Next
कट्टरतेकडून मध्यममार्गाकडे
विशेष प्रतिनिधी
Friday, February 01 | 03:00 PM
15 0 0
Share this story

झुंजार कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतला अखेरचा शिलेदार आपल्यातून निघून गेला आहे. डॉ. राममनोहर लोहिया यांनी स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील समाजवादी चळचवळीला खऱ्या अर्थाने आकार दिला. ती केवळ वैचारिक चळवळ न राहता ती निवडणुकीच्या व्यावहारिक राजकारणात अग्रेसर व्हावी यासाठी त्यांनी या चळवळीचा राजकीय पाया व्यापक केला. त्यांनी तो तसा केला नसता तर भारतातील समाजवादी चळवळ केवळ मूठभर अव्यवहारी बुद्धिवाद्यांपुरती मर्यादित राहिली असती. समाजवादी चळवळीचा राजकीय पाया व्यापक करण्यासाठी तिला समाजापर्यंत व त्याचा घटक असलेल्या कामगारवर्गापर्यंत नेऊन तिला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्याचे काम ज्यांनी केले, त्यात जार्ज फर्नांडिस यांचे नाव अग्रभागी आहे. मुंबईत स.का. पाटलांना पराभूत करून जॉर्ज संसदीय राजकारणात उतरले. कट्टर समाजवादी विचारसरणी लोकमानसात मूळ धरत नाही, हे लक्षात आल्यानंतर ज्या थोड्या समाजवादी राजकारण्यांनी मध्यममार्गी राजकारणाचा अंगीकार केला, त्यातील एक जॉर्ज होते. त्याचवेळी भारतासारख्या देशात कट्टर हिंदुत्ववादी राजकारण यशस्वी होऊ शकत नाही हे ओळखण्याचे राजकीय शहाणपण जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवले व त्यांनीही भारतीय जनता पक्षाची स्थापना करून उजव्या मध्यममार्गी राजकारणाचा पाया घातला. जॉर्ज व अटलबिहारी या दोन टोकाच्या राजकीय विचारसरणी मानणाऱ्या नेत्यांची मैत्री व राजकारण या मध्यममार्गामुळे शक्य झाले. भारतातल्या डाव्या व उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी आपल्या कट्टर भूमिका सोडल्या व किमान सहमतीचा कार्यक्रम स्वीकारला तर सध्याच्या राजकारणात जे एकारलेपण आले आहे ते सहज दूर होऊ शकेल. या वर्षी आपल्याला सोडून गेलेल्या अटलाबिहारी वाजपेयी व जॉर्ज फर्नांडिस यांना ती खरी श्रद्धांजली ठरेल. निवडणूकपूर्व अर्थसंकल्प आज सादर होईल. हा अंक हातात पडेपर्यंत नव्या हंगामी अर्थसंकल्पातील तरतुदी जाहीर झालेल्या असतील. त्याची चर्चा आपण नंतर करूच. परंतु या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा आढावा घेऊन त्याचे यशापयश जोखणे योग्य ठरेल असे वाटल्याने ‘झी मराठी दिशाच्या’ या अंकात या आर्थिक धोरणांची चर्चा करणारा खास विभाग देण्यात आला आहे. यात सरकारच्या नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया, नियोजन मंडळाची बरखास्ती वगैरे निर्णयांची चिकित्सा करणारे मान्यवर अर्थतज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कोणत्याही आर्थिक धोरणांचे यशापयश केवळ चार-पाच वर्षांच्या कामगिरीच्या आधारे ठरत नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या या आर्थिक निर्णयाच्या गेल्या पाच वर्षांतील आढाव्याच्या आधारे सरकारचे यशापयश जोखण्याचा हा प्रयत्न नाही, तर या निर्णयांची दिशा काय आहे व त्याचे परिणाम काय संभवतात याचा अंदाज घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्याआधारे वाचक या सरकारच्या आर्थिक धोरणाविषयी आपले मत बनवू शकतील. प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे भारतीय राजकारणात एक रंगत जरूर आली आहे. त्या येत्या काळात राजकारणात अशाच सक्रिय राहतील का, त्यांना जी उपजत लोकप्रियता लाभली आहे, तिच्या आधारे त्या कशी राजकीय वाटचाल करतील याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. त्यामुळे लोकांनी त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या आहेत. मात्र त्या या अपेक्षांना खऱ्या उतरतील का हा खरा प्रश्न आहे. इंदिरा गांधीचा राजकीय वारसा, त्यांच्यासारखा चेहरा व देहबोली, त्यांच्यासारखी लोकप्रियता प्रियांकांना लाभली असली तरी हा सर्व वारसा पुढे चालवणे सोपे काम नाही. त्या त्यात यशस्वी होतात का याकडे सर्वांचे लक्ष असेल. n

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link