Next
माँ, तुझे सलाम
शर्मिला लोंढे
Friday, January 25 | 04:00 PM
15 0 0
Share this story‘मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हीरे मोती’, ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा’, ‘भारत हमको जान से प्यारा है’ अशी गाणी ऐकली की खरंच देशाबद्दल अभिमानानं मान उंचावते, देशभक्तीच्या भावनेनं नम्रपणे मस्तक खाली होतं व देशप्रेमानं ऊर भरून म्हणावंसं वाटतं, ‘नये दौर में लिखेंगे मिलकर नयी कहानी, हम हिंदुस्तानी!’ हे सगळं जाणिवेच्या पातळीवर ठीक आहे, पण या सगळ्या भावना क्षणभंगुर असतात. खरा सलाम करायला हवा, ‘माँ, तुझे सलाम’ म्हणणाऱ्या आणि जगणाऱ्या त्या सैन्यातील, नौदलातील, हवाई दलातील जवानांना, जे आपल्या या भावना जपण्यासाठी, आपलं व देशाचं संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र एक करतात.

प्रस्तुत लेखामध्ये आपण याच सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे आर्मी, नेव्ही, एअर फोर्सवर एक नजर टाकणार आहोत. या तिन्ही शाखांमध्ये अनेक पोटशाखा आहेत व प्रत्येक पोटशाखेसाठी लागणारी शारीरिक, मानसिक व शैक्षणिक आवश्यकता वेगळी आहे.

सैन्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी दहावीनंतर सोल्जर जनरल, १२वी विज्ञाननंतर सोल्जर नर्सिंग असिस्टंट, १२ वी सर्टिफिकेट व पदविका अभ्यासक्रमानंतर कॅटरिंग सर्व्हिस व पदवीनंतर आर्मी एज्युकेशन कोअर अशी नेमणूक होते. यात सोल्जर जनरलसाठी शारीरिक सक्षमता, धीटपणा, आत्मविश्वास, जिद्द व अनुरूप भावनिक नियोजन आवश्यक आहे. सोल्जर टेक्निकलसाठी तंत्रज्ञानाची माहिती व तंत्रक्षमता; सोल्जर क्लर्कसाठी कारकुनी व प्रशासकीय कामाची क्षमता व आवड; सोल्जर नर्सिंग असिस्टंटसाठी प्राथमिक उपचार व औषधोपचाराची मूलभूत माहिती, आस्था, दुसऱ्यांना मदत करायची आवड व मानसिकता असणं गरजेचं आहे. तसंच कॅटरिंग सर्व्हिससाठी कॅटरिंगशी निगडित माहिती, आवड व प्रशिक्षण आणि एज्युकेशन कोअरसाठी शिकवण्याची क्षमता व आवड अपेक्षित आहे.
सैन्याच्या शाखेमध्ये अनेक पोटशाखा आहेत.- इन्फन्ट्री, आर्टिलरी, आर्म्ड कोअर, इंजिनीयर, सिग्नल्स, आर्मी सर्व्हिस कोअर, इंटेलिजन्स कोअर, ऑर्डिनन्स कोअर, मेडिकल कोअर, एज्युकेशन कोअर, पोस्टल सर्व्हिसेस, मिलिटरी पोलिस, अॅडव्होकेट जनरल, व्हेटेरिनअरी कोअर. यातील आर्म्ड कोअर या पोटशाखेचा युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढण्याचा संबंध येतो. इंजिनीयर बांधकाम, मेंटेनन्स, दुरुस्तीची कामं करतात, सिग्नलवाले संचार व संप्रेषण यंत्रणा सांभाळतात, सर्व्हिस कोअर दळणवळण व साठवणीचं काम करतात, इंटेलिजन्स कोअर माहिती गोळा करून तिचं विश्लेषण व इंटरप्रिटेशन करण्याची बौद्धिक भूमिका बजावतात. ऑर्डिनन्स कोअर यंत्र सामुग्रीचा मेंटेनन्स बघतात. एज्युकेशन कोअर हत्यारांच्या वापराचं व नवनवीन कौशल्याचं प्रशिक्षण देतात. पोस्टल सर्व्हिसेस मनिऑर्डर, पत्रं, मेलचा व्यवहार सांभाळतात, मिलिटरी पोलिस शिस्त व अनुशासन प्रस्थापित करतात, जज-सिव्हिल केसेसचा निकाल लावतात तर व्हेटेरिनअरी सेनादलातील घोडे, कुत्रे या प्राणिमात्रांची काळजी घेतात. या कामांच्या वर्णनावरून त्यांना लागणारे शिक्षण, माहिती व क्षमता उघडच आहेत.

नौदलाच्या शाखेमध्ये तीन मुख्य पोटशाखा आहेत- एक्झिक्युटिव्ह, इंजिनीयरिंग व इलेक्ट्रिकल. एक्झिक्युटिव्ह म्हणजे ज्याचा संबंध प्रत्यक्ष युद्ध यंत्रणा चालवण्याशी आहे. यात गनरी, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन, एव्हिएशन, हायड्रोग्राफी, डायव्हिंग इत्यादीचा समावेश आहे. इंजिनीयरिंगचा संबंध यंत्रांचे कार्य व निगराणीशी आहे. इलेक्ट्रिकलचा संबंध संचार, संप्रेषण, दळणवळण व यंत्रसामग्रींशी आहे. या तीन पोटशाखांचा तंत्रज्ञानाशी परस्परसंबंध आहे. या पोटशाखांना साहाय्य करणाऱ्या नॉन-टेक्निकल पोटशाखा म्हणजे लॉजिस्टिक, मेडिकल, एज्युकेशन इत्यादी. नौदलाचे तीन खांब सरफेस, सबमरिन व एव्हिएशन.

हवाई दलाच्या तीन शाखा असतात- फ्लाइंग, टेक्निकल व ग्राउंड ड्युटी. फ्लाइंगमध्ये तीन प्रकार आहेत- फायटर, ट्रान्सपोर्ट व हेलिकॉप्टर. टेक्निकलमध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश आहे. ग्राउंड ड्युटीमध्ये प्रशासन, अकाउंट्स, लॉजिस्टिक, एज्युकेशन अशा पोटशाखा सामावलेल्या आहेत.

सेनादल, नौदल, हवाई दलासाठी १२ वीनंतर एनडीए ही प्रवेशपरीक्षा असते. सेनादलासाठीची ही परीक्षा विज्ञान, वाणिज्य व कला अशा सर्व शाखांसाठी खुली आहे. मात्र या शिक्षणामध्ये गणित हा विषय असणं क्रमप्राप्त आहे. नौदल व हवाई दलासाठी ही परीक्षा फक्त विज्ञानशाखेसाठीच खुली आहे. नौदलासाठी पदवीनंतर इंडियन नेव्ही एन्ट्रन्स एक्झाम ही प्रवेशपरीक्षा आहे, तर हवाई दलासाठी एनसीसीद्वारे (नॅशनल कॅडेड कोअर) पुरुषांना व स्त्रियांना प्रवेश मिळू शकतो. हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रॅन्चमध्ये एनडीए व एएफसीएटीद्वारे भरती होते. युपीएससीच्या (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) माध्यमातून सीडीएसई (कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन) आयोजित केली जाते. या प्रवेशपरीक्षेद्वारे पदवीनंतर इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमध्ये, अभियांत्रिकी शिक्षणानंतर इंडियन नेव्हल अॅकॅडमीमध्ये व अभियांत्रिकी किंवा गणित व भौतिकशास्त्र विषयात पदवीनंतर इंडियन एअर फोर्समध्ये भरती होता येतं.

या नमूद केलेल्या प्रवेशपरीक्षांच्या व्यतिरिक्त शारीरिक पातळीवर अनेक चाचण्या घेतल्या जातात, जसं उंची, वजन, दृष्टी इत्यादी. सेना, नौदल व हवाई दल यामध्ये प्रवेश घेण्यासाठी शरीर व मन दोन्ही सुदृढ, सक्षम असणं महत्त्वाचं असतं. घरापासून, कुटुंबापासून लांब राहून देशाची सेवा करणं काही सोपं काम नाही. त्यासाठी विलक्षण देशाभिमान, देशप्रेम व देशभक्ती तर हवीच, पण मानसिक संयम, भावनिक नियोजन व कणखर मन अत्यंत गरजेचं आहे.

प्रवेशासाठी ज्या शारीरिक चाचण्या असतात, त्या अवघड असतात. सगळ्यांनाच त्या उत्तीर्ण करणं शक्य होत नाही. परंतु जरी त्या पार करता आल्या नाहीत तरी अन्य पर्याय आहेतच. शिवाय देशाची सेवा करणं म्हणजे प्रत्येकानं जाऊन लढलंच पाहिजे असं नाही. या विवेचनातून हे स्पष्टच आहे की सेनादल, नौदल व हवाई दल यामध्ये अनेक शाखा व पोटशाखा आहेत. आपल्या बुद्धीचं, क्षमतांचं, शिक्षणाचं योग्य व अनुरूप शाखेमध्ये उपयोजन करून हे कार्य केल्याचा मनाला दिलासा व समाधान मिळवू शकतो. 

अधिक माहितीसाठी-
www.nda.nic.in,
indianeducation.net

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link