Next
आमची दिवाळी
श्वेता प्रधान
Friday, November 02 | 04:00 PM
15 0 0
Share this story


हास्याचा फराळ

भरत जाधव आणि ऋजुता देशमुख यंदा ‘वन्स मोअर’ नाटकाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करताहेत. हाताबाहेर गेलेल्या लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘एकच मूल’ हा  फतवा निघाल्यानंतर घरात फुटणारे संभ्रमाचे फटाके, कलाकारांच्या खुसखुशीत अभिनयाचा फराळ असा थाट या नाटकात आहे.
‘मनोरंजन आणि संदेश या दोन्ही माध्यमांतून आमचं नाटक सरप्राइज देण्याचं काम करतं,’ असं ऋजुता सांगते.

नटूनथटून आलेल्या प्रेक्षकांनी रंगीबेरंगी झालेलं प्रेक्षागृह ही दिवाळीच्या प्रयोगांची खासियत. दिवाळीत प्रेक्षक कलाकारांसाठी आवर्जून फराळाचे डबे घेऊन येतात. ‘घरी केलाय फराळ, कोणाला देऊ नका हं,’ अशी प्रेमळ सूचनाही करतात. दिवाळीतल्या प्रयोगांचा आनंद वेगळाच! भरत म्हणतो, “आमचं ‘वन्स मोअर’ हे नाटक म्हणजे दिवाळीची आतषबाजी आहे. प्रेक्षकांत हास्याचे बॉम्ब फुटायला लागले, की झाली आमची दिवाळी साजरी!”       
यशाची दिवाळी

“दिवाळीत भेटीच्या रूपात मिठाई द्यायला कोणी विसरलं, तर मी चक्क आठवण करून डबा पाठवून द्यायला सांगते. दिवाळीला गोड मिळालं नाही, तर मलाच अस्वस्थ वाटतं,” तृप्ती तोरडमल सांगते. दिवाळीत फराळ हेच तिचं जेवण. 

फुलांची रांगोळी, दिव्यांची रोशणाई, बेसनाचे लाडू, पूजेच्या प्रसादाची पुरणपोळी करण्यापर्यंत सगळं ती स्वतः  करते.
तृप्ती म्हणाली, “आमच्या घरी लक्ष्मीपूजनाचा थाट अगदी पारंपरिक... बाहेरगावी असेन तरी मुहूर्त बघून आई ‘स्काइप’वर आरती करायला लावायची. गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनात ‘सविता दामोदर परांजपे’चं स्क्रिप्ट ठेवून मी आशीर्वाद घेतला होता. देवीनं प्रार्थना ऐकली.” यंदाच्या दिवाळीत कृतज्ञता व्यक्त करून ‘सविता दामोदर परांजपे’च्या यशाचा आनंद साजरा करण्यात तृप्ती पार गढून गेली आहे.

सोयराबाईसाहेब!

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या झी मराठीवरील मालिकेनं अल्पावधीतच प्रशंसा आणि लोकप्रियता मिळवली आहे. कलाकारांच्या जिवंत अभिनयाचं कौतुक तर सर्वत्र होत आहे. मालिकेत सोयराबाईसाहेब साकारणारी स्नेहलता तावडे-वसईकर हिच्या नकारात्मक छटा असणाऱ्या भूमिकेलाही प्रेक्षकांची वाहवा मिळतेय. स्नेहलतानं हा आनंद ‘झी मराठी दिशा’च्या दिवाळीसोहळ्यासह साजरा केला.

ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्तिरेखा तिनं यापूर्वी कधी साकारली नव्हती. खरं तर, ऑडिशनच्या यादीत मोठी-मोठी नावं होती, पण निवड झाली स्नेहलताची. त्यानंतर सुरू झाला व्यक्तिरेखेचा अभ्यास. स्नेहलता सांगते, “सेटवर आमचं चार दिवसांचं वर्कशॉप होतं. त्यात मला व्यक्तिरेखेची सर्वांगीण माहिती देण्यात आली, संवाद कसे बोलायचे तेही शिकवलं. सोयराबाई साकारायच्या म्हणजे वजनदार दागदागिन्यांची सवय व्हायला हवी. त्यासाठी माझ्या हातांत रेती भरलेले वेलक्रोचे हॅन्डकफ्स आणि पायांत अँकल वेट्स बांधून ठेवले जात. त्यांचं वजन प्रत्येकी अर्धा-एक किलो होतं. सुरुवातीला हात-पाय भरून यायचे, हालचाल करायला गेलं की थरथरायचे. हळूहळू सवय झाली. ते करून घेतलं म्हणून पुढे शूटिंगमध्ये हातात तोडे-कडे-पाटल्या-बांगड्या आणि पायांत एकेक किलो वजनाचे पैंजण घालून सहज वावरू शकले. शूटिंगच्या वेळेस तासन् तास ताठ बसता यावं, यासाठी वर्कशॉपमध्ये पाठ नसलेल्या सोफ्यावर आम्हाला सलग दोन-तीन तास बसायला लावलं होतं. पहिल्या दिवशी पाठीला प्रचंड त्रास झाला. परंतु हे सगळं अंगवळणी पडलं. आता या वेशभूषेत सहज वावरता येतं.” सोयराबाईसाहेब साकारताना कलाकाराची मानसिकता आणि मुद्राभिनय दोन्ही महत्त्वाचं. सुरुवातीला स्नेहलता संवादांचा विचार स्वतःच्या पद्धतीनं करत असे. मग दिग्दर्शकांनी तिला समजावलं, की अमुक शब्दांचा अर्थ सोयराबाईसाहेबांनी जसा घेतला असेल, तसं व्यक्त व्हायला सुरुवात कर. स्नेहलता म्हणते, “सोयराबाई प्रभावी रंगवायच्या असतील, तर ‘तुझ्यासमोर दुसरं कोणीच चांगलं नाही!’ या विचारानं वागायला हवं हे मी लक्षात घेतलं.”

सोयराबाईसाहेबांच्या नकारात्मक छटेमागचं मातृत्व प्रेक्षकांना दिसतंय याबद्दल स्नेहलता समाधानी आहे. प्रत्यक्षातली स्नेहलता या सगळ्यांहून वेगळी आणि साधी आहे. अगदी दिवाळी साजरी करण्याचे तिचे विचारही साधे आहेत. ‘एक पणती दिवाळी’ ही स्नेहलताची संकल्पना. दिवाळीला ती एकच पणती लावते. रोशणाईसुद्धा ती शक्यतो टाळते. तिची या वर्षीची दिवाळी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतल्या सोयराबाईसाहेबांच्या भूमिकेला मिळत असलेल्या पसंतीमुळे आधीच उजळली आहे.

स्नेहलता म्हणाली, “माझ्या मुलीचा - शौर्याचा - वाढदिवस २ नोव्हेंबरला असतो. त्या निमित्तानं रिटर्न गिफ्ट म्हणून सर्वांना उटणं देण्याचा माझा बेत आहे. शौर्याला रांगोळीची आवड असल्यानं संस्कारभारतीसारख्या रांगोळी शिबिरांना तिला घेऊन जाण्याचाही  विचार चाललाय. जमलंच तर, किल्ले कसे बनवतात हे शिकवणाऱ्या कार्यशाळांमध्येही तिला नेणार आहे.”

मुलीच्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणी दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिच्या घरी येतात. फराळ खाऊन कंटाळलेल्या मुलींना स्नेहलतामावशीच्या हातचे नारळाचे लाडू खायची अतिशय उत्सुकता असते. भाऊबीजेलाही स्नेहलता घरून मिठाई बनवून घेऊन जाते. साधी असली तरी तिची दिवाळी आपलेपणा आणि आनंदानं संपन्न असते, हे महत्त्वाचं.

फटाके नकोच!

करंजी, शंकरपाळे आणि चिवडा या तीन पदार्थांसाठी पुष्कर जोग दिवाळीची आतुरतेनं वाट बघत असतो. पुण्याला जाऊन आईसोबत दिवाळी साजरी करण्याचा नेमही तो चुकवत नाही.

“फटाक्यांचं मला वेड नाही. प्रदूषण वाढतं, प्राण्यांनाही त्रास होतो, त्यामुळे फटाक्यांपासून शक्यतो लांबच राहतो,” असं पुष्कर म्हणाला.
यंदा त्याच्या मुलीची - फेलिशाची - ही पहिलीच दिवाळी. त्यामुळे पुष्करला तिच्यासाठी पहिली अविस्मरणीय दिवाळीभेट घ्यायची आहे.

आणखी एका कारणानं हा सण त्याच्यासाठी खास आहे. ‘ती आणि ती’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. दिवाळीलगत ‘ती आणि ती’चा ट्रेलर येईल. चित्रपटाचं ८० टक्के चित्रीकरण लंडनला झालंय. “मराठीत धर्मा किंवा यशराज फिल्म्ससारखा चित्रपट करावा, अशी इच्छा होती. ‘ती आणि ती’सारखा रॉमकॉम सादर करून अडीच तास प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करावं, हाच आमचा उद्देश आहे,’ पुष्करनं सांगितलं.    


फराळ आणि खरेदी

‘तुला चकल्या जास्त आवडतात तर तूच कर,’ असं म्हणत दर दिवाळीला चकलीचा साचा नीलेशच्या हातात येतो. “नीलेशच्या चकल्या खुसखुशीत आणि खूप चविष्ट असतात,” असं सर्टिफिकेट स्वतः त्याच्या बायकोनं - गौरीनं दिलंय. गौरीच्या हातची साजूक तुपातली करंजी आणि सुरेख रांगोळी नीलेशच्या खास पसंतीची!
साबळे कुटुंबीयांची दिवाळी पुण्यात साजरी होते. हे कुटुंब खरेदी करायला एकत्र निघतं आणि लक्ष्मीरोडच्या तोंडाशी पुरुष एकीकडे आणि स्त्रिया दुसरीकडे अशी विभागणी होते. जेणेकरून आपापल्या पसंतीची खरेदी होतेच, शिवाय एकमेकांसाठी सरप्राइज भेटवस्तू विकत घेता येतात.

नीलेशनं सांगितलं, “दिवाळी म्हटली, की आमच्याकडे कपड्यांची खरेदी महत्त्वाची. लहानपणी वडील माझ्यासाठी कपडे घ्यायचे; मोठं झाल्यावर मी त्यांच्यासाठी घ्यायला लागलो. मोठं होण्याचं सुख यातच असतं, नाही का?”

नात्यांचा गोडवा, उत्साहाची रोशणाई आणि पारंपरिक ठेवा जपत साबळे कुटुंबीयांची दिवाळी साजरी होते.

(संकल्पना,संयोजन आणि शब्दांकन : श्वेता प्रधान
फोटोग्राफर : कौस्तुभ दहिभाते)

  
  

                    

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link