Next
अंदाज शायराना
जयश्री देसाई
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this storyअपनी वजहे-बरबादी तो सुनिये, मजे की है

जिंदगी से यूँ खेले जैसे दूसरे कि है...


प्रख्यात गीतकार, पटकथाकार, शब्दप्रभू जावेद अख्तर यांचा हा शेर त्यांच्या आयुष्याला अचूकपणे लागू होतो असं मला वाटतं… जावेदजी पंचाहत्तरीत प्रवेश करत असतानाही हाच शेर आठवावा यालाही कारण आहे. कारण त्यांनी अफाट यश कमावलंय, तसंच  त्यांनी अफाट सोसलंही आहे. ते जे सोसणं आहे त्यानं कायम त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे आणि कायम मनात एक अपूर्णतेची जाणीव ठेवली आहे, की आपण जेवढं करू शकत होतो तेवढं केलेलं नाही.
त्यांना सहज बोलताबोलतासुद्धा ते दिवस आठवतात. आईचं अखेरचं दर्शन आठवतं… ‘पांढऱ्या शुभ्र कफनात गुंडाळलेल्या आईच्या चेहऱ्याकडे नीट बघून घ्या, हा चेहरा आता पुन्हा तुम्हाला दिसणार नाही. आणि तिला सांगा की आयुष्यात तुम्ही शिकून खूप खूप मोठे व्हाल,’ असं त्यांची मावशी सांगत होती. ते आईचा चेहरा निरखून बघून लक्षात ठेवायचा प्रयत्न करत होते. ते बोलले काहीच नाहीत. आठ वर्षं वयाच्या त्यांनी व साडेसहा वर्षांच्या त्यांच्या धाकट्या भावानं आईला जणू मूकपणे दिलेलं वचन निभावलं. दोघंही आपापल्या क्षेत्रात खूप मोठे झाले. परंतु तरीही एक खंत, एक अपुरेपणाची जाणीव शिल्लक राहिली.

‘तरकश’ या आपल्या पहिल्याच व अतिशय गाजलेल्या कवितासंग्रहात लिहिलेल्या आत्मकथनात शेवटी ते लिहितात,

‘असं तर नाहीये की मी आयुष्यात काही केलंच नाही. पण मग मनात विचार येतो की मी जेवढं करू शकत होतो त्याच्या एकचतुर्थांशही अजून केलं नाही. या विचारानं आलेली अस्वस्थता मग जाता जात नाही.’ सृजनात्मक अस्वस्थतेचं इतकं अप्रतिम जिवंत उदाहरण मी दुसरं पाहिलेलं नाही.

जावेदजींचा आणि माझा संपर्क आला तो शबानाजींमुळे. ते बोलत नसत. परंतु त्यांचं लक्ष आमच्या बोलण्याकडे असायचं. मलाही त्यांच्याशी बोलायचं कधी काम पडलं नाही तरी त्यांचं ऋजू व्यक्तिमत्त्व, खानदानी अदब, एवढं सगळं यश मिळवल्यानंतरही अहंकाराचा लवलेशही नसणारा स्वभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रखर बुद्धीची आभा व सर्वात महत्त्वाचं म्हणजे हजरजबाबीपणाचा प्रभाव माझ्यावर पडत होताच. पुढे शबानाजींच्या आई व प्रख्यात अभिनेत्री शौकत आझमी यांचं ‘याद की राहगुजर’ हे आत्मचरित्र मराठीत आणण्याची संधी मला मिळाली. जावेदसाहेबांचा व माझा पहिला संवाद झाला तो तेव्हा. मराठीत त्या पुस्तकाचं नाव काय ठेवायचं यावर मी, शबानाजी, शौकतजींची चर्चा चालू होती. एकमत होत नव्हतं. शब्दशः भाषांतर केलं तर ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ वगैरे काहीतरी झालं असतं. ते आम्हाला तिघींनाही फारसं काही पटत नव्हतं. त्यांनी सुचवलं की ‘कैफी आणि मी.’ मला ते पटलं नाही, कारण ‘कैफी आझमी यांची पत्नी’ या व्यतिरिक्तही शौकतजी यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. परंतु ते त्यांनी इतक्या प्रभावीपणे पटवून दिलं, त्या पती-पत्नीमधलं अद्वैत आणि त्यातून साकारलेला त्या उभयतांच्या यशाचा मनोरा यावर ते इतकं छान बोलले, की या पुस्तकाला ‘कैफी आणि मी’शिवाय अन्य कोणतंच नाव योग्य नाही हे आम्हांलाही पटलं. हे प्रभावी वक्तृत्व त्यांच्या शालेय जीवनापासून त्यांच्याकडे आहे. त्या जोरावर त्यांनी शाळा-महाविद्यालयांसाठी अनेक स्पर्धा, ट्रॉफीही जिंकल्या.

 याचं प्रत्यंतर मला पुढे मी त्यांचा ‘तरकश’ हा जो कवितासंग्रह मराठीत आणला, त्यावेळीही आलं. यादरम्यान तर त्यांच्याशी सतत संवाद होत होता. तेव्हा लक्षात येत गेली ती त्यांची कुशाग्र बुद्धी, प्रगल्भता व शब्दप्रभुत्व आणि त्याचबरोबर त्यांची प्रागतिक विचारसरणी.  हा वारसा होता तो त्यांचे वडील, प्रख्यात शायर जाँ निसार अख्तर (जाँ निसार अख्तर हयात असेपर्यंत जावेदजी आणि त्यांच्यात दुरावाच होता.) आणि भोपाळच्या हमिदिया विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या प्रागतिक विचारांच्या आई साफिया बेगम यांनी दिलेल्या विचारांचा.  मुस्लीम समाजात बाळ जन्माला आल्यावर त्याच्या कानात कुराणाच्या आयता म्हटल्या जातात. जाँ निसार अख्तर यांनी आपल्या बाळाच्या कानात कम्युनिस्ट मॅनिफेस्टोच्या ओळी वाचल्या. परंतु जावेद यांच्या नशिबी पुढे मात्र असह्य परवड आली. आई लवकर वारली. वडिलांनी दुसरं लग्न केलं. ती आई, ‘सावत्र आई’ची रूढ प्रतिमा निभावणारीच होती. परिणामी वडील असूनही ही दोन्ही भावंडं पोरकी झाली. त्यांच्या आयुष्यात आली उपासमार, दुसऱ्याच्या आधारावर जगणं, रस्त्यावर वा महाकाली गुंफांमध्ये राहणं, अत्यंत प्रखर संघर्ष... मात्र या काळात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहिली ती त्यांची विजिगीषू वृत्ती आणि मी काही तरी बनून दाखवीन हा आत्मविश्वास. त्या जोरावर कधी उपाशी राहत तर कधी दारू व जुगाराचा आधार घेत ते तगून राहिले. संघर्ष करत राहिले.

अखेर यश त्यांना मिळालं. त्यांनी ज्याची ज्याची स्वप्नं बघितली होती ते यश त्यांचं झालं. या संघर्षानं त्यांना खूप शिकवलं. त्यांचीच एक कविता आहे ‘एक मोहरे का सफर’ ही कविता म्हणजे जावेद साहेबांच्या आयुष्याचं सार आहे… ते तसंच जगत आले आहेत. मात्र या कवितेची अखेर आहे तसे ते एकाकी नाहीत. शबानाजींनी त्यांच्या आयुष्यातली ती पोकळी भरून काढली आहे. ‘ती माझी पत्नीच नाही, तर प्रियतमा आहे’ असं ते म्हणतात; आणि या त्यांच्या प्रियतमेसाठी त्यांनी खंडाळ्याला एक अप्रतिम असा महाल बांधला आहे. त्याचं नाव आहे ‘सुकून.’ जिथे नावाप्रमाणेच शांतता लाभते अशी ही वास्तू म्हणजे सुकून!

शबानाजींच्या आमंत्रणावरून तिथे या दोन्हीही प्रतिभावंत कलावंतांबरोबर अर्धा दिवस व्यतीत करण्याचा योग आला. जावेदसाहेबांच्या कविता जितक्या सुंदर असतात तितकंच हे त्यांच्या कल्पनेतून साकारलेलं घर सुंदर आहे. तिथल्या प्रत्येक गोष्टीतून त्यांची कलात्मक दृष्टी डोकावते. तिथे सगळंच भव्य आहे.
शबानाजी सांगत होत्या, ‘हे घर जेव्हा बांधायला घेतलं, तेव्हा आमची रोज भांडणं व्हायची. इतकं मोठं घर कशाला, एवढा खर्च कशाला’ असं मला वाटायचं. शेवटी एक दिवस त्यांचा एक मित्र मला म्हणाला,’तू नको त्याला विरोध करूस. तू ‘अंकुर’ आहेस व तो ‘शोले.’ त्याचं सगळं ७० एमएममध्येच असणार. मला ते इतकं पटलं की मी त्यानंतर अजिबात विरोध केला नाही.’

या घरात शायरी आणि सिनेमा यांचा अद्भुत संगम आहे. सिनेमाची भव्यता आणि शायरीची नजाकत इथे पाहायला मिळते. इथल्या भल्या मोठ्ठ्या स्टडीमध्ये असंख्य पुस्तकांचा खजिना आहे. त्यांच्या जुहूच्या घरात आहे तसाच. विशेष म्हणजे जिथे त्यांचं वास्तव्य असतं त्या वरच्या मजल्याच्या व्हरांड्यात आजवरच्या सर्वच्या सर्व प्रमुख शायरांची अर्कचित्रं फ्रेम करून लावलेली आहेत. ते सगळेच आपल्याला माहीत असतात असं नाही. परंतु त्यांच्या तोंडून त्यांच्याबद्दल ऐकणं हाही खूप समृद्ध करणारा अनुभव अर्थातच असतो.

खरं तर शायरीकडे ते फार उशिरा वळले. शायरी त्यांच्या रक्तातून वाहत आली आहे. मात्र पित्यावरच्या नाराजीतून आलेल्या बंडखोरीचं प्रतीक म्हणून ते कटाक्षानं कविता करत नव्हते. ज्याच्याकडे अगणित शेरांचा संग्रह, तोही तोंडपाठ आहे, त्याला हे किती कठीण गेलं असणार हे सहज लक्षात येऊ शकतं. शायरीशी असलेलं त्यांचं नातं त्यांच्या नावापासूनच उलगडत जातं. त्यांचं स्वतःचं नाव ‘जादू’ हेही त्यांच्या वडिलांच्या कवितेतून आलेलं आहे. ‘लम्हा लम्हा किसी जादू का फसाना होगा..’  असं जाँ निसार अख्तर यांनी एका कवितेत लिहिलंय. त्यावरून त्यांचं नाव ‘जादू’ असं ठेवण्यात आलं. घरी शबानाजी, शौकतआपा हे सगळे त्यांना ‘जादू’ म्हणूनच हाक मारतात. शाळेत घालताना ‘जादू’च्या सगळ्यात जवळ म्हणून त्याचं रूपांतर जावेद असं झालं. त्यांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील मुझ्तर खैराबादी यांच्या शायरीचे पाच खंड प्रकाशित आहेत. त्यांची कविता ही उर्दू शायरीतील मैलाचा दगड म्हणून ओळखली जाते. काका बिस्मिल खैराबादी हेही शायर. मामा मजाज यांचाही शायरीच्या प्रांतात दबदबा होता.

वडील जाँ निसार अख्तर यांच्याशी जावेद यांचं कधीच पटलं नाही. त्यांना जे सोसावं लागलं त्यासाठी त्यांनी कायमच वडिलांना जबाबदार मानलं आणि त्यामुळेच १९७६ साली वडिलांचं निधन होईपर्यंत ते कवितेकडे वळलेही नाहीत. वडील १९७६ साली गेले आणि त्यांनी पहिला शेर लिहिला तो १९७९ साली! त्यानंतर मात्र ते थांबलेच नाहीत! ते म्हणतात, ‘तो शेर लिहून मी माझा वारसा व माझा बाप यांच्याशी जणू तह करून टाकला. जरी मला त्यांचा सहवास मिळाला नाही तरी त्यांच्या खूप गोष्टी माझ्यात आलेल्या आहेत असं माझ्या लक्षात आलंय. उर्दू शायरीत दोन स्वतंत्र घराणी आहेत. दिल्ली व लखनौ. दिल्लीमध्ये ‘अरेबिक’ व ‘पर्शियन’ शब्दांचा खूप वापर केला जातो. माझ्या वडिलांसारखे जे लखनौ घराण्याचे शायर आहेत ते अरेबिक व पर्शियन शब्दांचा वापर जाणीवपूर्वक टाळताना दिसतात. मी तेच करतो. त्यांनी जे लिहिलं त्यापेक्षा माझी शायरी अगदी वेगळी आहे, पण समान धागा आहे तो म्हणजे अवधी बोलीचा वापर. त्यांची स्मरणशक्ती इतकी अफाट होती की त्यांना अक्षरशः लाखो शेर पाठ होते. तीच स्मरणशक्ती माझ्यातही उतरलीय. माझ्या बापाचं या कलेवर, शब्दांवर प्रचंड प्रभुत्व होतं. त्यामुळे ते चुटकीसरशी कोणताही साहित्यप्रकार हाताळू शकायचे. मीही तेच करू शकतो. परंतु मला असं वाटतं की इतकं अष्टपैलुत्व कधी कधी तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीनं मारक ठरतं. तो माणूस यशस्वी होतो, पण ‘आयकॉन’ बनू शकत नाही. आज वर्डस्वर्थ म्हटलं की आपल्याला निसर्गकविताच आठवतात. शेले म्हटलं की प्रेमकविताच आठवतात. तसं माझ्या बापाच्या बाबतीत झालं नाही. त्यांचा हाही वारसा माझ्यात आलाय! मीही सगळेच साहित्यप्रकार चुटकीसरशी हाताळू शकतो!’ते पुढे बोलले नाहीत. पण त्यांच्या मनातल्या ज्या सृजनात्मक अस्वस्थतेच्या जाणिवेचा प्रत्यय जो सतत येत राहतो, त्याचं मूळ हे आहे, असं मला वाटतं. त्यांच्या वडिलांनी सांगितलेल्या आणखी एका गोष्टीचा ठसा जावेदसाहेबांवर खूप गडदपणे पडलेला दिसतो. त्यांचे वडील एकदा त्यांना म्हणाले, ‘Expert is one who knows more & more about less & less.’ ते अजिबात आध्यात्मिक वा धार्मिक नाहीत. मात्र आपल्याकडे ज्याला अंतर्मुखतेकडे व सूक्ष्माकडे होणारा प्रवास म्हणतात तोच तर हा आहे! त्याचं स्पष्टीकरण तुम्ही कसंही करा!

त्यांचं आडनाव खरं तर अख्तर नाही. ते आहे खैराबादी. त्यांच्या वडिलांनी अख्तर हे आडनाव लावायला सुरुवात केली. त्याचा अर्थ आहे ‘आकाशातला तारा.’ ते वडिलांना कसं योग्य होतं हे एकदा जावेदसाहेब सांगत होते आणि माझ्या मनात येत होतं की जावेदसाहेबांनी सिनेमाला व शायरीला दिलेलं योगदान बघता त्यांच्यासाठीही हेच आडनाव साजून दिसतं. खैराबादी नाही! नाही का?

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link