Next
प्राण्यांची अद्भुत ज्ञानेंद्रियं
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story

कुतूहलकट्ट्याची सर्व मंडळी उत्सुकतेने अंधाऱ्या गुहेत थांबली होती. सोबत सुप्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ डॉ. हेमा याही होत्या. गुहेतल्या अंधाऱ्या भागातून वटवाघळे सफाईने ये-जा करत होती.
गुहेबाहेर आल्यावर शाश्वतने विचारले, “गडद अंधारातदेखील वटवाघळं कशालाही न टक्करता सफाईनं कशी उडतात?”
“याचं रहस्य त्यांच्या स्वरयंत्रात आणि गरजेनुसार हव्या त्या दिशेने वळवता येणाऱ्या मोठाल्या कानांमध्ये आहे,” डॉ. हेमा म्हणाल्या, “स्वरयंत्राचा वापर करून वटवाघळं उच्च वारंवारतेचा (फ्रिक्वेन्सी) ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीचे तरंग आजुबाजूच्या वस्तूंवर आपटून परततात. हे तरंग मूळ तरंगांच्या तुलनेत क्षीण असले, तरी ते वटवाघळांना बरोबर टिपता येतात. हव्या त्या दिशेनं वळवता येणाऱ्या कानांच्या मोठाल्या पाळ्यांनी कानांमधल्या अतिसंवेदनाशील पडद्यांवर केंद्रित करून वटवाघळं ते ऐकतात. पाठवलेले ध्वनितरंग वस्तूंवर आदळून परत यायला लागलेल्या वेळावरून वटवाघळाचा मेंदू आजुबाजूच्या वस्तूंची स्थानं आणि त्यांचे आकार ठरवतो. याला ‘प्रतिध्वनी-स्थाननिश्चयन’ (इकोलोकेशन) म्हणतात. यामुळे प्रकाश नसतानाही प्रतिध्वनीतरंगांनी वटवाघळांना आजुबाजूच्या गोष्टींचं त्रिमित ज्ञान मिळतं. त्यांना केसांपेक्षा बारीक ताराही ओळखता येतात. तसंच, एखादी वस्तू मऊ आहे की कठीण हेही त्यांना समजतं.”
“इतरही प्राणी असे ध्वनितरंग वापरतात का?” अमनाने विचारले.
“हो,” डॉ. हेमा म्हणाल्या, “सदंत-देवमासा (टूथ्ड-व्हेल) जैवकुलातले डॉल्फिनसारखे जलचर, साळू, चिचुंद्रीसारखे भूचर आणि ऑइलबर्ड, स्विफ्टलेट्सारखे पक्षी, अनेक प्राणी प्रतिध्वनी-स्थाननिश्चयन वापरतात. याचा उपयोग त्यांना गढूळ पाण्यात, समुद्रातल्या अतिखोल भागात किंवा रात्रीच्या अंधारात भक्ष्य शोधायला, शत्रूंपासून स्वतःचा बचाव करायला आणि शिकार करताना संदेशांची देवाणघेवाण करायला होतो.”
“प्रतिध्वनीचा वापर करून प्राण्यांना वस्तू कितपत अचूकतेनं कळतात?” सोहमने विचारले.
“क्रिकेटच्या मैदानाच्या लांबीएवढ्या अंतरावरून क्रिकेटच्या चेंडूएवढी छोटी वस्तू डॉल्फिन शोधू शकतात,” डॉ. हेमा म्हणाल्या, “एवढ्या दूरचं तर त्यांच्या नजरेलाही दिसत नाही. आपलं डोकं विविध दिशांनी वळवून प्रतिध्वनी-स्थाननिश्चयन वापरून डॉल्फिन आसपासच्या माशांच्या वेगवेगळ्या अवयवांचा अंदाज घेऊन ते मासे कोणते आहेत, हे अचूकपणे ओळखतात. याचा उपयोग त्यांना भक्ष्य पकडण्यासाठी होतो.”
बोलता-बोलता सर्वजण गुहेबाहेर पडले. तिथे एका कपारीत मधमाश्यांचं पोळं लागलेलं होतं. आसपास मधमाश्यांही घोंगावत होत्या. तिकडे पाहत डॉ. हेमा म्हणाल्या, “वटवाघळांना जसं ‘प्रतिध्वनी-स्थाननिश्चयन ज्ञानेंद्रिय’ आहे, तसं मधमाश्यांना चुंबकीय क्षेत्राचा वापर करून स्थान आणि दिशाबोध (ओरिएंटेशन) समजण्याचं ‘चुंबकीय ज्ञानेंद्रिय’ आहे.”
“म्हणजे, जणू त्यांच्याकडे होकायंत्रच आहे!” मुक्ता उद्गारली.
“पण, होकायंत्रामुळे आपल्याला फक्त दिशा समजते,” डॉ. हेमा म्हणाल्या, “तर मधमाश्यांना चुंबकीय ज्ञानेंद्रियामुळे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेबरोबरच त्याची तीव्रता आणि त्यात होणारे बदलही कळतात. मधमाश्यांप्रमाणेच अनेक सूक्ष्मजंतू, शार्क आणि सामन मासे, समुद्री कासवं, स्थलांतरित पक्षी यांनाही चुंबकीय ज्ञानेंद्रिय असतं.”
“या प्राण्यांना चुंबकीय क्षेत्र समजतं कसं?” प्रथमेशने विचारले.
“या प्राण्यांच्या शरीरातल्या चेतापेशींमध्ये ‘मॅग्नेटाइट’ नावाच्या चुंबकीय पदार्थाचे स्फटिक असतात,” डॉ. हेमा म्हणाल्या, “हे स्फटिक म्हणजे जणू अतिसूक्ष्म अशा चुंबकीय सुयाच असतात. चुंबकीय क्षेत्रातल्या बदलांनुसार त्यांची दिशा बदलते. चेतापेशी हे बदलही नोंदवतात. त्यावरून चुंबकीय क्षेत्राची दिशा, तीव्रता आणि बदल त्यांच्या मेंदूला कळतात. हस्तिमत्स्यासारख्या माशांच्या चेतापेशींना चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्र कळतं. त्यांच्या विद्युतीय ज्ञानेंद्रियाची कार्यपद्धतीही अशीच असते. त्याचा उपयोग त्यांना समुद्राच्या खोल तळाशी असताना आसपासची भक्ष्यं किंवा भक्षक कळण्यासाठी होतो.”
समोर उडणारी फुलपाखरे पाहून डॉ. हेमा म्हणाल्या, “फुलपाखरांसारख्या अनेक कीटकांना मानवाच्या डोळ्यांना न दिसणारे विद्युतचुंबकीय तरंग दिसतात. अनेक फुलं आपल्या डोळ्यांना अनाकर्षक अशा एकाच रंगाची दिसतात. पण अशी फुलं कीटकांना आकर्षक नक्षीनं सजलेली दिसतात. कारण त्यांना जांभळ्या रंगापेक्षा जास्त वारंवारतेचे जंबुपार (अल्ट्राव्हायोलेट) तरंगही दिसतात. जंबुपार रंगछटांमध्ये ती नक्षी वेगळी उठून दिसते. सापांच्या अनेक जीवजातींना तांबड्या रंगापेक्षा कमी वारंवारतेचे अवरक्त (इन्फ्रारेड) तरंग दिसतात. याचा उपयोग त्यांना रात्री गरम रक्ताच्या प्राण्याची शिकार करण्यासाठी होतो.”
“आपल्याला नसणारी किती वेगवेगळी ज्ञानेंद्रियं प्राण्यांना असतात!” सानिया उद्गारली.
“शिवाय, अनेक प्राण्यांच्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमताही मानवांपेक्षा जास्त असतात,” डॉ. हेमा म्हणाल्या, “हत्ती, कुत्रे, देवमासे, पाणघोड्यासारख्या प्राण्यांना आपल्याला ऐकू न येणाऱ्या दहा हर्टझहून कमी वारंवारतेच्या ध्वनिलहरी ऐकू येतात. नाकतोडे, पतंग, बेडूक, उंदरासारख्या प्राण्यांना तर आपल्याला न ऐकू येणाऱ्या वीस हजार हर्टझहून जास्त वारंवारतेच्या ध्वनिलहरी ऐकू येतात.”
 “या प्राण्यांना एवढी अद्भुत ज्ञानेंद्रियं कशी काय मिळाली?” अभयारण्यातून परतताना मुक्ताने विचारले.
“सर्व ज्ञानेंद्रियांचा उगम एकपेशीय सजीवांमधल्या उत्परिवर्नांमध्ये आढळतो,” डॉ. हेमा म्हणाल्या, “अब्जावधी वर्षांपूर्वीच एकपेशीय सजीवांमध्ये सर्व ज्ञानेंद्रियांच्या कार्यासाठी लागणारी मूलभूत रचना तयार झाली. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळी उत्परिवर्तनं घडून यातली काही-काही ज्ञानेंद्रियं विकसित झाली, तर इतर झाली नाहीत. सजीवांना सभोवतालच्या परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी विशेष उपयोगी ठरणारी ज्ञानेंद्रियंच उत्क्रांतीत झपाट्यानं विकसित झाली.”
“पण अशी ज्ञानेंद्रियं मानवालाही उपयुक्त ठरली असती की!” प्रथमेश म्हणाला.
“हो, पण दोन ज्ञानेंद्रियं एकमेकांसारखंच कार्य करत असतील तर त्यातलं अधिक उपयुक्त ज्ञानेंद्रिय विकसित होऊन दुसरं ज्ञानेंद्रिय नाहीसंही होतं. गंमत म्हणजे मानवाच्या डोळ्यांमध्ये चुंबकीय क्षेत्राला संवेदनशील असणारं एक प्रथिन असतं. परंतु मानवाचा डोळा दृश्य प्रकाशाचा वापर करून अधिक चांगल्या रीतीने ज्ञान मिळवत राहिला, त्यामुळे मानवात मात्र चुंबकीय ज्ञानेंद्रिय विकसित झालं नाही. ‘चालवा, नाहीतर घालवा’ हा उत्क्रांतीचा नियम ज्ञानेंद्रियांनाही लागू पडतो!” डॉ. हेमा हसून म्हणाल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link