Next
खादी वर्दीतील शांतिदूत!
शुभदा चौकर
Friday, March 08 | 12:36 PM
15 0 0
Share this story


किरकोळ शरीरयष्टी. चेहऱ्यावर नम्रता. बोलण्यात मार्दव. एकंदर व्यक्तिमत्त्व ऋजू. खाकी वर्दीतील पोलिसांची जी प्रतिमा मनात ठसलेली असते, त्याला छेद देणारे व्यक्तिमत्त्व असलेल्या धनश्री करमरकर! महाराष्ट्र  पोलिसदलात इन्स्पेक्टर असलेल्या धनश्री सध्या पोलिस मुख्यालयात आहेत. महामुंबईच्या उत्तर टोकाला असलेल्या बोरीवलीत सुस्थित घरात वाढलेल्या धनश्री दक्षिण सुदानच्या सुपीक भूमीवर आधुनिक संस्कृतीची मशागत करण्याच्या मोहिमेवर जवळपास आठ वर्षे होत्या.

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे  संघर्षग्रस्त देशंमध्ये शांतिसेना पाठवण्यात येते, त्यात भारतीय पोलिसांची फळी कायम कार्यरत असते. या मोहिमेसाठी निवड होणे, हेच एक आव्हान असते. सुरक्षा, कायदा आदी विषयांचे ज्ञान, शारीरिक क्षमता, मनोबल, इंग्रजी भाषेवरील हुकमत, वाहनचालन, फायरिंग अशा विषयांवरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर धनश्री यांची निवड २००८ साली सुदान येथे जाण्यासाठी झाली.

सुदानमध्ये जुबा येथे रुजू झाल्यावर पहिली व्यवस्था करायची होती, स्वत:च्या निवाऱ्याची. तेथे होती कुडाची घरे. रस्तेच धड नाहीत. नुसता खडबडीत भूभाग! वीज तर नाहीच. धनश्री यांच्या १० जणांच्या गटाचे भाग्य म्हणून त्यांना एक बांधीव घर मिळाले खरे, परंतु त्या घरात होत्या फक्त भिंती, ना ओटा, ना पलंग  वा इतर गृहोपयोगी वस्तू. मग त्यांनी लोखंडी बाजा आणल्या, लाकडाचे ठोकळे एकमेकांवर रचून ओटा तयार केला. घर पाहावे बांधून, हा अनुभव पुरेपूर मिळाला. शांतिसेनेत काम करण्यापूर्वीच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना खडबडीत भूमीवर वाहन चालवायला शिकवले गेले होते. तेव्हा वाटले होते, कशाला देताहेत इतके खडतर प्रशिक्षण? ...प्रत्यक्षात तेच कामी आले!

सुदानमध्ये फिरताना धनश्री यांच्या संवेदनशील मनाला जाणवले, की युद्धाचे परिणाम किती भीषण असतात! युद्धामुळे मानवी जीवनाची किती दैना होऊ शकते! विकासाचे चाक थबकतेच जणू! अशा होरपळलेल्या समाजाला वर काढणे किती दुरापास्त असते! ...या भावनांनी त्यांच्या मनात जिद्द चेतवली.    
धनश्री यांच्या टीमला दक्षिण सुदानमधील १० राज्यांत फिरून तेथील पोलिसयंत्रणा कार्यरत करायची होती. खडकाळ रस्त्यांवरून गाडी चालवत जाताना दगडगोटे अंगावर उडायचे. मातीचे लोळ अंगावर यायचे. जरा पाऊस पडला की पूर्ण दलदलीतून गाडी हाकताना ताशी १० कि.मी.च्या वेगाने जाण्यावाचून गत्यंतर नसायचे. खाली उतरताच पाय चिखलात रुतायचे. अशात सतत फिरून पोलिसठाण्यांसाठी जागा हेरणे, पोलिसयंत्रणा सुरळीत करण्यासाठी बजेट आखणी, संगणकीय प्रणालीचा वापर करून व्यवस्था लावून देणे, अशी कामे सव्वा वर्षे करून धनश्री भारतात परतल्या.

२०१०मध्ये संयुक्त राष्ट्र विकासकार्यक्रमात (United Nations Development Programme)  काम करण्यासाठी परत बोलावणे आले, तेव्हा त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कामाची ही मोठी सुसंधी वाटली. कारण तेव्हा सुदानचे विलगीकरण होऊन दक्षिण सुदान हा स्वतंत्र देश निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होत होती. जनमताचा सार्वत्रिक कौल घेण्यात येणार होता. तेथील पोलिस म्हणजे माजी सैनिक होते. त्यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे त्यांना सतत  शस्त्र चालवण्याची सवय होती. मतदानात बहुसंख्य लोकांचा सहभाग असावा तर ती प्रक्रिया शांतपणे पार पडणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. लोकांना पोलिसांची ओळख पटावी, सुरक्षिततेची खात्री वाटावी, असे वातावरण तयार करायचे होते. स्थानिक जनता या प्रक्रियेत सामील व्हावी, यासाठी वस्ती पातळ्यांवर पोलीस व स्थनिक जनता यांचे गट केले गेले. धनश्री यांच्या टीमने जनतेशी सुसंवाद साधला. त्यांच्यात पोलीसांच्या सक्षमतेबाबत विश्वास निर्माण केला. अखेरीस शांततेत तसेच मुक्त व निर्भीड वातावरणात मतदान पार पडले. ९९ टक्के लोक मतदानात सहभागी झाले आणि ९९ टक्के लोकांनी स्वतंत्र दक्षिण सुदानच्या बाजूने कौल दिला.
एक स्वतंत्र देश घडताना पाहणे आणि तेथे प्राथमिक सुविधा निर्माण करण्यात आपला सहभाग असणे- ही सुसंधी धनश्री यांनी समर्पित भावनेने पेलली. त्यावेळी तब्बल साडेसहा वर्षे त्या दक्षिण सुदानमध्ये होत्या. या काळात त्यांच्या टीमचे मुख्य काम होते, तेथील पोलिस व न्याययंत्रणा यांची प्राथमिक घडी बसविणे. सततच्या नागरी युद्धामुळे तेथे परंपरागत कायद्यांचा अंमल मोठ्या प्रमाणावर आहे. तेथे लोकांना सुरक्षा व समानता देणारी नागरी कायदयांवर आधारित प्रभावी न्यायव्यवस्था प्रस्थापित करण्याचे अभ्यासपूर्ण काम करावे लागले. नागरीकरणाची नुकतीच सुरुवात झालेल्या जुबामध्ये सिग्नलयंत्रणा सुरू करताना लाल म्हणजे थांबा, ही संकल्पना रुजवतानाचा एक अनुभव धनश्री यांनी सांगितला- ‘तेथील सुरक्षारक्षकांच्या गाड्यांना लाल नेमप्लेट असते. त्यामुळे त्यांना वाटायचे की लाल सिग्नल लागला की आपण जायचे!’

समाजातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करणे, महिलांच्या शोषणमुक्तीसाठी व शांततामय जीवनाकरता समाजमन तयार करणे... अशी अनेक आव्हाने होती. आणि हे सर्व प्रेमाने संवाद साधत! कारण त्या समाजाला याचे महत्त्व पटले तर या यंत्रणा स्वीकारल्या जाणार होत्या. ‘कोण ही क्रांतिकारी बाई आपल्याला शिकवायला आलीये?’ या दृष्टिकोनापासून ते पुन्हा पुन्हा प्रशिक्षणाला यायला उत्सुक असलेल्यांशी हसत बोलणे आणि त्यांच्या घरगुती व सामाजिक समस्याही ऐकणे- असा हा विलक्षण बदल धनश्री यांनी अनुभवला. ठामपणे तरी नम्रपणे बोलून (तेही अरेबिकमधून) त्यांनी तेथील लोकांची मने जिंकली. गोखले शाळा आणि डहाणूकर कॉलेज अशा मराठमोळ्या वातावरणात शिकलेली धनश्री करमरकर तिथे अरेबिक भाषक आफ्रिकन समाजाला आपलीशी वाटली. अभिमानास्पद आहे ना हे!
दक्षिण सुदानी समाजाचे पुन:निर्माण करण्याचे स्वप्न बघणाऱ्या धनश्री यांच्या टीमने तेथे पुन्हा शून्यवत होणे म्हणजे काय असते, हाही अनुभव दोनदा घेतला. डिसेंबर २०१३ व २०१६ मध्ये या नवनिर्मित देशांत त्यांच्या जुन्या परंपरेला साजेशी  नागरी युद्धे झाली. त्यांत हजारो लोक मारले गेले. लाखो जण बेघर झाले. सारे काही बिघडून गेले.

आता आव्हान आणखी अवघड होते. या हताश समाजाला परत उमेद द्यायची होती. आपत्कालीन स्थिती हाताळणारे एक कॉल सेंटर उभारायचे काम धनश्री यांच्या टीमला दिले गेले- आपल्या १०० क्रमांकासारखे. त्यासाठी टेलिकॉमयंत्रणा आणि पोलिस यांना एकत्र करून व्यवस्था लावणे, प्रशिक्षण देणे हे काम तांत्रिक, धोरणात्मक व प्रशासकीय पातळीवर यशस्वी करून दाखवायचे होते. एखाद्या गर्भार महिलेने वैद्यकीय मदत मागितली तरी आपत्कालीन कॉल सेंटरने नाही न म्हणता तिला मदत करायची असते, हे त्यांच्या गळी उतरवायचे होते.

दक्षिण सुदानची तुरुंगयंत्रणा उभारताना धनश्री यांना स्वत:च्या कल्पना राबवता आल्या. तुरुंगातून उत्पादक कामे कशी होतील जेणेकरून तुरुंगाला स्वत:ची मिळकत होईल आणि तेथील रिकाम्या हातांना काम मिळेल, अशी योजना त्यांनी आखली. शिक्षण मंत्रालयाशी बोलून शालेय मुलांचे गणवेश शिवण्याचे, लाकडी बाके तयार करण्याचे काम कैद्यांना मिळवून दिले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्य व कृषी संस्थेच्या (FAO) सहकार्याने कैद्यांना शेतीचे काम दिले. जुबा येथील वास्तव्यात धनश्री यांनी स्वत:च्या परसात बाग फुलवली होती. त्या अनुभवाचा असाही फायदा झाला. तुरुंगातील व्यावसायिक प्रशिक्षणकेंद्राचे कुंपण त्यांनी चक्क तुळशीच्या रोपांनी शाकारले. तुळशीच्या मंजिऱ्यांचा रंग-गंध त्यांना टवटवीत करत असे आणि ताजे वारे तेथे खेळत असल्याची अनुभूती सर्वांनाच मिळत असे.
सुपीक देशांत मानवी संस्कृतीची मशागत करण्याचे असे अनेक तजेलदार अनुभव घेऊन धनश्री करमरकर जानेवारी २०१७ मध्ये मुंबईत परतल्या. आता त्या महाराष्ट्र पोलिसांच्या धोरण-आखणी विभागात आहेत. महाराष्ट्र पोलिसयंत्रणेत कोणत्या सुधारणा व्हाव्यात, सद्य क्षमतेत किती व कशी वाढ व्हावी, याचा अभ्यास त्या करत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी लग्न केले आहे. सुदानच्या शेजारी असलेल्या इथिओपिया या देशाचे नागरिक असलेल्या लालेम बरहानु डिंकू यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आहेत. तेही दक्षिण सुदानमध्ये UNDP च्या कामात होते. तत्त्वज्ञान आणि प्रशासन हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर दीर्घकाळ काम करत असलेल्या लालेम यांना भारताबद्दल अपार आदर आहे आणि भगवदगीतेबद्द्लही! धनश्री यांनी त्यांना दक्षिण सुदानमधील वास्तव्यात भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली व आवड रुजवली.

एम.कॉम., एल.एल.बी. पर्यंत शिकलेल्या धनश्री यांनी खरे तर सैन्यदलात जायचे स्वप्न पाहिले होते. परंतु बारीकशा शारीरिक त्रुटीमुळे त्यांना या संधीने हुलकावणी दिली, म्हणून त्या पोलिससेवेकडे वळल्या. अर्थशास्त्र, वाणिज्यशास्त्र आणि कायदा यांचे ज्ञान असल्याचा फायदा त्यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत काम करताना झाला होता. तेलगी स्टँप घोटाळा केसचा तडा लावताना त्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाबरोबर काम करायला मिळाले होते. तेलगी प्रकरणातील काही महत्त्वाचे दुवे हेरून देण्यात त्यांचा वाटा होता. २००५-०६ दरम्यान क्रेडिट कार्ड घोटाळे वाढले होते. अनेक ग्राहकांना त्याचा फटका बसला होता. एकाचे क्रेडिट कार्ड कुणी भामटा वापरतोय आणि पैसे काढतोय, हे प्रकार वाढले होते. अशा टोळ्यांना जेरबंद करण्याचे काम करता करता एकंदर ही सारी यंत्रणा सुधारणे आवश्यक ठरले. आता क्रेडिट कार्डच्या मालकाला मोठे व्यवहार घडताना फोनवर संदेश येतो. ही प्रतिबंधक यंत्रणा हे त्याचे फलित! ही यंत्रणा प्रत्यक्षात येण्यासाठी बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या यांना एकत्र आणून विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करण्याच्या टीममध्ये धनश्री करमरकर होत्या. 

धनश्री यांचे पहिले पोस्टिंग होते मुंबईतील वाकोला पोलिस स्टेशन येथे. तेथे होळीच्या वेळी फुगे फेकणाऱ्या मुलांच्या कारवायांना पायबंद घालणे असो वा  गणेशोत्सवाच्या काळात अन्य धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाऊन असुरक्षितता निर्माण होऊ नये म्हणून मंडळांना समाज देणे असो, धनश्री यांनी भर दिला तो सामान्य नागरिकांच्या सहभागाने समाज सुरक्षित करण्यावर... त्यांना सामाजिक पोलिसाची भूमिका निभावण्याचे आवाहन करण्यावर...
...आणि हीच सामाजिक जाणीव, समजूतदारपणा आणि सारासार विवेकबुद्धी वापरून काम करण्याचा खाक्या ही त्यांच्या खाकी वर्दीची वैशिष्ट्ये ठरली आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link