Next
फोन ठेवा बाजूला...
अमृता दुर्वे
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


काम करताना तुमचं लक्ष सतत फोनकडे जातं का?
फोनवर एखादं नोटिफिकेशन आलं, किंवा मेसेज आल्याचा आवाज आला तर जीव वर-खाली होतो का?
सोशल मीडियापासून दूर राहत काम वा अभ्यास करणं कठीण जातंय?
मग काही अॅप्स आहेत जी तुम्हाला सोशल मीडियापासून दूर राहायला किंवा ‘डिजिटल डिटॉक्स’ करायला मदत करतील.

Forest - हे अॅप वापरायला सुरुवात करताना तुम्ही फोन किती काळ बाजूला ठेवायचाय, ते ठरवायचं. कोणत्या अॅप्सच्या वापरावर निर्बंध आणायचे आहेत, ते ठरवायचं.
म्हणजे तुम्ही ठरवलंत ३० मिनिटं. वेळा लावा आणि फोन बाजूला ठेवा.
जेवढा वेळ तुम्ही फोनला हात लावणार नाही, तेवढ्या वेळात तुमच्या फोनवर एक डिजिटल रोप उगवायला लागेल.
पण तुम्ही जर एखादं परवानगी नसलेलं अॅप वापरलंत तर हे अॅप व्हायब्रेट होऊन वा नोटिफिकेशन्स पाठवून तुम्हाला ताकीद देईल.
आणि तुम्ही ऐकलं नाहीत तर मग तुमचं हे डिजिटल रोप मरगळून जाईल.
पण तुम्ही चांगली कामगिरी केलीत तर तुम्हाला या अॅपमध्ये विविध रिवॉर्ड्स मिळतील. आणि एका ठरावीक टप्प्यानंतर या अॅपची कंपनी तुमच्यातर्फे एक खरंखुरं रोपही लावेल.
हे अॅप तुमची मानसिक क्षमता किंवा स्वतःवरचं नियंत्रण वाढवायला मदत करतं.

Siempo - हे अॅप इतर अॅप्सपेक्षा वेगळं आहे.
इतर अॅप्स तुम्हाला सोशल मीडिया वा वेळखाऊ अॅप्स वापरण्यापासून रोखतात किंवा ती अॅप्स काही काळासाठी ब्लॉक करतात.
मात्र इन्स्टॉल केल्यानंतर हे अॅप तुमच्या फोनवर स्वतःचा लाँचर सुरू करेल.
कोणती अॅप्स तुमचा वेळ खातात त्याची यादी हे अॅप विचारेल.
तुमच्या कामाची इमेल्स आणि मेसेजिंग अॅप्स तुमच्या होम स्क्रीनवर असतील.
आणि ही वेळखाऊ अॅप्स नजरेआड करण्यात येतील.
एखादं अॅप पूर्णपणे बाद करण्याऐवजी ते दिवसातून जास्तीत जास्त किती वेळ वापरता येईल हेदेखील तुम्हाला ठरवता येईल.
म्हणजे दिवसभरात एकूण फक्त २० मिनिटं फेसबुकवर घालवायची असं ठरवलंत, तर त्या २० मिनिटांनंतर ते अॅप वापरता येणार नाही. शिवाय त्या २० मिनिटांमध्ये दिवसभरात केव्हाही तुम्ही अॅप वापराल तेव्हा तुम्हाला टायमर दिसत राहील.

Stay Focussed - काही काळासाठी जर काही अॅप्सना अजिबात हात लावायचा नसेल, तर हे अॅप उत्तम.
परंतु हे अॅप अतिशय कडक आहे. तुम्ही ब्लॅक लिस्ट केलेली अॅप्स तुम्हाला तेवढा काळ उलटेपर्यंत अजिबात वापरता येणार नाहीत. अगदी या अॅप्सची नोटिफिकेशन्सही दिसणार नाहीत. आणि हे अॅप पटकन अन-इन्स्टॉल करणंही शक्य नाही.
परंतु तुमचा कोणत्या अॅपचा वापर किती आहे याची माहिती हे अॅप तुम्हाला देईल. म्हणजे त्यावरून तुम्हाला स्वतःच स्वतःला कुठे आवरायचं ते ठरवता येईल.

Offtime - ठरावीक वेळी फोनपासून दूर राहायचं असेल तर हे अॅप वापरा. कोणती अॅप्स वापरायची आणि कोणती नाही त्याची यादी या अॅपला द्या.
हे अॅप तुमच्या फोनचं नियंत्रण स्वतःकडे घेऊन तुम्ही किती काळ फोन वापरू शकत नाही, हे ठरवेल. हा कालावधी संपेपर्यंत तुम्ही अगदी स्क्रीनही ऑन करू शकणार नाही असंही फीचर यात आहे. आणि जर तुम्ही काळ्या यादीतलं अॅप वापरायचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला या अॅपकडून जवळपास धमकीच मिळेल.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link