्या माणसाला आशेचा किरण दाखवणारा आणि आनंदात मश्गुल झालेल्याला वास्तवात आणणारा हाच तो मंत्र! रोज रोज मार्केटचा चढउतार बघून खुश किंवा चिंतित होणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी हा मंत्र लिहून घरात दिसेल असा लावला पाहिजे.
‘गुंतवणूक’ हे मानवी मनातील भविष्याविषयी वाटणाऱ्या आशा आणि अनिश्चितता या दोन भावनांमधील द्वंद्व आहे. इक्विटीमधील दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे माणसाची प्रगती आणि उद्योजकता यांवर गुंतवणूकदाराने दाखवलेला अढळ विश्वासच होय. इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक म्हणजे मोठमोठ्या कंपन्या उभारणारे उद्योजक व प्रवर्तक हे दीर्घकाळात कितीही अडचणी आल्या तरी आपापले उद्योगधंदे यशस्वीरीत्या चालवतील, वाढवतील आणि आपल्याला भरघोस परतावा मिळवून देतील या गोष्टीवरील विश्वास होय.
जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये पडझड होते तेव्हा तेव्हा आपला हा विश्वास नक्की किती अढळ आहे याची तपासणी होत असते. यात मीडियामधून काही तज्ज्ञ जपानमध्ये कशी गेली २० वर्षे मंदी सुरू आहे, युरोपातील रोख्यांवरील व्याजदर कमी होत होत आता कसे शून्याखाली घसरले आहेत, अमेरिकेतील रोखेबाजारात कशी मंदीची चाहूल लागली आहे, भारतात कसा आर्थिक वृद्धिदर कमी होतोय, बांधकाम तसेच वाहनउद्योगात कशी प्रचंड मंदी आहे, बँकांमध्ये तसेच इतर फायनान्स कंपन्यांमध्ये कशी मोठ्या प्रमाणावर बुडीत कर्जे जमली आहेत वगैरे गोष्टींचे चर्वितचर्वण करत असतात. हे सगळे आपल्या विश्वासाला दणके देण्याचे काम करतात. अर्थात, आपण कितीही अंदाज वर्तवायचा प्रयत्न केला तरी भविष्यात नक्की काय होणार आहे ते कोणालाच माहीत नसते.  
या माहीत नसलेल्या भविष्याविषयी आपण आशावादी आहोत की निराशावादी यावर आपण अशा कठीणप्रसंगी कसे वागू ते ठरत असते. निराशावादी (किंवा अज्ञानी) गुंतवणूकदार आताची पडझड ही भविष्यात अनंतकाळ सुरू राहणाऱ्या महामंदीची नांदी समजून मार्केटमधून पलायन करतील, तर आशावादी गुंतवणूकदार ‘वो सुबह कभी तो आयेगी’ म्हणत संयम ठेवू शकतील, किंबहुना खाली आलेल्या आकर्षक किमतींवर जास्तीची गुंतवणूक करू शकतील.
या लेखाच्या प्रत्येक वाचकाला मी हे आवर्जून सांगेन की नजीकच्या भविष्यातील भारताच्या आर्थिक प्रगतीविषयी नक्कीच आपण सर्वांनी आशावादी असावे, अशी परिस्थिती आहे. याचे कारण म्हणजे भारतातील प्रचंड मोठी युवा पिढी. जगातील सर्वात मोठा इंग्रजी येणारा सुशिक्षित व कुशल मनुष्यबळाचा साठा भारतात आहे. भारतात पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली गुंतवणूक, तसेच वाढत्या उत्पन्नासोबत जनतेच्या वाढत्या गरजा यातून दमदार विकासदर साध्य होण्याची अपेक्षा आहे. येत्या काही वर्षांत भारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न २००० डॉलरची पातळी ओलांडेल. ही पातळी ओलांडणाऱ्या देशांची त्यापुढील काळातील आर्थिक प्रगती जलद गतीने होते असा अनुभव आहे.
त्यामुळे भारतीय शेअर बाजारातील पडझड, बेअर मार्केट किंवा मंदीच्या गप्पा अशा घटना नेहमीच तात्कालिक ठरतील, आणि गुंतवणूकदारांना खरेदी करायची संधी देत राहतील. जोपर्यंत आपल्या मनात हा विश्वास पक्का ठसत नाही, तोपर्यंत बाजारातील पडझडीच्या सत्रात आपल्याला नेहमीच मानसिक अस्वस्थतेचा सामना करत राहावा लागेल.
अर्थात या सगळ्याचा अर्थ असा नाही की सद्य परिस्थिती चिंताजनक नाही. हे नक्कीच खरे आहे की जागतिक आर्थिक परिस्थिती नक्कीच काळजी वाटावी अशी आहे. अमेरिका-चीन या दोन महासत्तांमधील व्यापारयुद्ध अधिक चिघळले तर संपूर्ण जग मंदीत लोटले जाण्याची भीती आहे. त्याचा भारतावरही परिणाम होणे अटळ आहे. मात्र अशा सगळ्या संकटांचा सामना करूनही कालांतराने भारतीय कंपन्या, उद्योजक सावरतील आणि त्यांच्या वाढत्या नफ्यामुळे शेअर मार्केटदेखील वर जाईल. वर म्हटल्याप्रमाणे या सर्व सव्यापसव्यात नक्की किती काळ निघून जाईल ते सांगणे कठीण आहे. परंतु त्यामुळे आपल्याला इक्विटी गुंतवणुकीतून घाबरून, खचून किंवा कंटाळून पळून जायचे नाहीये. काही झाले तरी शेवटी म्हणतातच ना ‘डर के आगे जीत हैं!’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link