Next
हसा हसवा
Vijay Kuvalekar
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

९०० चालतील
एकदा वसंतरावांच्या घरी रात्री दहा वाजता कोणीतरी टकटक केली. बाहेर एक सरदारजी होते. त्यांनी विचारलं,
“आम्ही इकडे पर्यटनाला आलो होतो. हॉटेल मिळत नाही. आम्हाला तुमच्या घरात रात्रभर थांबायला द्याल का?”
वसंतराव म्हणाले,
“हो चालेल. आमच्याकडे रूम आहे, पण १००० रुपये द्यावे लागतील.”
सरदारजीनं होकार दिला आणि रात्रभर तेथे राहिले. सकाळी ते निघाले तेव्हा वसंतरावांना थँक्यू म्हणाले आणि त्यांनी पाचशेची एक तसेच २०० च्या दोन नोटा काढून वसंतरावांना दिल्या. त्या ९०० रुपयांच्या नोटा पाहून वसंतराव जोरानं ओरडले,
“हजार रुपये सांगितले होते तुम्हाला!”
आणि त्या ओरडण्याबरोबर त्यांना जाग आली. त्यांनी इकडेतिकडे पाहिले. सरदारजी तर नव्हताच. आजूबाजूला कोणीच नव्हतं. हे स्वप्न होतं. मग त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले,
“ठीक आहे, ठीक आहे... ९०० तर ९०० द्या.”


खड्डा!
सोसायटीचे अध्यक्ष बाहेरून सोसायटीच्या कंपाउंडमध्ये घुसले तेव्हा विकी एका कोपऱ्यात खड्डा खणत होता.
त्यांनी विकीला विचारलं,
“का रे बाबा, का करतोयस?”
विकी म्हणाला,
“माझा गोल्डफिश मेला त्याला पुरायला खड्डा खणत आहे.”
अध्यक्ष म्हणाले,
“मग एवढा मोठा खड्डा कशाला?”
त्यावर विकी म्हणाला,
“तो तुमच्या मांजराच्या पोटात आहे ना, म्हणून...”


भ्रष्टाचार
राम नगरकर यांनी त्यांच्या ‘रामनगरी’ कार्यक्रमात सांगितलेला हा किस्सा.
राम नगरकर हे नाभिक समाजाचे होते. त्यांनी म्हटलं आहे, नाभिक म्हणजे बारा बलुतेदारांपैकी एक. कोणीही काही चूक केली, की लोक आम्हाला मध्ये आणणार. म्हणजे शिंप्यानं समजा कपडे नीट शिवले नाहीत. तर लोक त्याला विचारणार, काय रे नीट काम करता येत नाही का? हजाम आहेस काय?
एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्या धंद्यामध्ये भ्रष्टाचार आहे, पण आमच्या न्हाव्याच्या धंद्यामध्ये भ्रष्टाचार नाही. अहो कसा असणार, मागे पुढे आरसे असतात ना!

वेळ नाही

एकदा सलीमकडे त्याचे शेजारचे काका सुलेमान पत्र लिहायला आले. सलीमनं विचारले,
“कोणाला लिहायचं पत्र?”
सुलेमान काका म्हणाले,
“माझा मावसभाऊ राहतो बगदादला त्याला.”
“सॉरी, मला बगदादला जाता येणार नाही”, सलीम म्हणाला.
“तुला बगदादला कोण जायला सांगतं? मी तर तुला फक्त पत्र लिहायला सांगतोय”, काका म्हणाले.
त्यावर सलीम म्हणाला,
“ते मला माहीत आहे, परंतु माझं हस्ताक्षर इतकं भारी आहे, की मी जर पत्र लिहिलं तर ते वाचून दाखवायला मलाच जावं लागेल बगदादला...”


कामाचं ओझं

ब्रिटिश संसदेमध्ये घडलेला हा किस्सा. फार वर्षांपूर्वी कधीतरी वाचनात आलेला. सत्ताधारी पक्षाच्या एका मंत्र्याकडे पाच खात्यांचा कारभार होता. दुसऱ्या एका मंत्री होऊ इच्छिणाऱ्या खासदारानं त्यांचं अपार कौतुक केलं आणि म्हणाला,
“आमचे सहकारी मंत्री यांच्याकडे पाच खात्यांचा कारभार असल्यामुळे दिवस-रात्र ते कामात असतात. अलीकडच्या काळात मित्र म्हणून आम्हाला भेट मिळणंही मुश्कील झालं आहे.”
त्यांच्या या बोलण्यावर मंत्रिमहोदय म्हणाले, “सभागृहात किमान एका माणसाला तरी माझ्या कामाची किंमत आहे...”
त्यावर ते मंत्री होऊ पाहणारे खासदार म्हणाले,
“आणि मित्र म्हणून मी त्यांचं काही ओझं आपल्या खांद्यावर घेऊ इच्छितो. त्यांची हरकत नसल्यास त्यांनी एक-दोन खाती खुशाल माझ्यावर सोपवावीत.”

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link