Next
संगीतमय बांबू वन
- कविता भालेराव
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

छोटी छोटी पेरं असलेले, चकचकीत हिरव्या पिवळसर रंगांचे उंचच्या उंच बांबू आणि त्यांच्या हिरव्यागार लांबट पानांचं आच्छादन बघून खूपच छान वाटतं. जेव्हा अशाप्रकारची अनेक लहानमोठी बांबूंची झाडं खूप मोठ्या जागेत अगदी दाटीवाटीनं वाढतात तेव्हा तर त्यांचं मोठं आकर्षक ‘बांबूंचं वन’ तयार होतं. या बांबूंच्या वनाचं निसर्गरम्य दृश्य बघून आपण आनंदानं अचंबित होतो. त्याचबरोबर, या सरळसोट, शिस्तीत एकमेकांशेजारी वाढलेल्या घनदाट बांबूंच्या वनामधून वाऱ्याच्या झोताबरोबर जो अप्रतिम, संगीतमय, मनोहारी आवाज येतो तो तर अधिकच मंत्रमुग्ध करतो.
आश्चर्य म्हणजे नेमकं अशाच प्रकारचं ‘सागानो बांबू वन’ जपानच्या क्योटो या भागात आढळतं. हे आखीव-रेखीव, अतिसुंदर, बांबूंचं जंगल जपानमधील उत्तम नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या बांबूवनाचा भाग ‘अराशियामा पार्क’ या नावानं ओळखला जातो. युनेस्कोच्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांच्या यादीत या भागाचा समावेश करण्यात आला आहे.
‘मोसो’ या विशिष्ट जातीच्या बांबूंचीच सागानो वनात भरभरून वाढ झालेली पाहावयास मिळते. सुरुवातीला एक महिन्यातच मोसोची उंची सुमारे वीस मीटरपर्यंत होते व त्यांचा घेर वीस सेंटिमीटर इतका होतो. नंतर मात्र ते हळूहळू वाढतं. इतर गवतांप्रमाणे बांबूंच्या जमिनीतील खोडाच्या वाढीमुळे त्यांची लहानमोठी बेटं बनतात. बांबूची कांडी बऱ्याचदा पोकळच असते. दोन कांड्यांमधील पेरांच्या भागात जाड पडदा असतो. बांबूला भरपूर फांद्या येतात. त्याची पानं गवताच्या पात्याप्रमाणे साधी, मोठी, लांबट व अरुंद असतात.
सागानो वनाच्या परिघाभोवती जुन्या, वाळलेल्या हजारो बांबूंचीच उंच भिंत उभारलेली आहे. हे वन त्याच्या अप्रतिम सौंदर्याबरोबरच तेथील आश्चर्यकारक, सुमधुर आवाजामुळेही लोकप्रिय बनलं आहे. हा जादूई, सुरेल आवाज, उंच सडपातळ, दाटीवाटीनं वाढलेल्या मोसो बांबूंच्या कांड्यांमधून वाहणाऱ्या वाऱ्याच्या घर्षणानं निर्माण होतो. आपल्याला माहीत आहे की वैज्ञानिकदृष्ट्या हवेला अनेक गुणधर्म असतात. सभोवतालच्या वातावरणाचं रूप व त्याच्या बदलानुसार हवेचे वेगवेगळे गुणधर्म जाणवतात. वातावरण स्तब्ध असेल तर त्या ठिकाणच्या झाडांचं पानही हलत नाही. याउलट वादळी वाऱ्यानं संपूर्ण झाडाची जोरदार हालचाल होते. वाहत्या हवेला होणारा अडथळा, अटकाव, रोध-प्रतिरोध इत्यादी बाह्य घटकांमुळे हे वातावरणबदलाचे आपण अनुभव घेत असतो.
सागानो वनातील बांबूंच्या पोकळ उंच कांड्यांजवळून वारा वाहत असताना त्याच्या गतीनुसार तो कमी अधिक प्रमाणात बांबूंशी सलगी करतो आणि त्यानुसारच वाऱ्याचे हजारो बांबूंशी कमीअधिक प्रमाणात घर्षण होते. त्याचा प्रत्यय या घर्षणानं निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या संगीतमय आवाजांमुळे आपल्याला येतो. ज्यावेळी हवा स्तब्ध असते तेव्हा त्या वनात अनोखी नीरव शांतता पसरते. हा अनुभवही विलक्षण असतो.
मोसो बांबूंचं हे वन अनेक दृष्टिनं सभोवतालच्या पर्यावरणास मैत्रीपूर्ण व फायदेशीर आहे. तेथील जैविक विविधतेचंही उत्तम रक्षण व संवर्धन झालं आहे. म्हणूनच पर्यटकांसाठी व जपानी लोकांसाठी सागानो बांबू वन ही एक रम्य अनुभव देणारी आदर्श, भूषणावह परिसंस्था आहे.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link