Next
विहारीची मुक्त भरारी
अमित मधुकर डोंगरे
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


कसोटीस्तरावर भारतीय संघाला पाचव्या क्रमांकावर एका तंत्रशुद्ध, आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजाची अत्यंत निकड होती आणि ती हनुमा विहारीने भरून काढली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विहारीची संघात निवड झाली आणि त्याने निवडसमिती, प्रशिक्षक रवी शास्त्री तसेच कर्णधार विराट कोहली यांचा विश्वास सार्थ ठरवला.
पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ३२, तर दुसऱ्या डावात ९३ धावांची खेळी केली होती. त्याचे शतक थोडक्यात हुकले मात्र त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीची कौतुकास्पद चर्चा क्रिकेटविश्वात चांगलीच रंगली. याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संघाची स्थिती बिकट असताना त्याने दिमाखदार शतकी खेळी करून आपली गुणवत्ता सिद्ध केली. अर्थात त्याच्याइतकेच कौतुक इशांत शर्माचेदेखील करायला हवे, कारण त्यानेही वेस्ट इंडिजचा अचूक मारा लीलया परतावून लावताना कसोटीतील पहिले अर्धशतक फटकावले व विहारीला चांगली साथ देत टीम इंडियाला वर्चस्व मिळवून दिले. विहारीने या सामन्याद्वारे कसोटी क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक साकार केले. इतकेच नव्हे तर त्याने दुसऱ्या डावात पुन्हा शानदार फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली व संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवणारा विहारी या मालिकेत अत्यंत आश्वासक वाटला. त्याच्या खेळात असेच सातत्य राहिले तर भारतीय संघाची फलंदाजी आणखी भक्कम होईल.
या दोन्ही कसोटींत विहारीचा खेळ, त्याचे तंत्र, खेळपट्टीवर टिच्चून उभे राहण्याचा संयम खरोखरीच वखाणण्यासारखा होता. आजवर भारतीय संघाने अनेक फलंदाजांना संधी देऊन पाचव्या क्रमांकावर खेळवले, मात्र जे सातत्य विहारीने दाखवले ते अन्य कोणालाही जमलेले नाही. दोन्ही कसोटींतील त्याच्या खेळीतून त्याच्याकडील प्रचंड गुणवत्तेचे दर्शन घडते.
हनुमाने २०१८ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघात पदार्पण केले होते. या सामन्यात विहारीने उपयुक्त अर्धशतकी खेळी केली होती, तसेच ऑफ स्पीन गोलंदाजी करताना इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज अलिस्टर कूक याला बाद करत इंग्लंडच्या डावाला सुरुंग लावला होता. विहारीची कारकीर्द आता कुठे सुरू झाली असून त्याने आजवर केवळ सहा कसोटी खेळल्या असल्या तरी त्यात त्याने जवळपास ४५च्या सरासरीने तीन अर्धशतके व एका शतकाच्या मदतीने साडेचारशे धावा केल्या आहेत. रणजीसारख्या प्रथम दर्जाच्या ७४ सामन्यांत त्याने सहा हजारांपेक्षा जास्त धावा करताना १८ शतके व २९ अर्धशतके फटकावली आहेत. २०१८ साली त्याने आपला सर्वोत्तम खेळ केला. रणजीस्पर्धेत आंध्र प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करताना एकाच मोसमात साडेसातशे धावा त्याने कुटल्या. याच मोसमात आंध्र प्रदेशकडून खेळताना ओडिशाविरुद्धच्या सामन्यात त्याने वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवताना त्रिशतकी खेळी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याची इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती.
विद्यमान निवडसमितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांच्यानंतर जवळपास १९ वर्षांनी विहारीच्या रूपाने आंध्र प्रदेशच्या खेळाडूची भारतीय संघात निवड झाली. सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल संघाकडून तो आयपीएलमध्ये चमकला होता. हैदराबादकडून खेळताना एका सामन्यात गोलंदाजीत चमक दाखवताना त्याने ख्रिस गेलचा बळी मिळवला होता. २०१२ साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडकविजेत्या भारतीय संघात विहारीचा समावेश होता आणि त्याने या स्पर्धेत अत्यंत चांगली कामगिरी केली होती.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाल्यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्यातील गुणवत्ता हेरून त्याला अंतिम संघात स्थान दिले. मिळालेल्या या संधीचे विहारीने सोने केले आहे. भारतीय संघाला मधल्या फळीत अशाच फलंदाजाची वाटणारी उणीव विहारीने भरून काढली आहे. त्याच्या खेळात तंत्रशुद्धता असली तरीही मूळ खेळ आक्रमक असल्याने भविष्यात त्याला एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांत स्थान मिळेल असा विश्वास वाटतो. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना वगळता के.एल. राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा यांच्यापेक्षाही जास्त सातत्य विहारीने दाखवले आहे. त्याच्या जिगरबाज वृत्तीचे, तंत्राचे जसे कौतुक झाले तितकीच आता त्याच्यावर सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची जबाबदारी आली आहे. भारतीय संघात मिळालेले स्थान टिकवायचे असेल, तर त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहायला लागणार आहे. अफाट गुणवत्ता असूनही ज्या कसोटीस्तरावर रोहित शर्मासारखा फलंदाज फारसा यशस्वी होऊ शकला नाही, तेथे विहारीला कसोटीला उतरायचे आहे. त्याची कामगिरी आणि सकारात्मक मानसिकताच त्याला संघातील स्थान कायम राखण्यासाठी ऊर्जा देईल. वेस्ट इंडिज दौरा ही तर सुरुवात आहे. त्याच्या यशाचा आलेख असाच उंचावत राहील आणि तो संघाचा अविभाज्य घटक बनलेला भविष्यात पाहायला मिळेल, असा विश्वास वाटतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link