Next
एक होती ‘ग्रम्पी कॅट’
अमृता दुर्वे
Saturday, May 25 | 12:00 AM
15 0 0
Share this story


काही दिवसांपूर्वी एक बातमी टेक्नॉलॉजीशी संबंधित सगळ्याच वेबसाइट्सवर होती. ही होती एक निधनवार्ता. या बातमीवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या, हळहळ व्यक्त केली. इंटरनेटचं जग या व्यक्तिमत्त्वामुळे कसं बदललं, आपल्या आयुष्यात कसा आनंद या व्यक्तिमत्त्वामुळे आला होता याच्या आठवणी अनेकांनी शेअर केल्या. ही बातमी होती, ग्रम्पी कॅटच्या निधनाची. सगळं ऑनलाइन जग एका मांजराच्या जाण्यानं हळहळत होतं.
असं म्हणतात की इंटरनेटवर काहीही होऊ शकतं, कोणीही फेमस होऊ शकतं. काही जण स्वतःची कला जगाला दाखवून प्रसिद्ध होतात तर काही जण इंटरनेटची मदत घेऊन आपल्या कलागुणांचा विकास करतात. पण काही वर्षांपूर्वी एक मांजर इंटरनेटविश्वात तुफान लोकप्रिय झाली ती तिच्या ‘ग्रम्पी’ म्हणजेच वैतागलेल्या चेहऱ्यामुळे.
या मांजरीचं खरं नाव होतं - टार्डर सॉस (Tardar Sauce). तिच्या चेहऱ्यावरचे सततचे वैतागलेले भाव पाहून तिला पाळणाऱ्या टबाथा बंडसन या मुलीच्या भावानं सप्टेंबर २०१२ मध्ये त्याच्या बहिणीच्या या वैतागलेल्या मांजरीचा फोटो इंटरनेटवर टाकला आणि अल्पावधीतच ही मांजर लोकप्रिय झाली. मीम्स (Memes) - म्हणजेच हलकेफुलके कोपरखळ्या मारणारे विनोद प्रसिद्ध व्हायला नुकतीच सुरुवात झाली होती आणि ग्रम्पी कॅट या मीम्सची सम्राज्ञी झाली. एखाद्या वैतागवाण्या, कटकटीच्या गोष्टीबद्दल सांगताना सर्रास या मांजरीचा फोटो वापरला जाऊ लागला. निखळ विनोदासाठी मीम्स वापरण्याचा हा काळ होता, आणि आता इतकी ही मीम्स धारदार झालेली नव्हती किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात त्यांचा वापर होत नव्हता.
फक्त ग्रम्पी कॅटचं नाही तर इतरही अनेक पाळीव प्राणी इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळापासून प्रसिद्ध होते, पण अशाप्रकारची प्रसिद्धी फार कमी प्राण्यांच्या बाबतीत पद्धतशीरपणे वापरली गेली. काही गोष्टी वा उत्पादनं स्वतः वापरून, त्याबद्दल स्वतःच्या सोशल मीडियावर प्रसिद्धी करणाऱ्या व्यक्तींना सोशल मीडियावर - इन्फ्लुएन्सर (Influencer) म्हटलं जातं. ही मांजर सोशल मीडियावरच्या सुरुवातीच्या पेट-फ्लुएन्सर्स पैकी (Petfluencers) होती.
ग्रम्पी कॅटनं एकप्रकारे इंटरनेटवरच्या या वेगळ्या युगाची सुरुवात केली. तिची लोकप्रियता इतकी वाढली की तिचं स्वतःचं फेसबुक पेज आलं. ट्विटर अकाऊंट आला. इन्स्टाग्राम पेज आलं आणि लोकांना तिचे विविध मूड्स आणि तिचा खेळकरपणाही पाहता यावा यासाठी यूट्यूब चॅनलही आलं. ही ग्रम्पी कॅट गेली तेव्हा तिचे ८.५ दशलक्ष फेसबुक फॉलोअर्स आणि १.५ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स, तर २.५ दशलक्ष इन्स्टाग्राम फॉलोअर्स होते.
ही मांजर इंटरनेटमुळे इतकी लोकप्रिय झाली की तिला स्टॅन ली आणि जेनिफर लोपेझसारखे सेलिब्रिटी भेटले. या मांजरीवर Grumpy Cat’s Worst Christmas Ever नावाचा सिनेमाही निघाला. या मांजरीकडे येणारा प्रसिद्धीचा ओघ पाहता, तिचा स्वतःचा एक मॅनेजर नेमण्यात आला होता. जगप्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे हुबेहूब पुतळे घडवणाऱ्या मॅडम तुसॉद्समध्ये या ग्रम्पी कॅटचाही मेणाचा पुतळा आहे. या ग्रम्पी कॅटचं मर्चंडाईज म्हणजे तिच्यातर्फे उत्पादित करण्यात येणाऱ्या वस्तूही आहेत. यामध्ये सॉफ्ट टॉईज आहेत, कपडे आहेत आणि अगदी परफ्युमही आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी या मांजरीची पिळवणूक करत असल्याचा आरोप या मांजरीच्या पालकांवर झाला. परंतु, ही मांजर मुळातच अशी असल्याचं त्यांनी वेबसाइटवर जाहीर केलं. अगदी एका कॉफी कंपनीनं या मांजरीचा फोटो वापरत तिच्या नावाशी मिळतंजुळतं नाव असणारी कॉफी आणली, तेव्हा या मांजरीच्या पालकांनी कंपनीवर केस केली आणि त्याचा तब्बल $७५,००० चा मोबदला कॉफी कंपनीला द्यावा लागला.
या ग्रम्पी कॅटच्या पावलावर पावलं टाकत आता असे अनेक पेटफ्लुएन्सर सोशल मीडियावर आलेले आहेत. यामध्ये कुत्रे, मांजरी तर आहेतच. पण त्यासोबत खार, आणि चक्क एक लाल कोल्हाही आहे.
सोशल मीडियावरची ही चित्र-विचित्र दुनिया आहे. स्वतःच्या घरी पाळीव प्राणी नसला तरी रोजच्या आयुष्यातले ताणतणाव काही क्षण विसरण्यासाठी या ‘पेटफ्लुएन्सर्स’च्या जगात काही काळ रमायला हरकत नाही.

इन्स्टाग्रामवरचे लोकप्रिय पेट-अकाऊंट्स
Grumpy Cat, Tuna Melts my Heart, Jiffpom, Doug the Pug, Marnie the Dog, Juniper the Fox, Pumpkin the Raccoon, Jill the Squirrel, Lil Bub, Reagan the doodle

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link