Next
...आणि मदतीला धावली माणुसकी!
चंद्रशेखर भुयार
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story


‘गावकरी आणि एनडीआरएफ यांना शतश: धन्यवाद. ‘थँक्यू... आपकी वजहसे हम जिंदा है’, हे शब्द आहेत बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान अडकलेल्या प्रवाशांचे. प्रवाशांच्या या प्रतिक्रियाच खूप बोलक्या आहेत. बदलापूरजवळच्या कासगाव व चामटोलीतील ग्रामस्थांनी दाखवलेले प्रसंगावधान, धाडस व सहृदयता यामुळे बचावपथकांचे मदतकार्य सुकर झाले व प्रवासी सुखरूपपणे बाहेर येऊ शकले.

२६ जुलै रोजी कर्जत परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. बदलापूरजवळील चामटोली, कासगांव या परिसरातही पाणी शिरले  होते. बदलापूर-वांगणी रस्ताही पाण्याखाली गेला होता. उल्हासनदीलगतचे रेल्वे रूळही पाण्यात बुडाले होते. उल्हासनदीचे पात्र पुरामुळे विस्तारून रेल्वेमार्गापर्यंत आले होते. याचवेळेस मुंबईहून निघालेली मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस १० वाजताच्या सुमारास अंबरनाथ स्थानकावर आली. बदलापूर रेल्वेस्थानकावर रेल्वे रुळांवर पाणी असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस तब्बल दोन तास अंबरनाथ स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली. रखडत रखडत ही गाडी सुमारे एकच्या सुमारास बदलापूर स्थानकाच्या पुढे निघाली. ही गाडी चामटोली आणि कासगाव या भागात  आली, तेव्हा उल्हासनदीचे पाणी रेल्वे रुळांवर यायला सुरुवात झाली होती, त्यामुळे ती तिथेच अडकून पडली. गाडीतील प्रवाशांना मात्र काही कळत नव्हते. सभोवताली तर पाणीच पाणी. कुणीही मदतीला येण्याची शक्यता नाही. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रेल्वे प्रशासनाकडून कुणीतरी मदतीला येईल, अशी आशा प्रवाशांना वाटत होती. मात्र रात्रभर कुणीही फिरकले नाही. अशातच देवदूत म्हणून कासगाव आणि चमटोली गावचे ग्रामस्थ धावून आले. शेजारच्या जुवेली गावातील दोन जण याच महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. आपण याच गाडीत अडकलो आहोत, असे त्यांनी सकाळी सहा वाजता फोनवरून जुवेली गावचे नगरसेवक चेतन धुळे यांना सांगितले. चेतन धुळे यांनी चामटोली गावातील रहिवासी भालचंद्र कांबरी यांना सोबत घेतले आणि ते या गाडीच्या दिशेने निघाले, तेव्हा सकाळचे ७ वाजले होते. या दोघांनी डोंगरावर जाऊन गाडी नेमकी कुठे उभी आहे हे पहिले, त्यानंतर गावातील दोन तरुण गणेश इरमाळी आणि भगवान मंडलिक हे दोघे एका टायरच्या साहाय्याने ट्रेनपर्यत पोहोचले. त्यांनी गाडीतील प्रवाशांना आपल्यासोबत यायची विनंती केली. मात्र पाण्याच्या प्रवाहाला घाबरून कोणीही यायला तयार नव्हते. आपण लवकरच आपल्या मदतीला येऊ, असे सांगून हे दोन तरुण परत फिरले. त्या दोघांच्या रूपाने सात-आठ तासानंतर का होईना कुणीतरी मदतीला आले, याबाबत प्रवाशांना हायसे वाटले. त्यांच्या मनात सुटकेची आशा निर्माण झाली. त्याच दरम्यान ठाणे महापालिकेची एनडीआरफ टीम साडेनऊ वाजता घटनास्थळी पोचली. मात्र या जवानांना एक्स्प्रेसपर्यंत पोहोचणे अवघड होते. कारण चामटोली गावापासून ही गाडी दोन किलोमीटर दूर अडकली होती आणि मध्ये होते ७ ते ८ फूट पाणी. पाणी प्रवाही असल्याने गाडीपर्यंत पोचणे मोठे जिकिरीचे होते. स्थानिक अग्निशमनदलालाही एक्स्प्रेसपर्यंत पोहोचण्यात अपयश आले होते. जवानांच्या मदतीला स्थानिक गावकरी धावून आले. या एक्स्प्रेसकडे जाण्याचा जवळचा मार्ग जवानांना हवा होता. गाडीमधील १२०० प्रवासी बाहेर काढणे मोठे अवघड काम होते. याबाबत गावकऱ्यांचे मार्गदर्शन आणि मदत मोलाची ठरली. त्याआधीच तेथे जाऊन आलेल्या चेतन धुळे आणि भालचंद्र कांबरी या दोन ग्रामस्थांनी बचावकार्यासाठी आलेल्या एनडीआरफच्या टीमला मार्ग दाखवला. हा तीन किलोमीटरचा मार्ग अवघड होता. कारण तिथे डोंगराचा चढउतार होता. अखेर याच मार्गाने बचावकार्य सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी फक्त मार्गच दाखवला नाही, तर या जवानांनासोबत तेही बचावकार्यासाठी निघाले. तीन किलोमीटरचा खडतर प्रवास करून हे सर्वजण त्या गाडीच्या जवळ पोहोचले. त्यानंतर या गाडीपर्यंत जाऊन आलेले गणेश इरमाळी आणि भगवान मंडलिक यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसपर्यंत पोचण्याचा जवळचा मार्ग एनडीआरफच्या जवानांना दाखवला. या जवानांसोबत पाण्यात उतरून तेही गाडीपर्यंत पोचले. त्यानंतर या गाडीला दोर बांधण्यात आला. तेव्हा सकाळचे साडेदहा वाजले होते. पाण्याची पातळी थोडी कमी झाली होती. १२ तास अडकलेल्या प्रवाशांकडे अन्न-पाणी नव्हते. त्यामुळे गाडीपर्यंत पोचल्यावर सर्वात प्रथम गावकऱ्यांनी प्रवाशांपर्यंत खाद्यसामग्री पोचवली. चामटोलीचे बाळाराम कांबरी यांनी सोबत आणलेले  वडापाव, बिस्किटांचे पुडे, पाणी प्रवाशांना दिले. त्यांनतर दोराच्या साहाय्याने या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. एनडीआरफचे २५ जवानच होते. त्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढणे शक्य नव्हते. मात्र त्यांच्या मदतीला गावकरी धावून आले. दोरखंडाच्या मदतीने गावकरी साखळी करून उभे राहिले आणि त्यांनी एकेक करून प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. दरम्यान एनडीआरफचे पूर्ण पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत बोटी होत्या. इतर बचावसाहित्य होते. हे सर्व  साहित्य उचलून तीन किलोमोटर दूर डोंगरमाथ्यावरून वाहून नेण्याचे काम खूप अवघड होते.  मात्र गावकऱ्यांनी या जवानांना साहित्य उचलून न्यायला मदत केली. वरून मुसळधार पाऊस कोसळत होता. सर्वत्र चिखल झालेला व डोंगरावरील निसरडा रस्ता. मात्र त्यातूनही मार्ग काढत या जवानांच्या खांद्याला खांदा लावून हे गावकरी उभे होते. हळूहळू चामटोली, कासगाव, ज्युवेली, माणकोली, खरवई, दहिवली या गावांतील ३०० ते ४०० ग्रामस्थ मदतीला पोचले. मानवी साखळी तयार करून झाली. गाडीपर्यंत पाण्यात उभे राहून प्रवाशांना बाहेर काढायचे काम सुरू झाले. ग्रामस्थ भेदरलेल्या प्रवाशांना धीर देत होते. त्यांनी प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलेच, शिवाय त्यांचे सामानही वाहून नेले. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे या गोंधळात  कोणत्याही प्रवाशाचे सामान चोरीस गेल्याची अथवा गहाळ झाल्याची घटना घडली नाही. ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाहीत तर चामटोली गावात घरोघरी या प्रवाशांसाठी चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली. शिवाजी इरमाळी, बाळाराम भगत यांनी प्रवाशांसाठी चहा-नाश्त्याची सोय केली. बाळा जाधव यांनी प्रवाशांच्या जेवणाची सोय केली होती. या सर्व कामात गावातील अनेक हात या प्रवाशांच्या मदतीसाठी पुढे आले. एनडीआरएफच्या टीमचे काम तर कौतुकास्पद आहेच, तशीच गावकऱ्यांनी दाखवलेली कर्तव्यतत्परता खूप महत्त्वाची आहे. आजही माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय या यशस्वी बचावकार्याने आणून दिला. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link