Next
कृतज्ञतेचा निर्मळ सण
मेधा आलकरी
Friday, November 23 | 04:31 PM
15 0 0
Share this story“मिनिटामिनिटाला अगदी आवर्जून थँक्यू म्हणणाऱ्या ह्या अमेरिकन माणसांना वेगळा दिवस कशाला हवा थॅंक्स गिव्हिंगसाठी? आज काय तर हा डे, उद्या तो डे. दिवस राखून ठेवायचं फॅडच आहे ह्यांचं. आम्ही असे ऊठसूट आभारही मानत नाही आणि त्याकरता दिवस राखून ठेवणं तर अजिबात नाही.” ...नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेला निघालो असताना मुंबई एअरपोर्टला चाललेल्या वयस्कांच्या संवादातील काही वाक्यं कानी पडली आणि काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन कुटुंबाबरोबर घालवलेला थॅंक्स गिव्हिंगचा गुरुवार मला आठवला. अतिशय हृद्य अशी ती संध्याकाळ होती. सगळं कुटुंब एकत्र आलं होतं. वृद्ध आईवडिलांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आज विस्फारल्या होत्या. आनंद ओसंडून वाहत होता. जणू आज त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला होता. शिकागोहून कॅलिफोर्नियात नुकतीच बदली झालेल्या माझ्या लेकाच्या शेजाऱ्यांनी अगदी कौटुंबिक असलेल्या ह्या सोहळ्यात आम्हाला मोकळेपणानं सहभागी करून घेतलं होतं. अशी मित्रमंडळी एकत्र आली की त्याला ‘फ्रेंड्स गिव्हिंग’ म्हटलं जातं.

लेकी, सुना नातवंडं ह्यांनी घर भरून गेलं होतं. काही लांबचा विमान प्रवास करून (आणि त्याकरता भरपूर भाडं भरून) आले होते, तर काही तासाभराच्या अंतरावरून. आल्या आल्या ती त्या वृद्ध जोडप्याच्या गळ्यात पडत, चुंबनं घेत. त्यांचे सुरकुतले ओठ मग मुलांच्या कपाळी टेकत. मुलींच्या हाती असलेल्या पदार्थांच्या थाळ्या आधीच ओसंडून चाललेल्या फ्रिजमध्ये कोंबायचा त्यांचा प्रयत्न चालला होता. चार दिवस आता हे कुटुंब असंच मजेत हसतखेळत एकत्र वेळ घालवणार होतं.  नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारपासून रविवारपर्यंतचे हे सोनेरी दिवस. बाहेर गुलाबी थंडी आणि आत मायेची ऊब. मला माझ्या लहानपणीचे दिवाळीचे चार दिवस आठवले. आम्ही पोचल्यानंतरची आजीची लगबग आठवली. ग्लुकोज बिस्किटांच्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवलेला खारा-गोड फराळ आठवला. लोण्याच्या पांढऱ्याशुभ्र गोळ्याबरोबर खाल्लेल्या खमंग थालिपीठापासून चारोळ्या पोहत असलेली आटीव दुधाची गोड बासुंदी आठवली. साधारण हाच काळ, हेच नोव्हेंबरचे दिवस. कुटुंबानं एकत्रित साजऱ्या केलेल्या सणाची तीच ती माधुरी. थॅंक्स गिव्हिंग म्हणजे आपल्या माणसांना अधिक जवळ आणणारी आणि परक्यांना आपलंसं करणारी ही त्यांची दिवाळीच.  जेवायची वेळ झाली. आजीबाईंचा हातखंडा असलेली भरलेली टर्की एका विशिष्ट पद्धतीनं कापून टेबलावर आली. रस्सा वेगळा ठेवला होता. तिच्या शेजारी लसूण आणि लोणी घालून एकजीव केलेला उकडलेला बटाटा येऊन बसला. रताळं, फरसबी अशा मोसमी भाज्या चांगलं तेलमालिश करून, गरम ओव्हनमधून अभ्यंगस्नान केल्यागत, निथळत बाहेर येऊन टेबलावर विराजमान झाल्या. आपला गुलाबी रंग मिरवत क्रॅनबेरीचा जॅम हळूच येऊन टेकला. खेकड्याच्या पायासारखे दिसणारे पण अत्यंत चविष्ठ असे मुलायम क्रोसॉ आपलं नेटकं हास्य जपत टेबलावर एकीकडे सरकून बसले. ह्या मौसमात भरपूर उगवणाऱ्या लाल भोपळ्याचा आज विशेष मान. नेहमी ‘अॅपल पाय’ला मिळणारी जागा आज त्यानं पटकावली होती. हिरव्यागार सॅलॅड पानांमधून सुका मेवा डोकावत होता. मुलींनी आवडीने करून आणलेल्या त्यांच्या खास पदार्थांच्या डिशेसही चिवचिवाटासह टेबलावर घुसल्या.

नितळ ग्लासांमध्ये वाइन गिरक्या घेत अवतरली. मग सगळ्यांनी हातात हात गुंफले, डोळे मिटले, मान तुकवली आणि जे आपल्यापाशी आज आहे त्याबद्धल, इतकं प्रेमळ कुटुंब व मित्र दिल्याबद्धल विधात्याचे आभार मानले. गुंफलेले हात सुटताच ग्लासांचा नाजूक किणकिणाट झाला आणि वाइनच्या घोटाबरोबर जेवणाला सुरुवात झाली. लेकी-सुनांनी भरलेल्या त्या घरात सारे जण टेबलाभोवती दाटीवाटीनं बसले होते. चार जण एकाच वेळी मॅश्ड पोटॅटोची डिश पास करायला सांगत होते. हा अगदी खवय्या लोकांचा अन्नोत्सव म्हणावा. डायटिंगची ऐशी की तैशी! चार दिवस ताव मारून खायचं, ल्युडोसारखे बोर्ड गेम नाहीतर उनो हा पत्त्यांचा गेम खेळायचा, टीव्हीवर खास ह्या मोसमात खेळला जाणारा फूटबॉलचा गेम बघायचा, खूप गप्पा मारायच्या, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा. फिक्कट झालेले फोटो पाहायचे. ख्रिसमस ट्री सजवायला लागायचं. हे असं एकत्र येणं उत्साहाची लागण करतं आणि मनाला तरतरीत करून सोडतं. मुलांनी आपल्या आजी-आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या गतकाळातील गोष्टी म्हणजे खरं तर वारसाच म्हणायचा. कधी समृद्ध घरांमधून गोरगरिबांना ह्या दिवशी काहीतरी दानधर्म करण्याचा संस्कारही जोपासला जातो.

म्हाताऱ्या जोडप्याची धाकटी नात, चार वर्षांच्या चुणचुणीत मुलीची आई, माझ्या शेजारी गप्पा मारायला येऊन बसली. तिच्या मुलीनी विचारलं, “आई, ही टर्की अशाच पद्धतीनं का कापतात?” आई म्हणाली, “आपल्या घराची ही परंपरा आहे. माझी आई अशीच कापते. जा तुझ्या आजीला विचार.” ती तुरुतुरु चालत तिच्या आजीकडे गेली. तोच प्रश्न, उत्तरही तेच. मग तोच प्रश्न विचारायला ती गेली आपल्या पणजीकडे. पणजी आपलं बोळकं पसरून हसली अन् म्हणाली, “अगं, परंपरा कसली बोडख्याची? आतासारखा माझ्याकडे मोठा ओव्हन नव्हता. त्या छोट्या ओव्हनमध्ये बसेल अशा पद्धतीनं मी ती टर्की कापली.” त्या म्हातारीचा आणि त्या मुलीचा निरागसपणा सारखाच म्हणायचा. पणजीबाईंनी सासरी गेल्यावर पहिल्या थॅंक्स गिव्हिंगला टर्की रोस्ट केली आणि त्यातून गळलेल्या चरबीमुळे ओव्हननं कसा पेट घेतला तो किस्सा ऐकवला आणि मागल्या वर्षी फ्रिजमध्ये जागा नव्हती म्हणून थंड व्हायला पोर्चच्या कठड्यावर ठेवलेल्या पंपकीन पायमध्ये, अवचित आलेल्या मुंगुसानं कसं तोंड खुपसलं होतं त्याची कथा रंगवून रंगवून सांगितली. माझ्या मनात कढईत हसलेला अनारसा आणि मांजरीनं गट्ट केलेला साजूक तुपातील शिरा तरळला.

थॅंक्स गिव्हिंगला टर्कीच का? ह्या माझ्या प्रश्नाला आजोबांनी मोठं विनोदी उत्तर दिलं. एवढ्या मोठ्या माझ्या फॅमिलीला खाऊ घालायला एकच मोठा पक्षी पुरतो. शिवाय तो ना दूध देत ना अंडी. अमेरिकेत ह्या दिवशी म्हणे ५० मिलियन टर्की कापल्या जातात. “घरी जाऊन मस्त ताणून द्या” असा खोडकर निरोप देत आजोबा जोरजोरात हसू लागले. आम्ही थोडे बुचकळ्यात पडलो. तर ते डोळे मिचकावत खालच्या आवाजात म्हणाले, “टर्कीमध्ये असलेले प्रोटिन्स तुम्हाला गुंगी आणतात, असा समज आहे. गुंगी येते पण ती अतिसेवनानं, त्यात त्या बिचाऱ्या टर्कीचा काही दोष नाही. फूड कोमा !” मला उगाचच केशरी श्रीखंडातील जायफळाची आठवण झाली.

आभार प्रदर्शित करून त्या हसत्याखेळत्या घराचा आम्ही निरोप घेतला आणि नंतर झालेल्या गप्पांमधून आणि दुसऱ्या दिवशी टीव्हीवर बघितलेल्या चलतचित्रांवरून मला ह्या अत्यंत जिव्हाळ्याच्या उत्सवाबद्धल बऱ्याच गोष्टी समजल्या. त्याचा इतिहास, कालानुरूप बदललेली त्याची व्याख्या आणि त्याच्या अनुषंगाने ख्रिसमससाठी सुरू झालेली अगदी मनसोक्त खरेदी. १६२१ साली युरोपियन स्थलांतरितांना मदत केल्याची कृतज्ञता म्हणून स्थानिक आदिवासींना मेजवानी देण्यात आली आणि हे फर्स्ट थॅंक्स गिव्हिंग म्हणून पुढे ओळखलं जाऊ लागलं. कुठल्याही धर्म-पंथाचा बिल्ला नसलेला हा निर्मळ सण. देवाला आपल्या अस्तित्वाबद्धल, भूमीला ती देत असलेल्या अन्नाबद्धल, निसर्गाला स्वच्छ सूर्यप्रकाश, वर्षा, बर्फवृष्टी ह्यासाठी, प्रेमळ कुटुंबासाठी, निरपेक्ष मैत्रीसाठी आणि आपल्याकडे जितकं आहे त्याबद्धल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस. गेल्या वर्षातील चांगल्या घटनांबद्धल कृतज्ञ राहण्याचा दिवस.

आपण जेव्हा आंतरिक कृतज्ञतेनं नतमस्तक होतो तेव्हा आपोआपच लीन होतो आणि ही लीनता आपल्याला जाणीव करून देते की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यासाठी आपण खरोखरच पात्र आहोत का? गर्वाचं घर बांधायला ही लीनता आडकाठी आणते. कृतज्ञतेबरोबरच हा कौतुकसोहळा म्हणूनही साजरा केला जातो. कौतुक झालेलं कुणाला नाही आवडत? ते शेअर केलं तर कितीतरी पटीनं तुमच्याकडे परत येतं. संस्कृतीचा पाया असलेल्या ह्या प्रथा पाळण्यात एक आनंद आहे. त्यामुळे समाज अशा परंपरांशी जोडला जातो.

न्यू यॉर्क शहरी असलेल्या ‘मेसी’ ह्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सकाळी ९ वाजता एक थॅंक्स गिव्हिंग परेड सुरू होते. १९२४ पासून नित्यनेमानं ही प्रथा चालू आहे. कार्टून कॅरॅक्टरचे महाकाय फुगे धरून लोक चालत असतात. काही चित्ररथ तयार केलेले असतात. त्यातील पात्रं आपापल्या भूमिका बजावत असतात. बॅण्ड वाजत असतो. रस्त्याच्या काठानं उभ्या असलेल्या बघ्यांमध्ये हर्षोल्हास ओसंडून वाहत असतो. मला आपल्या प्रजासत्ताकदिनाची परेड आठवली! परेडनंतर सुरू होतो राष्ट्रीय डॉग शो. टीव्हीवर वेगवेगळ्या जातीचे, रंगांचे, छोटेमोठे कुत्रे पाहणं ही श्वानप्रेमींसाठी मोठी पर्वणीच असते. आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्धल कृतज्ञता बाळगायच्या उदात्त कृत्यानंतर, दुसऱ्याच दिवशी ‘ब्लॅक फ्रायडे’ ला पहाटे ३ वाजल्यापासून उघडणाऱ्या दुकानांसमोर, सेलमध्ये मिळणाऱ्या वस्तूंसाठी रांगा लावणारे आणि प्रसंगी रक्तबंबाळ होईस्तो हाणामारी करणारे लोक दिसले. हा म्हणजे प्रचंड विरोधाभास! ह्या दिवशी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७०% सूट असते. पहिल्या ५ फ्लॅट स्क्रीन टीव्हीवर अमुक इतकी सूट अशी जाहिरात असली की त्या पहिल्या पाचांत येण्यासाठी लोक थंडीतही दुकानासमोर नंबर लावून, पेंगत रात्र घालवतात. आता हा स्वस्तातील खरेदीचा आनंद देणारा शुक्रवार ‘काळा’ का बुवा? ट्रॅफिक जॅम, अपघात, हिंसा घडवून शिस्तीला काळं फासतो म्हणून? की अंधारात दुकानं उघडतात म्हणून? इथे काळा रंग हा निषेधाचा, शरमेचा, दुखवट्याचा किंवा अंधाराचा नसून तुफान विक्रीमुळे होणाऱ्या व अकाउंटवहीत दिसणाऱ्या नफ्याचा आहे. तोटा हा लाल अक्षरांत लिहिला जातो, मात्र नफा काळ्या अक्षरात. प्रकटपणे कृतज्ञता दर्शवण्यासाठी एखादा दिवस राखून ठेवण्याची ही विदेशी संकल्पना आपण अंगीकृत करावी आणि त्या दिवशी (सहसा एरवी ज्यांचे आभार मानले जात नाहीत) आपल्या कुटुंबीयांना, मुख्यत्वे जेष्ठ नागरिकांना, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या वरिष्ठांना, आपल्यासाठी राबणाऱ्या मोलकरणीला, सफाई कामगारांना, आपलं आयुष्य परिपूर्ण करणाऱ्या घरातील तान्ह्या बाळांनासुद्धा अगदी मनापासून थँक्यू म्हणावं. संकुचित होत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेच्या कक्षा रुंदावण्यासाठी, दूरदेशी उडालेल्या चिमण्यांना घराकडे आकर्षित करून एकमेकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपणही आपल्या आयुष्यात एखादा दिवस जरूर राखून ठेवूया. स्वप्नांच्या मागे उरीपोटी धावताना, घटकाभर विसावून, मागे वळून आसपासच्या व्यक्तींप्रती आणि आयुष्यात मिळालेल्या संधींबद्धल कृतज्ञ राहुया. वर्षातील इतर ३६४ दिवस ज्या गोष्टींना आपण गृहीत धरतो त्यांच्याबद्धलही कृतज्ञता व्यक्त करुया.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link