Next
आदिवासी भागात स्टार्टअपची भरारी
प्रशांत परदेशी
Friday, June 07 | 03:00 PM
15 0 0
Share this story


हर्षल विभांडीक हे पस्तिशीतले तरुण इन्व्हेस्टर बँकर आहे. अनेक वर्षे अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर २०१५ मध्ये ते त्यांची जन्मभूमी असलेल्या धुळे शहरात परतले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे काम सुरू केले होते. या संकल्पनेतून प्रेरणा घेत, हर्षल यांनी आपल्याकडील जमा पुंजीतून धुळे जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या काही शाळा डिजिटल करण्याचे काम हाती घेतले. हे काम हाती घेताना हातात आहे त्या पैशांतून जितक्या शाळा डिजिटल होतील तितक्याच करण्याचा निर्धार हर्षल यांनी केला होता. प्रत्यक्षात अमेरिकेतील काही मित्रांच्या मदतीने त्यांनी आणखी काही शाळा डिजिटल केल्या. हे पाहून ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतः पुढे येऊ लागले. हर्षल यांनी पालकांची तळमळ ओळखली आणि लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी केला. आज जिल्ह्यातील सर्व म्हणजे ११०३ शाळा डिजिटल झाल्या आहेत आणि त्यातील अनेक शाळा या आता वीजजोडणीमुक्त झाल्या आहेत. हर्षल यांनी जवळजवळ १०० शाळा ‘सौरशाळा’ केल्या आहेत. हे डिजिटल शाळांचे मॉडेल आता देशात प्रमाण म्हणून पाहिले जात आहे.

धुळे जिल्ह्यातील शाळा डिजिटल करत असताना हर्षल यांना अनेक पालक येऊन भेटत होते. अमेरिका सोडून हा पोरगा धुळ्यात एवढे मोठे काम उभे करतो, याचे आश्चर्य सर्व पालकांना तर होतेच, सोबत स्वतःच्या पाल्याची चिंता त्यांना हर्षलकडे ओढून नेत होती. माझ्या मुलासाठी काही काम पाहा... माझ्या मुलाला अमेरिकेत जॉब मिळवून द्या... तुमच्या कंपनीत माझ्या मुलाला कामावर घ्या... अशा अनेक आशाअपेक्षा पालकांकडून हर्षल यांच्याकडे व्यक्त केल्या जात होत्या. हर्षल यांनी या बेरोजगारीचा सूक्ष्म अभ्यास केला. भारतातील गुणवंतांचा अमेरिकेत जाण्याचा ओढा आणि पालकांची चिंता याचा समन्वय साधण्याचा संकल्प त्यांनी केला आणि त्यातून आपल्या जिल्ह्यातील तरुण उद्योजकांना उद्योगउभारणीसाठी बळ त्याने दिले.

जिल्ह्यातील प्रमुख अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय महाविद्यालयांना हर्षल यांनी भेटी दिल्या. या भेटींमध्ये यांनी तरुण-तरुणींना नावीन्यपूर्ण उद्योग-व्यवसायाच्या कल्पना सुचवण्याचे आवाहन केले. ज्या उद्योगकल्पना सचोटीवर खऱ्या उतरतील त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन हर्षल यांनी या भेटींत दिले. पहिल्याच टप्प्यात तरुणांचा या संकल्पनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ३० पेक्षा अधिक स्टार्टअपच्या संकल्पना समोर आल्या. यांपैकी पाच संकल्पना जून महिन्यात प्रत्यक्षात साकारत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या स्टार्टअपच्या शुभारंभासाठी धुळ्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील ज्या पाच स्टार्टअप संकल्पना या व्यवहाराच्या सचोटीवर खऱ्या उतरणार आहेत, त्यांच्यासाठी हर्षल यांनी या तरुणांना गुंतवणूकदार शोधून दिले आहेत. तरुणांकडून समोर आलेल्या संकल्पना या गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या आहेत का, आणि बाजारपेठेत त्या यशस्वी होतील का, याची खात्री करण्याचे काम इन्व्हेस्टर बँकर म्हणून हर्षल यांनी केले आहे. विशेष म्हणजे गुंतवणूकदारासोबत या तरुणांच्या संकल्पना सादर करण्यासाठी हर्षल यांची व्यासपीठ मिळवून दिले असून, दोन उद्योगांना तर धुळ्यातील प्रसिद्ध उद्योजक विनोद मित्तल हेच अर्थपुरवठा करणार आहेत.

जिल्ह्यात हे पाच स्टार्टअप सुरू झाले तर आदिवासी भागासाठी रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे या पाचपैकी एक स्टार्टअप धुळ्यातल्या स्थानिक व्यापाऱ्यांना ऑनलाइनच्या स्पर्धेत नेण्यास मदत करणार आहे.

व्यवसायाची संकल्पना आहे मात्र आर्थिक पाठबळ नाही म्हणून बँकांचे उंबरठे झिजवणाऱ्या तरुणांसाठी आणि गुणवत्तेला न्याय मिळत नाही म्हणून अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्या तरुणांसाठी धुळ्यात सुरू होणारे स्टार्टअप एक उत्तम संधी आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link