Next
निसर्ग-नवलाईतील विज्ञान!
- कविता भालेराव
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

माझ्या मित्र-मैत्रिणींनो,
‘नवल’ या सदरातून तुमच्याशी निसर्गातील नानाविध, आश्चर्यकारक झाड-झुडपं, पशु-पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव यांच्याविषयी संवाद साधताना वर्ष कसं संपलं याचीच आता मला गंमत वाटतेय! ‘झी मराठी दिशा’ या नव्या तजेल्याच्या आठवडापत्रानं दिलेल्या संधीमुळे जीवसृष्टीतील काही गुपितांचा वैज्ञानिकदृष्ट्या केलेला उलगडा सांगता आला, याचा मला खूप आनंद वाटत आहे.
दोस्तांनो, खरोखरच आपल्या सभोवतालची सृष्टी अगदी विलक्षण व अद्भुत अशा लहान-मोठ्या जिवाणूंनी अगदी परिपूर्ण आहे. या सजीवसृष्टीत केवढी विस्मयकारक विविधता आहे, ही गोष्ट ‘नवल’चा प्रत्येक लेख वाचताना तुम्हाला जाणवली असेल. या लेखनातून फारसे परिचित नसलेले परंतु निसर्गसाखळीत अत्यंत महत्त्वाचे व आपल्या राहत्या जागेला अनुरूप अशा नवलपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी अनोखी कामगिरी बजावणारे प्राणी-वनस्पती मी निवडले होते. अर्थात ही निवड करताना, खरं सांगू, मी फार गडबडून जात होते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यातील असाधारण, वैशिष्ट्यपूर्ण विविधता! त्यामुळेच कोणाला निवडावं आणि कोणाला वगळावं हा मोठा बिकट प्रश्न माझ्यापुढे असे.
निसर्गानं या प्राणी-वनस्पतींमध्ये एवढी विविधता का बरं ठेवली असेल? -या प्रश्नाचं उत्तर मिळवताना त्यांच्यातील अद्भुत वैशिष्ट्यांची व त्यानुसार त्यांच्या वर्तणुकीची माहिती तर तुमच्यासाठी द्यायची होतीच, शिवाय या अनुरूप देणग्यांमागील समयोचित विज्ञानही तुमच्यापुढे उलगडायचं होतं. अशी माहिती देण्याचा माझा हेतू स्पष्ट होता. केवळ एखाद्या प्राणी किंवा वनस्पतीचं रंगरूप पाहून त्याला ‘अरे वा!’, ‘किती मस्त!’, ‘किती छान!’ एवढंच म्हणून थांबू नये तर तो असा का, यासारख्या प्रश्नांची उत्तरं, त्यामागील कार्यकारणभाव किंवा निसर्गाची योजना समजून घ्यावी. निसर्गसृष्टीकडे केवळ कुतूहलानं, वरवर न बघता, वैज्ञानिक दृष्टीनं पाहायची प्रेरणा त्यातून तुम्हाला द्यायची होती.
आजच्या भाषेत बोलायचं तर प्रत्येक सजीवात निसर्गानंच एक ‘चिप’ घालून ठेवली आहे. त्यात निसर्गानंच ‘सेव्ह’ करून त्याच्यापुरतं जीवन जगण्याची एक पद्धती दिली आहे. त्यानुसार हे सर्व जीव जगतात, असं म्हणता येईल. शिवाय आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची किमयाही ते साधतात.
स्वत:चं संरक्षण करून घेण्याची उपजत कला या सर्वांमध्ये आहे. त्याद्वारे ते संभाव्य संकटांपासून आपला बचाव तर करतातच, शिवाय पृथ्वीतलावरील सततच्या बदलत्या वातावरणातही आपलं अस्तित्व मोठ्या मेहनतीनं आणि कौशल्यानं टिकवून ठेवातात. म्हणूनच छोट्या-मोठ्या अडचणींना संकटांना वळसा घालत, पुढे कसं जायचं, हे शिकावं तर या जीवसृष्टीकडूनच! त्यासाठीच तिचं अंतरंग, तिच्यातल्या विज्ञानासकट सांगायचा मी हा छोटासा प्रयत्न केला. तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link